Skip to main content
x

बरवे, भालचंद्र लक्ष्मण

     हाराष्ट्रातील पहिल्या काही हिंदू पर्शियन भाषा शिक्षकांपैकी एक असलेले भालचंद्र लक्ष्मण बरवे म्हणजेच मधुकाका बरवे. चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश शाळेमध्ये पर्शियन भाषेचे शिक्षक आणि १९७४ ते १९७७  मुख्याध्यापक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. मोठे  भाऊ वि. ल. बरवे ( कवी आनंद) हे साहित्यिक होतेे. त्यांच्या आग्रहामुळे अन्य भाषेच्या शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील वाडिया महाविद्यालयामधून पर्शियन भाषेत कला शाखेची पदवी मिळविली. त्यानंतर चिपळूण मध्ये शिक्षक म्हणून नोकरीस सुरूवात केली. लक्ष्मण भालचंद्र ऊर्फ मधुकाका बरवे यांचा जन्म चिपळूण येथे झाला. त्यांचे मूळ गाव सोनगाव. परंतु शिक्षणासाठी त्यांचे कुटुंब चिपळूणमध्ये राहावयास आले. घरच्या धार्मिक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतील राष्ट्रीय संस्कारात त्यांची वाढ झाली. यातूनच पुढे ते शिक्षणानंतर काही वर्षं गुजरात मध्ये संघाचे प्रचारक होते.

      शिक्षक म्हणून काम करत असतानाच त्यांनी बी.पी.एड ची पदवी प्राप्त केली. पर्शियन भाषा शिक्षक असल्याने त्यांचा मुस्लीम विद्यार्थ्यांशी संबंध येत असे. त्यांना ते वैयक्तिक मार्गदर्शन करीत असत. पर्शियन भाषेबरोबरच शारीरिक शिक्षण व भूगोल हे त्यांचे आवडते विषय. सांस्कृतिक, शारीरिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा यासाठी ते प्रोत्साहन देत. त्याचबरोबर विविध स्पर्धांचे आयोजन देखील करीत. भूगोल विषयात विद्यार्थ्यांना रस निर्माण व्हावा यासाठी शाळेच्या एका खोलीत त्यांनी खास भूगोलाची प्रयोगशाळा तयार केली. त्यात वेगवेगळ्या प्रतिकृती, नकाशे यातून भूगोल विषय सोपा करून शिकविता येत असे.

     शाळेचा वार्षिक अंक निघावा यासाठी त्यांचा प्रयत्न असे. हमीद दलवाई, कमलाबेन चितळे यासारख्या लेखकांची सुरुवात ‘नवजीवन’ या वार्षिक अंकातून झाली. मधुकाका स्वतः उत्तम चित्रकार असल्याने ते अंकांचे मुखपृष्ठ तयार करीत.

     याचबरोबर खेड्यातील मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी शिक्षक मित्रांना घेऊन ते वेगवेगळ्या खेड्यात शिकवायला जात असत. तसेच पुढील शिक्षणासाठी त्या मुलांना शहरात आणून त्यांची सोय स्वतःच्या व ओळखीतील लोकांच्या घरी करायचे.

     परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूणचे अध्यक्ष, शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष याचबरोबर अनेक स्थानिक संस्थांवर पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केले. त्याचबरोबर १९६६ मध्ये चिपळूण येथे महाविद्यालय सुरू करण्यातही त्यांचा सहभाग होता. त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना शासनातर्फे ‘आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्काराने’ गौरविण्यात आले. याचबरोबर सामाजिक कामाच्या आवडीतून विविध ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी वक्ते म्हणून जात. मार्डोली या खेडेगावात कायमचे आरोग्य केंद्र ही त्यांनी उभे केले. तसेच रा. स्व. संघाचे विभाग कार्यवाह, विश्‍व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री म्हणूनही त्यांचा सामाजिक जीवनात वावर होता. ते उत्तम चित्रकार होते. तबलावादन करीत, तसेच अभिनय व गायनाचीही त्यांना आवड होती.

     - विवेक वि. कुलकर्णी

बरवे, भालचंद्र लक्ष्मण