बंकटस्वामी, महाराज
बंकटस्वामी महाराज यांचा जन्म मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील निनगूर येथील निहालसिंग व रत्नाबाई या रजपूत दाम्पत्याच्या पोटी शके १७९९ मध्ये झाला. त्यांचे मूळ नाव व्यंकटेश होते. त्याचे व्यंकट व पुढे बंकट झाले. लहानपणापासून त्यांना भजनाची विशेष आवड होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले होते.
अत्यंत गरिबीमुळे व्यंकटेश यांना पुढे शिक्षण घेता आले नाही. शिक्षण अर्धवट सोडून शेळ्या-मेंढ्यांची, गाई-म्हशींची राखण करण्याचे काम त्यांना करावे लागले. या कामातही त्यांचे मन मात्र सदैव हरिभजनात रंगलेले असायचे. पुढे त्यांनी स्वत:च मृदुंगवादन व संगीताचा एकलव्याप्रमाणे अभ्यास केला आणि काही साथीदार निवडून भजनी मंडळ सुरू केले. नोकरीनिमित्त त्यांना निनगूर गाव सोडून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे जावे लागले. तेथेही त्यांनी आपल्या भजनाच्या आवडीने एक भजनी मंडळ सुरू केले. गावोगावी त्यांच्या भजनांचे सुश्राव्य कार्यक्रम होऊ लागले. इथेच त्यांची भेट लक्ष्मणबुवा इगतपुरीकर या वारकरी संप्रदायातील मुमुक्षू तरुणाशी झाली. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू गुरुवर्य विष्णुपंत जोग महाराज हे एकदा इगतपुरीला आले असताना तरुण उत्साही बंकटला त्यांचा संतसंग लाभला आणि बंकटच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली.
गुरुवर्य जोग महाराज बंकटला पुण्यास घेऊन आले. देहूच्या भंडारा डोंगरावर तीन वर्षे राहून बंकटने गाथा, नाथ भागवत, ज्ञानेश्वरी या ग्रंथांच्या अध्ययनाची तपश्चर्या केली. नंतर काही वर्षे ते आळंदी येथे राहिले. आळंदी येथे जोग महाराजांनी नुकतीच ‘वारकरी शिक्षण संस्था’ सुरू केली होती. त्या संस्थेत बंकट दाखल झाले व हळूहळू एकेक जबाबदार्या घेत गेले. इथे त्यांचा परिचय शं.वा. तथा सोनोपंत दांडेकर आदींशी झाला. या काळात बंकटसिंग यांनी संत साहित्याचे अहोरात्र अध्ययन केले. अजानवृक्षाखाली बसून ज्ञानेश्वरीची १०८ पारायणे केली. इथेच त्यांना ईश्वर दर्शनाचा अनुपम साक्षात्कार झाला. १९२० साली गुरुवर्य जोग यांचे निधन झाले. त्यानंतर बंकटस्वामी यांनी सोनोपंतांसमवेत आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेची जबाबदारी सांभाळली. मारुतीबुवा गुरव, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर हे या वेळी त्यांचे सहकारी होते.
श्री बंकटस्वामींना मानणारा अफाट भाविकवर्ग अवघा महाराष्ट्रभर होता. त्यांनी प्रवचने, कीर्तने, भजनांचे अनेक सोहळे गावोगावी साजरे केले. ज्ञानेश्वरी पारायणांचे सामूहिक सोहळे भरवून संतबोधाचा संदेश तळा-गाळातील समाजात पोहोचविला. सर्वांना सहजपणे ज्ञानेश्वरी समजावी म्हणून त्यांनी सार्थ ज्ञानेश्वरी तयार केली. पंढरपूर येथे येणार्या वारकरी बांधवांच्या निवासाची गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी लोकसहभागातून प्रचंड मोठी धर्मशाळा बांधली व एका ट्रस्टच्या ताब्यात दिली. ते स्वत: वाळवंटात राहत होते. हा कल्पनातीत नि:स्पृहपणा व सेवाभाव हीच बंकटस्वामींची ओळख होय.
संत मुक्ताबाईंच्या समाधिस्थानी ‘मेहूण’ की ‘एदलाबाद’ या वादावर त्यांनी संत नामदेवांच्या अभंगांचा सूक्ष्म अभ्यास करून त्या स्थानावर मुक्ताबाईंची सुंदर मूर्ती स्थापन केली व ते स्थान वारकर्यांमध्ये प्रिय केले. वारकरी संप्रदायामध्ये बंकटस्वामींचे योगदान फार मोठे आहे. अशा या भागवत-भक्ताचे वैशाख वद्य प्रतिपदेला वृद्धापकाळाने ईश्वरचिंतन करीत असताना त्यांच्या निनगूर या जन्मगावीच निधन झाले.