Skip to main content
x

बोराडे, रावसाहेब रंगनाथ

     ग्रामीण कथाकार रावसाहेब रंगनाथ बोराडे यांचा जन्म, घडण, शिक्षण लातूर (मराठवाडा) जिल्ह्यातील काटगाव येथे झाले. शेतकरी कुटुंबातले लहानपण जगताना, मराठवाड्यातील मराठा समाज हा त्यांच्या अवलोकनाचा आणि नंतर चिंतनाचा विषय झाला.

     मॅट्रिकला असताना ‘सकाळ’ कथास्पर्धेतील ‘वसुली’ कथेने त्यांची छापील अक्षरांशी ओळख झाली. परभणी येथील शिवाजी महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेऊन ते प्राध्यापक झाले. तोवर कथालेखनाने वेग घेतला होता. वैजापूर येथील विनायकराव पाटील विद्यालयाचे प्राचार्य आणि नंतर देवगिरी कॉलेज, औरंगाबादचे ते प्राचार्य झाले.

     शैक्षणिक क्षेत्रातल्या कार्याला समांतर असे त्यांचे साहित्यिक कार्यही जोमाने चालू होते. बालसाहित्य, वगनाट्य, ग्रामीण साहित्य (समीक्षा) असे लेखन असले, तरी त्यांची ठळक नाममुद्रा एका कथाकार म्हणून उमटली आहे.  ‘पेरणी’ (१९६२), ‘ताळमेळ’ (१९६६), ‘मळणी’, ‘वाळवण’ (१९७६), ‘राखण’ (१९७७), ‘खोळंबा’ (१९८३), ‘नातीगोती’ (१९९५), ‘कणसं आणि कडबा’ (१९९४) असे त्यांचे पंधरा कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. कथासंग्रहाच्या शीर्षकावरूनच त्यांचा आशय समजतो. मराठवाडी बोलीभाषेचा वास्तव वापर त्यांच्या कथांतून केलेला दिसून येतो.

     ‘पाचोळा’ (१९७१), ‘सावट’ (१९८७), ‘चारापाणी’ (१९९०) आणि ज्या कथानकावर नाटक निघाले ती ‘आमदार सौभाग्यवती’ (१९८८) या कादंबर्‍या त्यांच्या एकूणच साहित्य कर्तृत्वाची साक्ष देतात. मराठवाड्यातले ग्रामीण वास्तव, बलुतेदार, सणवार, श्रद्धा-अंधश्रद्धा, कुटुंबरचना, कुचंबणा झालेल्या बायकामुली, खाणीलेणी, सरकारी योजनांचे आमिष, फसगती, प्रगती आणि अधोगती, गावगाड्याचे राजकारण असा सम्यक ग्रामीण परिसर त्यांच्या साहित्यात समूर्त होतो.

     ग्रामीण साहित्याचे मनोहारी दर्शन घडवणारे बोराडे यांचे साहित्य योगदान जितके महत्त्वाचे आहे, तितकेच शैक्षणिक क्षेत्रातील योगदानही आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.

    कथाकार, कादंबरीकार आणि ग्रामीण पार्श्वभूमीवर विनोदी कथा लिहिणारे मिस्कील शैलीचे बिनीचे कथाकार म्हणून बोराडे परिचित आहेत.

      - डॉ. सुवर्णा दिवेकर

बोराडे, रावसाहेब रंगनाथ