Skip to main content
x

बेंद्रे, नारायण श्रीधर

               आधुनिक कलाप्रवाह आणि भारतीय लोकसंस्कृतीच्या संयोगातून आणि प्रयोगशीलतेतून स्वतःची शैली घडवणारे चित्रकार नारायण श्रीधर बेंद्रे यांचा जन्म मध्यप्रदेशातील इंदूर येथे झाला. त्यांचे वडील इंदूरला रेसिडंटच्या कार्यालयात लेखापाल होते. त्यांचे बालपण, शालेय शिक्षण तसेच कलाशिक्षण इंदूर येथे पार पडले. बालपणापासून त्यांचा ओढा चित्रकलेकडे होता. लहानपणीच त्यांच्या उजव्या डोळ्याला सांसर्गिक आजाराने ग्रसले आणि अखेरीस तो डोळा कायमचाच गमवावा लागला.

               बेंद्रे यांच्यात चित्रकलेबद्दलची आवड घरी केलेली धार्मिक सजावट, तसेच सणासुदीला मंदिरावर केलेली सजावट, घरामध्ये लावलेली धार्मिक चित्रे यांच्यामुळे निर्माण झाली. आईने केलेले संस्कारसुद्धा महत्त्वाचे होते. बेंद्रे यांनी शालान्त परीक्षेनंतर १९३३ मध्ये कलाशाखेतून बी.ए. पदवी प्राप्त केली. चित्रकलेचे धडे त्यांनी सकाळ-संध्याकाळ गिरवले. त्या काळातील इंदूर स्कूल ऑफ आर्टचे संस्थापक द.दा. देवळालीकर हे उत्तम कलाकार आणि निष्णात कलाशिक्षक होते.

               पुढे १९३४ मध्ये बेंद्रे यांनी रंगकलेची पदविका घेतली. याच वर्षी त्यांच्या ‘व्हॅगॅबाँड’ या कलाकृतीला बॉम्बे आर्ट सोसायटीचे रौप्यपदक मिळाले. पुढील सहा वर्षांत त्यांना सातत्याने सोसायटीची आठ बक्षिसे मिळाली आणि १९४१ मध्ये सुवर्णपदक मिळाले. एवढे यश मिळवूनही आर्थिक प्रश्‍न सुटत नव्हते. बेंद्रे यांनी १९३६ मध्ये काश्मीरमध्ये कलाकार-वृत्तपत्रकाराची नोकरी पत्करली. कामाच्या निमित्ताने कॅमेराही हातात आला. त्यांनी पूर्वी कॅमेरा वापरला नव्हता म्हणून कॅमेऱ्याच्या जाहिराती आणि मासिकांतील लेखांच्या आधारे त्यांनी छायाचित्रणाचे कौशल्य आत्मसात केले. पुढे ‘इलस्ट्रेटेड वीकली’मध्ये त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली.

               काश्मीर मुक्कामी त्यांनी नोकरी सांभाळून रेखाचित्रे आणि रंगचित्रनिर्मिती चालू ठेवली होती. विविध ऋतूंमधील काश्मीरचे वातावरण आणि रंग यांचा त्यांनी कलात्मक उपयोग करून घेतला. वृत्तपत्रकारितेला रामराम ठोकून त्यांनी १९३९ मध्ये मुंबई गाठली. मुंबई येथे त्यांच्या कलागुणांना चांगली दाद मिळाली. काही काळ त्यांनी जाहिरात क्षेत्रामध्ये काम केले; पण नंतर त्यांंनी लगेचच दादर येथे कलाशिक्षणाचे वर्ग सुरू केलेे.

               बनारस येथे रंगविलेल्या त्यांच्या अनेक चित्रांपैकी एका चित्राला सुवर्णपदक मिळाले. या दरम्यान सिनेमा क्षेत्रातील जाणकारांच्या आग्रहामुळे ते मद्रास येथे कला-दिग्दर्शक म्हणून दाखल झाले.

               बेंद्रे यांचा १९४२ मध्ये मूळच्या केरळी असलेल्या पद्मा यांच्याशी विवाह झाला व पद्मा या मोना बेंद्रे झाल्या. विवाहाच्या वेळी बेंद्रे यांची सांपत्तिक स्थिती बेताची होती; पण मोना यांनी एका चित्रकाराबरोबर विवाह करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला होता. बेंद्रे यांचे त्या कायम स्फूर्तिस्थान राहिल्या. बेंद्रे यांनी मोनाची अनेक चित्रे काढली. खरे तर मोना यांच्यामुळे निसर्ग- चित्रणापासून बेंद्रे मानवाकृतिप्रधान चित्रांकडे वळले.

कलासाधनेत मग्न असताना बेंद्रे यांनी सामाजिक बांधीलकी आणि राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव ठेवली. स्वातंत्र्यलढ्याचा हा काळ होता. बेंद्रे यांनी १९४२ मधील ‘छोडो भारत’ या शीर्षकाचे चित्र रंगविले. या चित्राला आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रदर्शनात ‘पटेल ट्रॉफी’ मिळाली. हे चित्र सोसायटीने आपल्या संग्रही ठेवून घेतले. याच दरम्यान त्यांनी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमच्या दालनात एकल प्रदर्शन भरविले. त्या प्रदर्शनाला रसिकांचा एवढा प्रतिसाद मिळाला, की सदतीस चित्रे हातोहात विकली गेली.

               रवींद्रनाथांनी १९४५ मध्ये स्थापलेल्या ‘शांति- निकेतन’ या संस्थेत अतिथी कलाकार म्हणून काम करण्यास त्यांना पाचारण करण्यात आले. येथील मुक्कामामध्ये त्यांनी बंगालमधील आणि शांतिनिकेतनमधील कलाप्रवाहांचा अभ्यास केला. शांतिनिकेतनामध्ये निसर्गचित्रे करीत असताना एकदा नंदलाल बोस बेंद्रे यांच्या यथार्थवादी निसर्गचित्रांकडे पाहून म्हणाले, ‘‘तू निसर्गाचे निरीक्षण करून मग अंतर्मनावर आधारित चित्र काढ.’’ नव्याने उमगलेल्या या दृष्टिकोनामुळे बेंद्रे यांना चित्रातील आशयाला धरून काय घ्यायचे व काय वर्ज्य करायचे याचे भान आले. बेंद्रे यांना १९४७ मध्ये अमेरिकेची वारी करण्याची संधी मिळाली. या प्रवासात त्यांनी अमेरिकेतील प्रमुख कला दालने, आर्ट गॅलऱ्या तसेच संग्रहालयांना भेटी दिल्या. ते अनेक कलाकारांना भेटले. त्यांनी अमेरिकन कलाजगताचे विविध पैलू अभ्यासले. न्यूयॉर्क शहरात त्यांनी ‘आर्ट स्टूडंट्स लीग’ संस्थेत मुद्राचित्र तंत्राचा (प्रिंटमेकिंगचा) अभ्यास केला. त्यांना चिनी, जपानी चित्रेही पाहावयास मिळाली. पौर्वात्य व पाश्‍चिमात्य कलेच्या दर्शनाने त्यांची दृष्टी व्यापक झाली. अमेरिकेतील वास्तव्यात त्यांच्या चित्रप्रदर्शनांना चांगला प्रतिसाद मिळाला.

               त्यांनी अमेरिकेतून थेट इंग्लंड गाठले. तेथील ‘आर्टिस्ट’ या नियतकालिकात त्यांची कलाकृती छापली गेली. या प्रसिद्ध मासिकामध्ये चित्र छापले गेलेले ते पहिलेच भारतीय होत. तेथून हॉलंड, फ्रान्स असा प्रवास करीत ते पुन्हा इंग्लंडला आले. या सर्व प्रवासामध्ये पाश्‍चिमात्य कलेबद्दल त्यांना बरेच ज्ञान प्राप्त झाले. 

               भारतात परतल्यानंतर १९५० मध्ये बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात त्यांची चित्रकला विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली. विद्यापीठाच्या ललित कला विभागाच्या उभारणीचे ते दिवस होते. प्रा.मार्कंड भट, प्रा.शंखो चौधरी, प्रा.आंबेरकर, के.जी.सुब्रमण्यन अशा मातब्बर कला-अध्यापकांच्या बरोबरीने त्यांनी त्या ललित कला विभागाला भारतीय कला-शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य स्थान मिळवून दिले. विद्यापीठाच्या या विभागातील अनेक विद्यार्थ्यांनी नंतरच्या काळात भारतीय श्रेष्ठ कलाकार म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले. सहकारी शिक्षक व विद्यापीठ व्यवस्थापनाशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी अधिष्ठाता पदाचा १९६६ मध्ये राजीनामा दिला व ते मुंबईस परतले.

               बडोद्यातील सोळा वर्षांच्या कारकिर्दीमध्ये बेंद्रे यांनी आपल्या विद्यार्थ्यांना वैचारिक स्वातंत्र्य तर दिलेच; पण कलासाधनेसाठी कडक शिस्तपालनाकडेही लक्ष दिले. त्यांचे विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडेही लक्ष असे.

               बेंद्रे यांच्या कलाप्रवासात त्यांच्यावर विविध प्रकारचे संस्कार झालेले दिसतात. बेंद्रे यांचा पिंड प्रयोगशील होता व चित्रकला माध्यमावर त्यांचे प्रभुत्व होते. ते सांगत असत की, ‘‘कोणत्याही प्रकारच्या कलाकृतीवर टीका करण्यापूर्वी त्यात काय चांगले आहे ते समजावून घेणे आवश्यक आहे. किंबहुना, कलेच्या विद्यार्थ्याने तर त्याची प्रतिकृती करून व त्यापासून प्रेरणा घेऊन कलानिर्मिती केल्यास ते अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल.’’ या विचारानुसार त्यांनी स्वत:ही काही काळ काम केल्याचे आढळते.

               त्यांनी वास्तववादी, अलंकरणात्मक, विरूपीकरणात्मक व अमूर्ततेकडे झुकणाऱ्या अशा सर्वच शैलींत प्रयोगशील चित्रनिर्मिती केली. त्यात काही वेळा इंप्रेशनिझम, क्यूबिझम, फॉविझम अशा पाश्‍चिमात्य कलाचळवळींचा व चिनी किंवा जपानी पौर्वात्य कलेतील संयत आविष्काराचाही समावेश होता.

               शिक्षण क्षेत्र सोडून १९६६ मध्ये मुंबईत स्थायिक झाल्यावर साधारणपणे १९७० च्या आसपास ते बिंदुवादावर आधारित अशी मोहक चित्रे रंगवू लागले व अखेरपर्यंत त्यांनी त्याच प्रकारची चित्रे रंगवली. त्यांची ही चित्रे अत्यंत लोकप्रिय झाली. ती मोठ्या किमतीस प्रदर्शनापूर्वीच विकली जात. ‘आयुष्यभर प्रयोगशील राहा’ असे सांगणाऱ्या बेंद्रे यांनी आयुष्याच्या अखेरीस मोहक व विकाऊ चित्रेच रंगवली असा आक्षेप त्यांच्यावर घेतला जाई. पण बेंद्रे म्हणत की, ‘‘या जगात अनेक प्रकारची दु:खे आहेत. मला त्यात भर घालायची नाही. चित्रापासून मला आनंद मिळतो म्हणून मी चित्र रंगवितो, आणि तो आनंद इतरांना द्यावा असा माझा प्रयत्न असतो. हेच माझ्या कलेचे तत्त्वज्ञान आहे.’’

               सुरुवातीच्या काळात निसर्गचित्रे व व्यक्तिचित्रे यांतून त्यांनी आपली प्रायोगिकता जोपासली. ‘व्हॅगॅबाँड’ या बॉम्बे आर्ट सोसायटीच्या रौप्यपदक विजेत्या चित्रात व ‘काँग्रेस सेशन १९४२’ या त्यांच्या निसर्गचित्रात इंप्रेशनिझमचा प्रभाव आढळतो. त्यांची १९५० च्या दशकातील चित्रे क्यूबिझम व फॉविझमच्या प्रभावाखाली असलेली अशी आहेत. त्यांनी १९६० च्या दशकात  रंगलेपनातून पोत व विरूपीकरणाचे प्रयोग केले. ते १९७० च्या दशकापासून भारतातील निसर्ग व लोकजीवनावर आधारित बिंदुवादी मोहक चित्रे रंगवू लागले. त्यासाठी ते विविध ठिकाणी प्रवास करीत असताना लहान स्केचेस करत व त्यातून त्यांच्या चित्रनिर्मितीला प्रेरणा मिळे.

               फ्रान्समधील इंप्रेशनिस्ट चित्रकारांचा प्रभाव बेंद्रे यांच्यावर पडला आणि त्यातूनच त्यांच्या चित्रांचा प्रवास बिंदुवादापर्यंत झाला. युरोपात स्यूरा, पिसारो यांनी बिंदुवाद ( पॉइंटिलिझम) रूढ केला. त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन होता. पॅलेटवर रंगांचे मिश्रण करण्यापेक्षा प्राथमिक रंगांचे ठिपके कॅनव्हासवर ठेवून अपेक्षित रंगछटा या पद्धतीत साकारल्या जात. त्यामुळे रंगांचा तजेला  कायम राही. इंप्रेशनिस्ट चित्रकारांनी हे तंत्र उपजत जाणिवेतून वापरले होते.

               स्यूराने प्रकाश आणि रंगांचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास करून रंगलेपनाचे तंत्र विकसित केले. बेंद्रे यांनी रंगांचे ठिपके आपल्या चित्रांमध्ये वापरले त्याचे मूळ हस्तिदंती लघुचित्रशैलीत असल्याचे ते सांगत असत. हस्तिदंतावर फिकट निळा रंग देऊन रंगांचे बारीक ठिपके एकमेकांजवळ ठेवतात. एकावर एक रंगांच्या ठिपक्यांचे थर दिले जातात. बेंद्रे यांनी हे तंत्र आपल्या चित्रांमध्ये वापरले. यामुळे त्यांच्या चित्रांमध्ये आलंकारिकता आली. पण या ठिपक्यांच्या शैलीत इंप्रेशनिझम आणि पॉइंटिलिझमचे संस्कारही आहेतच.

               भारतातला निसर्ग आणि लोकजीवन, आदिवासी स्त्रिया त्यांच्या चित्रांमधून दिसत असल्या तरी रूढ निसर्गचित्रांपेक्षा त्यांची रचनाचित्रे वेगळी वाटतात ती त्यांच्या शैलीमुळे. अनावश्यक तपशील गाळून दृश्य आकारांची केलेली लयबद्ध मांडणी, रंगांच्या ठिपक्यांनी बनलेली, पॉइंटिलिस्ट शैलीशी साधर्म्य असलेली आणि नंतरच्या काळात बेंद्रे यांच्या शैलीचे व्यवच्छेदक लक्षण बनलेली रंगलेपनपद्धती आणि प्रकाशाच्या तरल आणि गूढ रंगछटा टिपणारी रंगसंगती ही त्यांच्या शैलीची वैशिष्ट्ये आहेत.

               ए.एक्स. त्रिंदाद यांचे व्यक्तिचित्रण, चीनची पौर्वात्य चित्रशैली, बोनार्डची इंप्रेशनिस्ट शैली, युआन ब्राकचा क्यूबिझम, असे अनेक प्रभाव त्यांनी डोळसपणे स्वीकारले. सूर्यफुलाच्या त्यांच्या प्रसिद्ध चित्रात व्हॅन गॉग आणि ब्राक या दोन्हींचा प्रभाव दिसतो आणि पॉइंटिलिझमच्या तंत्रात इंप्रेशनिस्ट शैलीचा. त्यांची चित्रे कधीकधी उच्चभ्रू आणि आलंकारिकतेकडे झुकलेली वाटली तरी त्यांचा आत्मा भारतीय असल्याने ती अनुभवाशी प्रामाणिक राहिली.

               बेंद्रे यांना त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे अनेक मानसन्मान प्राप्त झाले. भारत सरकारने त्यांना १९६८मध्ये आणि १९९१ मध्ये अनुक्रमे ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मविभूषण’ सन्मान दिले. त्यांना १९८५ मध्ये मध्यप्रदेश शासनाने ‘कालिदास सन्मान’ देऊन गौरविले. ललित कला अकादमी, दिल्लीचे ते अध्यक्ष झाले, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या आंतरराष्ट्रीय ‘त्रिनाले’ प्रदर्शनाचे त्यांनी  ज्युरीपद आणि अध्यक्षपद सांभाळले.

               त्यांच्या नावे १९९०-९१ मध्ये ‘बेंद्रे फाउण्डेशन ट्रस्ट’ स्थापण्यात आला. जहांगीर आर्ट गॅलरीच्या ‘मॉन्सून शो’मध्ये १९९०-९१ पासून या ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कलाकृतीला बक्षीस दिले जाते. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनामध्ये तरुण कलाकारांना बेंद्रे-हुसेन शिष्यवृत्ती दिली जाते, तर ‘उज्जैन कलावर्त न्यास’तर्फे गेली अकरा वर्षे बेंद्रे यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना पुरस्कार दिला जातो.

- प्रा. अनंत बोवलेकर

 

संदर्भ
संदर्भ: १. बहुळकर साधना; ‘अजुनि चालतोचि वाट’, बेंद्रे यांची मुलाखत; रविवार ‘सकाळ’, २० ऑगस्ट १९८९. २. चटर्जी, राम; ‘बेन्द्रे : दी पेन्टर अॅण्ड दी पर्सन’; दी बेन्द्रे फाउण्डेशन फॉर आर्ट अॅण्ड कल्चर अॅण्ड इण्डस कॉर्पोरेशन, इंडिया; १९९०.
बेंद्रे, नारायण श्रीधर