Skip to main content
x

बेडेकर विश्वनाथ चिंतामण

बेडेकर, विश्राम

     मराठी साहित्य विश्वामध्ये एक श्रेष्ठ प्रतिभावंत लेखक म्हणून विश्राम बेडेकरांचे नाव घ्यावे लागेल. त्यांचा जन्म अमरावती येथे झाला. वडील विद्वान व घनपाठी; त्यांनी मुलाला लहानपणीच रुद्र, पवमान, पुरुषसूक्ताचे पाठांतर करायला लावले. वडील अमरावतीच्या राममंदिराचे पुजारी; पगार मासिक रुपये १५. घरची गरिबी, त्यामुळे नादारीवर व मित्रांच्या सहकार्यावर ‘शिक्षण’ झाले.

     ‘मैत्री’ला बेडेकरांच्या आयुष्यात लहानपणापासूनच खूप वरचे स्थान मिळालेले आहे. त्यांचे पाळण्यातले नाव ‘विश्वनाथ’ असे होते. शाळेमध्ये श्रीराम खरे हा त्यांचा जिवलग मित्र होता. स्वतःच्या नावातील ‘विश्’ व श्रीरामाच्या नावातील ‘राम’ हे श्रीरामाच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून घेऊन त्यांनी ‘विश्राम’ हे नाव घेतले व तेच पुढे रूढ झाले.

     ते अमरावतीच्या ए.व्ही.स्कूलमधून मॅट्रिक झाले. शाळेमध्ये असताना अमरावतीच्या जनरल लायब्ररीतर्फे होणार्‍या ‘वक्तृत्वोत्तेजक’ स्पर्धेमध्ये ते सहभाग घेत, त्यासाठी त्यांचे मामा केळकर मास्तर त्यांना मदत करीत. त्यांना स्पर्धेत एकदा पहिले बक्षीसही मिळाले होते. किंग एडवर्ड विदर्भ महाविद्यालयातून ते चांगल्या तर्‍हेने बी.ए.उत्तीर्ण झाले. त्यामुळे त्यांना फेलोशिप मिळाली. नागपूर महाविद्यालयातून एम.ए.झाले. पुढे ते एल्एल.बी. झाले.

     बेडेकरांच्या लेखनाला त्यांच्या महाविद्यालयीन आयुष्यातच सुरुवात झालेली दिसते. ‘मध्यकाल’ नावाच्या ऐतिहासिक कादंबरीची काही प्रकरणे ‘गणेश चतुर्थीचा चंद्र’ ही कविता, लघुकथा, नाट्यछटा, ‘बंधनाच्या पलीकडे’ कादंबरीचे परीक्षण इत्यादी लेखन त्यांनी हस्तलिखितासाठी केले होते. १९२८साली बी.ए.च्या वर्गात  असतानाच त्यांनी ‘ब्रह्मकुमारी’ हे नाटक लिहिले, पण ते प्रकाशित व्हायला जून १९३३ साल यावे लागले. बळवंत संगीत मंडळातर्फे या नाटकाचा प्रयोग झाला. पुढे या नाट्यसंस्थेचे रूपांतर चित्रपटसंस्थेत  झाले. बेडेकरांचे चित्रपटांचे, पटकथालेखनाचे, निर्मितीचे आकर्षण प्रत्यक्षात यायला ही संस्था कारण ठरली. ‘नरो वा कुंजरो वा’ (१९६१), ‘वाजे पाऊल आपुले’ (१९६७), ‘टिळक आणि आगरकर’ (१९८०) ही त्यांची नाट्यक्षेत्रातली कामगिरी.

     ब्रह्मकुमारी’ हे पौराणिक नाटक, तर ‘नरो वा कुंजरो वा’ हे स्वतंत्र सामाजिक नाटक आहे. फाशीच्या शिक्षेतील अमानुषता दाखविणारे हे नाटक आहे. ‘वाजे पाऊल आपले’ हे नाटक म्हणजे नॉर्मन बराश आणि कॅशल मूर यांच्या ‘सेंड मी नो फ्लॉवर्स’ या नाटकाचा अनुवाद आहे. प्रेमपूर्ण गैरसमजातून विनोदी प्रसंग निर्माण करीत रसिकांच्या चित्तवृत्ती प्रसन्न ठेवणारे हे नाटक आहे. या नाटकाच्या वेळी ‘कुत्र्याला माणूस चावला’ या नाटकाची ‘आगामी’ म्हणून जाहिरात झाली; पण ते प्रत्यक्षात लिहिले गेले नाही.

     यानंतर तेरा वर्षांनी लिहिले गेलेले व लोकप्रिय होऊन खूप गाजलेले नाटक म्हणजे ‘टिळक आणि आगरकर’ या दोन्ही महापुरुषांचा अभ्यास बेडेकरांनी कमीतकमी एक तप तरी केला होता. या नाटकाला मराठी नाट्य परिषदेचे ‘विष्णुदास भावे’ सुवर्ण पारितोषिक मिळाले. पुण्यात यावर परिसंवाद झाले. लक्षणीय, वेगळे, वादग्रस्त, जोडनायकांचे नाटक; चरित्रनाटक; शोकात्मिकेच्या उंचीचे नाटक अशा विविध प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या. ‘भरतशास्त्र’ने ऑगस्ट-सप्टेंबर १९८२चा खास अंक यासाठी काढला. आगरकरांचे चित्र या नाटकामध्ये हिणकस उतरले आहे हे य.दि.फडके यांचे मत बेडेकरांनी नाटकाच्या पुस्तकातच सौम्य भाषेत नोंदविले. हेच मत ‘बेडेकर हे मूळचे चित्रपट दिग्दर्शक.’ पटकथेचे अनेक विशेष ‘टिळक आणि आगरकर’मध्येही जाणवतात. आगरकरांबद्दल बेडेकरांना लहानपणापासून ओढ असावी; पण या ओढीपेक्षा त्यांची टिळकभक्ती अधिक जाज्वल्य असावी,’ ह्या शब्दांत राजीव नाइकांनी नोंदविले. ह्या नाटकाबद्दल इतके उलटसुलट विचारप्रवाह आहेत की, टिळक-आगरकर ही दोन्ही उत्तुंग व्यक्तिमत्त्वे, उदात्त नायक एवढाच परिणाम करून घेणे चांगले; कारण त्या काळच्या त्या इतिहासाची, आगरकरांच्या पत्नीच्या आठवणीची, कशाचीच निश्चिती झालेली नाही. पण, त्याकडे नाटक ह्या दृष्टिकोनातून बघणे जास्त श्रेयस्कर आहे.

     बेडेकरांच्या पहिल्या नाटकाचा प्रयोग सांगलीला, जून १९३३मध्ये झाला. तो प्रयोग करणारी बळवंत संगीत कंपनी चित्रपट क्षेत्रात गेल्यावर बेडेकरही चित्रपट क्षेत्रात गेले. त्यांच्या ‘कृष्णार्जुन युद्ध’ (१९३४) चित्रपटाची सर्व जबाबदारी बेडेकरांवर होती. मात्र तो चित्रपट प्रचंड नुकसानीत गेला; पण बेडेकरांचे चित्रपटसृष्टीचे आकर्षण टिकून राहिले. ‘ठकीचे लग्न’ (१९३५) हा मराठीतील पहिला विनोदी चित्रपट; ‘एक नन्ही मुन्नी लडकी थी’ हा हिंदी चित्रपट. बेडेकरांचे ‘पहिला पाळणा’, ‘शेजारी’, ‘सत्याचे प्रयोग’, ‘अमर भूपाळी’, ‘रामशास्त्री’, ‘होनाजी बाळा’ हे यशस्वी चित्रपट. काहींचे दिग्दर्शन त्यांनी केले होते, तर काहींचे पटकथा-संवाद त्यांनी लिहिलेले होते. याशिवाय ‘ज्ञानेश्वर’, ‘कंगाल’, ‘सूनबाई’, ‘पैसा बोलतो आहे’, ‘लोकमान्य टिळक’, ‘शहीद भगतसिंह’, ‘विनोबा भावे’, ‘भोळा शंकर’, ‘वासुदेव बळवंत फडके’ (अपूर्ण) अशी श्रेयनामावली आहे. त्यांची आर्थिक बाजू मात्र कायम त्रासदायक राहिली.

     बेडेकरांना नाटक व चित्रपट या क्षेत्रांत यश तर मिळालेच, पण त्याहीपेक्षा जास्त यश त्यांच्या एकमेव ‘रणांगण’ (१९३९) या कादंबरीने व ‘एक झाड दोन पक्षी’ (१९८४)या आत्मचरित्राने मिळवून दिले. बेडेकरांचे लग्न डिसेंबर १९३८मध्ये बाळूताई खरे (विभावरी शिरुरकर) यांच्याशी झाले व भारत सरकारच्या फ्लिम्स् डिव्हिजनची शिष्यवृत्ती मिळाल्याने लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी मालतीबाई सोलापूरला व बेडेकर इंग्लंडला गेले.

     प्रशिक्षणाचे सहा-सात महिने पूर्ण व्हायच्या सुमारासच, १९३९साली महायुद्ध सुरू झाले व इटालिअन बोटीतून ११दिवसांचा प्रवास करून बेडेकरांना मायदेशी परत यावे लागले. या बोटीवर बरेच निर्वासित ज्यू होते. हिटलरने केलेल्या त्यांच्या छळाच्या कहाण्या, महायुद्धाचे भीषण पडसाद यांमुळे बेडेकरांचे मन अपार कारुण्याने, मानवतेने भरून आले. ही विश्वव्यापी मानवता, समुद्राची व बोटीची पार्श्वभूमी, हॅर्टा, चक्रधर, शिंदे, लुई इत्यादी पात्रे, देशी-विदेशी प्रवासी ह्या सार्‍या गोष्टी बेडेकरांच्या डोक्यात घोळत होत्या. त्यातच ‘विरलेले स्वप्न’वर बेडेकरांनी केलेली टीका ऐकून मालतीबाईंनी त्यांना जणू आव्हानच दिले होते. मालतीबाई म्हणाल्या की, “नुसती टीका करायला काय लागतं? कादंबरी लिहून पाहा.”

      मालतीबाईंचे हे बोलणे आठवून बेडेकरांनी आठवड्याच्या आत ही (१९३९) अद्वितीय, केवळ १२२ पृष्ठांची कादंबरी लिहून पूर्ण केली. आपल्या हाताला यश नाही, अशी त्या वेळी बेडेकरांची समजूत होती. म्हणून लेखकाचे नाव न घालता; पण ‘संपूर्ण स्वतंत्र कादंबरी’ असे प्रथमदर्शनी लिहावयास सांगून ह.वि.मोटे यांच्याकडे ती प्रकाशनाला दिली. कादंबरीत थोडा विस्कळीतपणा जाणवला असावा म्हणून ‘लेखकाने जशी-जशी पाने लिहिली व युरोपातून आणली, तशी-तशी ती छापली’, अशा तर्‍हेचे स्पष्टीकरण प्रकाशकाच्या नावावर छापायला लावले.

     बेडेकरांची कादंबरी काळाच्याआधी वीस वर्षे जन्माला आली. १९४० साली एका वाङ्मय मंडळातर्फे (ज्याचे परीक्षक ना.सी.फडके, न.चि.केळकर व वि.सी.गुर्जर हे होते) त्याला द्वितीय पारितोषिक मिळाले एवढेच त्या वेळी झालेले कौतुक.

    १२०० प्रती संपायला ५-६ वर्षे गेली. फक्त वसंत तांबेंनी तिचे कौतुक केले होते. ‘रणांगण’च्या नवतेचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. कोणी ती कादंबरी चिरतरुण असल्याचे प्रतिपादले, तर कुणाला बेडेकर जर्मन, इंग्रज, फ्रेंच, मराठी, हिंदी माणसाच्या अंतर्विश्वाला प्राधान्य देत आहेत हे जाणवले, तर कुणाला बेडेकरांच्या अल्पाक्षरी, सुबक आणि देखण्या भाषाशैलीचे कौतुक वाटले.

     १९६०सालानंतरच्या समीक्षकांनी ‘रणांगण’ची थोरवी ओळखली. गंगाधर गाडगीळांनी ‘रणांगण’ला ‘साहित्याच्या मानदंडा’त नेऊन बसविली. ‘रणांगण’च्या निवेदन पद्धतीतील चित्रपटकथातंत्र हा मुद्दा श्री.माधव आचवलांनी सर्वप्रथम मांडला. प्रा.अरुण दुभाषी व भाई-भगत यांनीही तसेच मत नोंदविले आहे. कुसुमावती देशपांडे यांनी तिचा मोठेपणा विशद केला; उषा हस्तकांनी ‘रणांगण’चे अनेक संदर्भ-सूचकत्व दाखविले. डॉ.द.भि.कुळकर्णी यांनी आपल्या ‘तिसर्‍यांदा रणांगण’ (१९७६) व ‘पहिल्यांदा रणांगण’ (१९९३) मध्ये ‘रणांगण’चे दीर्घ भावकाव्यत्व दाखवून ‘रणांगण’ ही कादंबरी, कादंबरी लेखनप्रकाराचा अत्युच्च घाट आहे हे दाखवून दिले. दर वेळी एक वेगळेच सौंदर्य घेऊन ती त्यांच्यापुढे येत असल्याने, तिच्या वेगवेगळ्या कलात्मक पैलूंचे दर्शन रसिकांना ते घडवीत असतात.

    ‘रणांगण’वर समीक्षकांनी इतके लिहिले की, ‘रणांगण समीक्षेची समीक्षा’ (१९९९) व ‘रणांगण समीक्षेची साठ वर्षे’ (२००६) हे दोन समीक्षाग्रंथ तयार झाले. महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात ही कादंबरी लावल्याने मराठीतील अभ्यासकांचे लक्ष तिच्याकडे गेले.

    बेडेकरांनी ‘एक झाड दोन पक्षी’ हे आत्मचरित्र १९८२-१९८३साली लिहिले. १९८४साली ते प्रकाशित झाले. त्याला १९८५ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. स्वित्झर्लंडमधील वास्तव्यात त्यांनी मालतीबाईंना लिहिलेली पत्रे ‘सिलिसबर्गची पत्रे’ या नावाने प्रसिद्ध झालेली आहेत. विदर्भ साहित्य संमेलनाच्या तिसाव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद (१९७३), तसेच मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (१९८६) हे दोन्ही बहुमान त्यांना मिळाले. कादंबरी, आत्मचरित्र, पटकथा, नाटक ह्या क्षेत्रांमध्ये आपला आगळावेगळा ठसा उमटवून ३० ऑक्टोबर, १९९८ रोजी ते काळाच्या पडद्याआड गेले.

      - डॉ. उषा कोटबागी 

बेडेकर विश्वनाथ चिंतामण