Skip to main content
x

बुडुक, प्रल्हाद दत्तात्रय

              त्तात्रय प्रल्हाद बुडुक यांनी मुंबईतील परळ येथील हाफकिन संस्थेमध्ये सर्पदंशावर उपचार म्हणून हमखास प्राण वाचवणारे प्रतिविष तयार करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या गावी झाला. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण जळगाव, माध्यमिक शिक्षण पाचोरा व महाविद्यालयीन शिक्षण नाशिक येथे घेतले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून १९७४मध्ये एम.एस्सी.ची व १९८३मध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर डॉ.बुडुक यांनी एक वर्ष पशु-संवर्धन खात्यात नोकरी केली. ते १९६०मध्ये परळ येथील सुप्रसिद्ध हाफकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन मर्यादित या महाराष्ट्र शासन अंगीकृत संस्थेतील प्रतिक्षमता विभागात रुजू झाले. त्यांची १९६३मध्ये उपसंचालक पदासाठी निवड झाली व ते पिंपरी (पुणे) येथील अश्‍व प्रक्षेत्रावर रुजू झाले. त्यानंतर यथावकाश त्यांची लोकसेवा आयोगाकडून सहआयुक्त पदासाठी निवड झाल्यावर ते परळ येथे उत्पादन व्यवस्थापक म्हणून काम करू लागले.

              डॉ.बुडुक यांनी हाफकिन संस्थेमध्ये अश्‍व रक्तजल घेण्याबाबत सुधारित कार्यप्रणाली सुरू केली. त्यांनी घोड्याचे ६ ते ८ लीटर रक्त काढून व त्यातील रक्तजल (सिरम) वेगळे करून राहिलेल्या रक्तपेशी पुन्हा त्याच घोड्याला टोचल्या. (पूर्वी या रक्तपेशी फेकून देत किंवा नष्ट करत असत.) या कृतीमुळे सतत रक्त काढल्याने होणाऱ्या रक्तक्षयाचे प्रमाण कमी झाले आणि घोड्यांचे आयुष्यमान ५ ते ६ वर्षांनी वाढले, तसेच यामुळे कमी खर्चात दुप्पट प्रमाणात रक्त प्राप्त करणे शक्य झाले.

              नाग, मण्यार, घोणस व फुरसे या चार विषारी सर्पांचे एकत्रित प्रतिविषही डॉ.बुडुक यांनी बनवले. सर्पदंशाच्या उपचारासाठी लागणारी सर्व उपकरणे, सुई, कापूस प्रतिविष व झार आवश्यक औषधांबरोबर एका संचाच्या स्वरूपात पुरवण्यात येऊ लागले. सर्व वस्तू एकाच वेळी उपलब्ध झाल्यामुळे तत्काळ उपचार करणे व जीव वाचवणे शक्य झाले. सर्व समुद्रसर्प विषारी असतात. त्यांचे प्रतिविष उपलब्ध नव्हते. डॉ.बुडुक यांनी हाफकिन संस्थेमध्ये काही समुद्रसर्प पाळले आणि जगात प्रथमच त्यांचे प्रतिविष तयार करण्यात यश मिळवले. नाविक दलातील सैनिक, अधिकारी तसेच मच्छीमार कोळीबांधवांसाठी हे संशोधन जीवदान देणारे ठरले.

              काही व्यक्तींना अश्व रक्तजलाची अ‍ॅलर्जी असते व त्यांच्यासाठी ते प्रतिविष वापरणे धोकादायक असते. अशा व्यक्तींसाठी संस्थेने बैलाच्या रक्तापासून प्रतिविष तयार केले व ते तितकेच परिणामकारक असल्याचेही सिद्ध केले. आशिया खंडात प्रथमच असे संशोधन करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाने या प्रकारचे प्रतिविष वापरण्यास मान्यता दिली. विंचवाच्या विषाचे प्रतिविष (अश्‍व रक्तजल) संस्थेमध्ये तयार करण्यात आले. बारा व्होल्ट (ए.सी.) विजेचा शॉक विंचुदंशाच्या जागी दिल्यास विष लगेच विघटित होते व त्यामुळे विषाचा दुष्परिणाम टाळता येतो, हे डॉ.बुडुक यांनी सिद्ध केले. वेगवेगळ्या सहा अ‍ॅडज्युव्हंटस्चा वापर करून प्रतिक्षमता वाढवता येते हेही त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. श्‍वानदंशावर स्थिर केलेले विषाणू वापरून अश्‍वांमध्ये प्रतिक्षम रक्तजल तयार केले. यामुळे रेबीज या भयावह रोगाचे नियंत्रण करणे व मनुष्यांची जिवितहानी वाचवणे शक्य झाले. तसेच त्यांनी संशोधनावर आधारित मेंंढ्यांच्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपायही निश्‍चित केले. गाय व म्हैस यांच्या दुधातील भेसळ ओळखण्यासाठी त्यांनी ‘हंसा परीक्षा’ विकसित करण्याचे काम केले.

              डॉ.बुडुक यांनी लंगूर वानरे व ससे यांचा वापर करून हेपटायटिस बी विषाणूबाबत संशोधन केले. शरीरात प्रथिनांची कमतरता (४०%) असेल तर रोगप्रतिकार क्षमतेवर विपरीत परिणाम होतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. दुष्काळात रोग प्रादुर्भाव झाल्यावर लसीकरणाबरोबर प्रथिनयुक्त आहार दिल्यास जनावरांची प्रतिकारशक्ती वाढते व त्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी करता येते. लहान मुले, वृद्ध, आदिवासी इत्यादींसाठी या निष्कर्षाचा चांगला उपयोग झाल्याचे आढळून आले.

              विषाणुजन्य लसी निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेली सालमोनेल्लारहित अंडी उत्पादनाचे कार्यही डॉ. बुडुक यांनी सुरू केले. प्रयोगशाळांतील चाचण्यांसाठी लागणारे शुद्ध जातीचे पांढरे उंदीर, ससे, गिनीपिग, हॅमस्टर, तितर (क्वेल) इ. लघुप्राणी स्वतंत्र कक्षांमध्ये जोपासले व शास्त्रशुद्ध कार्यप्रणाली विकसित केली. जागतिक स्तरावरील अनेक तांत्रिक चर्चासत्रांमध्ये त्यांनी आपले संशोधनपर निबंध सादर केले. त्यांचे १६ तांत्रिक व संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले. त्यांनी सर्व प्रतिविष प्रयोगशाळेतील लघुप्राणी व त्यांची जोपासना, प्रयोगशाळांमधील निरनिराळ्या चाचण्या व त्यांचे निष्कर्ष, रेबीज, हंसा परीक्षा, औषधांचे पृथक्करण इ. विषयांवर मुंबई विद्यापीठ संलग्न असलेल्या महाविद्यालयात, तांत्रिक प्रशिक्षण शिबिरांमध्ये आणि आकाशवाणीवर भाषणे दिली. भारतीय प्रमाणक नियंत्रण कार्यालयाच्या जनावरांची वाहतूक समिती, आयसोटोपविषयक समिती व शल्यचिकित्सेसाठी आवश्यक अवजारे याबाबतच्या समितीवर डॉ. बुडुक यांनी सदस्य म्हणून काम पाहिले.

              डॉ.बुडुक यांनी बांगलादेशातील ढाका येथील सार्वजनिक आरोग्य संस्थेत जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ सल्लागार म्हणून १९९२-९६ या काळात काम केले. तेथे त्यांनी सुसज्ज प्रयोगशाळा स्थापन केली. त्यांनी चार विषारी सापांच्या विषांचा वापर करून प्रतिकारक्षम अश्‍व रक्तजल, धनुर्वात-प्रतिकारक्षम अश्‍व रक्तजल तयार करण्याचे प्रशिक्षण संशोधकांना व कर्मचाऱ्यांना दिले आणि लसींचे उत्पादन सुरू केले.

              सेवानिवृत्तीनंतर डॉ.बुडुक यांनी इटालॅन कंपनी (चेंबूर), पेस लॅबोरेटरी (पवई), र्डेफोडिल फार्मा कंपनी (पवई), युनायटेड फॉस्फरस कंपनी (वापी), युनिक फार्मा कंपनी (अंकलेश्‍वर), बायोजेनेटिक इंडिया फार्मा (लोणावळा), अलेंबिक कंपनी (बडोदा) व बायोविन फार्मा (डोंबिवली) या खासगी संस्थांमध्ये विषतज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन केले.

              भारतीय भौगोलिक जीवनशास्त्र संघटनेने डॉ.बुडुक यांना संघटनेचे सन्माननीय सदस्यत्व आणि मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पशुवैद्यांच्या संघटनेने मानद सदस्यत्व पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला. त्यांची अष्टपैलू कामगिरी लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने त्यांची विषतज्ज्ञ म्हणून निवड केली व त्यांचा यथोचित गौरव केला. एफ.ए.ओ.तज्ज्ञ म्हणून मान्यता मिळालेले डॉ.बुडुक हे महाराष्ट्रातील एकमेव पशुवैद्य असावेत.

- डॉ. वि. वै. देशपांडे

बुडुक, प्रल्हाद दत्तात्रय