Skip to main content
x

बीडकर, गणपत रंगनाथ

     बीड येथे सराफीचा व मोटार सर्व्हिसचा व्यवसाय करणाऱ्या उदार, दानशूर रंगनाथ नाईक (दादा) यांच्या श्रीमंत घराण्यात श्री.गणपत रंगनाथ उर्फ बबनराव बीडकर यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बीड, उस्मानाबाद मार्गावरील कुंथलगिरी येथील जैन साधू पार्श्‍वसागरमहाराज यांच्या आश्रमात झाले.

      येथेच लहानपणी राष्ट्रीयत्व, जातिनिर्मूलन व धार्मिक उदारतेची प्रेरणा मिळाली. शिक्षणामध्ये अनंत अडचणी आल्या परंतु अनेक सामान्य माणसांनी मदतीचा हातही पुढे केला. इ.स. १९३०-३१ ला १ वर्ष नगरला मराठी शाळेत तद्नंतर लातूर, सोलापूर, बार्शी करीत करीत ऑगस्ट १९४५ मध्ये पुन्हा अहमदनगरला द. वि. आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली मॉडर्न हायस्कूलमध्ये स्थिरावले व जैन बोर्डिंग मध्ये वास्तव्य केले. अहमदनगर येथे उ. भा. कोठारी मित्र म्हणून लाभले. त्यांच्या समवेत राष्ट्र सेवा दल शाखेत जाऊ लागले. परिणामी स्वातंत्र्य चळवळीबद्दल मनात तीव्र आकर्षण पैदा झाले. विद्यार्थी दशेतच सन १९४२ च्या लढ्यात उडी घेतली. येरवड्याचा कारावास अनुभवला. कृतीला विचारांचे खंबीर अधिष्ठान दिले. सन १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. त्यावेळी बीडकर रझाकारविरोधी हैद्राबाद संग्रामामध्ये गुंतले होते. याच काळात साने गुरुजींच्या सहवासात राहाण्याची त्यांना संधी मिळाली.

     राष्ट्रीय कार्य आणि काळाची गरज म्हणून एकीकडे नियमित शिक्षणामध्ये सातत्याने खंड पडत राहिला, तरीही राष्ट्रभाषा हिंदीच्या विविध परीक्षा देऊन राष्ट्रभाषेवर प्रभुत्व मिळविले. विद्यार्थ्यांचे वर्ग चालविले. अहमदनगरच्या ‘मिलिटरी हिंदी हायस्कूल’ मध्ये शिक्षक होऊन अध्यापन कार्याची सुरुवात केली. साधारण एका तपाच्या कालावधीनंतर सदर शाळेतील हिंदी विभाग बंद करण्यात आल्यामुळे अमराठी भाषिक विद्यार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी म्हणून १४ जून १९६४ रोजी ‘पं. नेहरू हिंदी विद्यालयाची’ स्थापना आपल्या शिक्षक मित्रांच्या सहकार्याने केली. विद्यार्थी संख्या वाढती राहिली. तरी सुद्धा ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ या न्यायाने सुमारे एका तपापेक्षा अधिक काळ नगर पालिकेची सिद्धी बागेतील इमारत, दादा चौधरी विद्यालय व रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या इमारतीमध्ये पं. नेहरू विद्यालय सर्कशीच्या तंबूप्रमाणे फिरते राहिले. येथेच  बीडकरांच्या जिद्दीची, चिकाटीची व त्यागाची कसोटी लागली.

      ज्या नगरमध्ये एक विद्यार्थी म्हणून शिक्षण घेतले त्याच नगरमध्ये पूज्य साने गुरुजींचा आदर्श समोर ठेवून एका आदर्श शिक्षकाचीही भूमिका तन-मन-धनाने वठवली. स्वत:च्या कर्तृत्वाने हिंदी माध्यमाचे स्वतंत्र विद्यालय स्थापन करून ते नावारूपाला आणण्यात आयुष्यातील अनेक वर्षे खर्ची घातली.

      प्रवाहाविरुद्ध पोहत असल्याने अनेक फटके बसले तरीसुद्धा स्वत:च्या पूर्णत्वाचा कधी, कोठे आव आणला नाही. कसोटीच्या प्रत्येक क्षणी पत्नी प्रतिभाताई आणि मित्रांचा कस लागला. प्रत्येक कृती आणि निर्णयामध्ये प्रामाणिकपणा ठेवला.  

- प्रा. विश्‍वास काळे

संदर्भ
१. वेचीत काटे चाललो (आत्मचरित्र)
बीडकर, गणपत रंगनाथ