Skip to main content
x

बत्तिन, पोटयन्ना पापय्या

     पोटयन्ना बत्तिनांचे वडील पापय्या बत्तिन आपले मामा यलम्मा अंकम यांच्या बरोबर आंध्र प्रदेशातून अहमदनगर येथे सन १८६१ मध्ये उपजिविकेसाठी स्थलांतरित झाले. पापय्यांचे अंगी व्यवसायातील नैपुण्य, कष्टाळूपणा, कुशाग्र बुद्धी, समाजाभिमुखता इ. गुण असल्यामुळे अल्पावधीतच त्यांनी एक सुखवस्तू कारखानदार म्हणून नावलौकिक मिळविला.

     पोटयन्ना बत्तिन यांचे वडील पापय्या १९०१ मध्ये निवर्तले. थोरले बंधू मेघय्या यांनी कुशाग्र बुद्धी, अफाट स्मरणशक्ती आणि काम करण्याची चिकाटी असणाऱ्या धाकट्या पोटयन्नाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. पोटयन्नान यांना विद्यालयात शिष्यवृत्ती मिळाली होती. शिक्षणाबरोबरच त्यांनी  शरीरसंपदा प्राप्त केली. अनेक मैदानी स्पर्धेत नैपुण्य प्राप्त केले.

     १९०३ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी लक्ष्मीबाई म्याना हिच्याशी ते विवाहबद्ध झाले. मॅट्रिकची परीक्षा उत्तम रीतीने उत्तीर्ण होऊन महादेव मल्हार जोशी यांच्या कृपाछत्राखाली जुनागढ (गुजरात) मध्ये उच्च शिक्षणासाठी रवाना झाले. परंतु घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यास येऊन फर्गसन महाविद्यालयामध्ये दाखल झाले. वार लावून, विविध घरी किरकोळ कामे करून, धनिक मित्रांची आर्थिक मदत घेऊन १९०९ मध्ये पद्मशाली समाजातील पहिल्या पदवीधराचा मान मिळविला.

     आर्थिक ओढाताणीमुळे इच्छा व पात्रता असूनही पुढील शिक्षण घेता न आल्याने पूर्व संकल्पानुसार शिक्षकी पेशा पत्करला. १९१२ मध्ये ठाणे विद्यालयामध्ये नोकरी मिळाली. पुढील वर्षी मुंबई येथील एल्फिस्टन विद्यालयामध्ये बदली झाली. याच वेळी एस.टी.सी. परीक्षा उत्तीर्ण केली. तद्नंतर जळगाव येथे नेमणूक मिळाली.

      जळगावहून पुण्यास ‘क्रीडा शिक्षक’  म्हणून नेमणूक झाली. त्यांच्या कार्य - कौशल्यामुळे पुण्यातील विद्यालयाला ‘नॉर्थ कोट शील्ड’ मिळाली. पुढे पुण्यातीलच प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये रुजू होऊन आणखी सन्मान मिळविला. परिणामी खात्याने अहमदनगर येथील प्रशिक्षण महाविद्यालयाची मूहूर्तमेढ रोवण्यासाठी नगरला पाठविले. पुढे नगरहून सातारा, नारायणगाव, लोणी काळभोर, बोर्डी, धुळे अशी भ्रमंती केली.

      सन १९४० मध्ये पुण्यास उप-प्राचार्य म्हणून बदली झाली. शेवटची दोन वर्षे कै. कृष्णशास्त्री चिपळूणकरांसारख्या विद्वानांनी विभूषित केलेल्या ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन्स, पुणे येथे प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

      आपुलकी, बंधुभाव, निर्भयता, स्वावलंबन इ. गुणांची विद्यार्थ्यांमध्ये जोपासना करणाऱ्या या गुरुवर्यामध्ये शांत वृत्ती, तर्कशुद्ध विचारसरणी, चिकित्सक बुद्धी व कोणताही विषय पटवून देण्याची विलक्षण हातोटी होती. महाविद्यालयाचे कामकाज, सरकार-दरबारची कामे, मराठी बुक कमेटी “प्राथमिक शिक्षण” मासिक अशी व्यापाची अनेक कामे त्यांनी लीलया पार पाडली. प्राचार्य पदावरून ते १९ जून १९४३ रोजी निवृत्त झाले. तत्पूर्वी शेकडो शिक्षक तयार केले.

      स्वत: सुशिक्षित व नोकरी पेशातील जीवन जगूनही त्यांनी आपल्या समाजास कधी दूर लोटले नाही. उलटपक्षी समाजामध्ये आमूलाग्र परिवर्तन आणण्यासाठी सतत परिश्रम केले. शासकीय नोकरीची बेडी पायात असूनही साक्षरता प्रसारासाठी १९२० मध्ये ‘पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाची’ स्थापना केली.

       तेलगु भाषिक मुला - मुलींना शिकविण्यासाठी तेलगु भाषिक परंतु मराठीच्या जाणकार शिक्षकांच्या अहमदनगर स्कूल बोर्डात बदल्या करून घेतल्या. शैक्षणिक संस्था चालविताना येणाऱ्या आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी पद्मशाली बांधवांना एकत्रित करून व घरोघरी जाऊन निधी गोळा केला. आज या संस्थेमार्फत ‘श्री मार्कंडेय विद्यालय’ अहमदनगरमध्ये कार्यरत असून त्यांचा लौकिक सर्वदूर पसरला आहे.

       सामाजिक संघठन, शैक्षणिक प्रसार, सामाजिक स्तर व प्रगल्भता यांच्या वाढीसाठी ३९ प्रतिनिधींची ‘पद्मशाली पंचकमेटी, अहमदनगर’ ची स्थापना केली. भाषेच्या अडचणीमुळे पद्मशाली समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचारावर उपाय म्हणून नगरपालिकेवर समाजाचे प्रतिनिधी निवडून आणले. समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी गुरुवर्यांचा आदर्श घेऊन अन्य शहरामंध्येही पंचकमेट्या स्थापन होऊ लागल्या.

       त्यांनी पद्मशाली समाजासाठी केलेल्या चौफेर कार्याचा गौरव म्हणून त्यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे व सोलापूर येथील पद्मशाली समाजासाठी बत्तिन यांनी केलेले कार्य आजही अविस्मरणीय असेच आहे. अखिल भारतीय पद्मशाली समाजाची संघटना आणि त्याद्वारे सुसंस्कार, परस्पर बंधुभाव, विद्याभिरुचीमध्ये वृद्धी व्हावी यासाठी ‘अखिल भारतीय पद्मशाली महाजन सभा सुरू करण्यामध्ये गुरुवर्यांचा मोलाचा वाटा होता. अष्टम् महासभा कै. दिकोंडा सायन्ना यांचे अध्यक्षतेखाली अहमदनगर येथे पार पडली. पोटयन्ना बत्तिन महासभेचे उद्घाटक होते. 

       त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकेच्छु मंडळ- मुंबई, पद्मशाली समाज सेवा संघ पुणे, आंध्र विद्याश्रम, औंध संस्थान, पद्मशाली युवक मंडळ, गंज पेठ, पुणे इ. संस्था कार्यरत असून शेकडो कार्यकर्ते भारतभर गुरुवर्यांच्या प्रेरणेने कार्य करीत आहेत.

      समाज सेवेचे व्रत घेतलेल्या बत्तिन यांनी आपल्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम २० हजार रूपये अहमदनगर येथील पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाला देणगी म्हणून दिली. गुरुवर्यांची स्मृती म्हणून मंडळाची “कै. प्राचार्य पोटयन्ना बत्तिन प्राथमिक शाळा” आज डौलाने उभी आहे.

      त्यांच्या मृत्युपत्रानुसार त्यांची सर्व स्थावर-जंगम मिळकतीची विक्री करून त्यांच्या नावाने संस्था स्थापन झाली असून पुणे शहरात संस्थांचे विविधांगी समाज कार्य चालू आहे.

- प्रा. शंकर  गागरे

संदर्भ
१. गुरुवर्य पोटयन्ना बत्तिन शताब्दी स्मरणिका १९९०.
बत्तिन, पोटयन्ना पापय्या