Skip to main content
x

बुवा, विनायक आदिनाथ

     विनोदाशी कायम नाते जोडून रसिकांच्या मनात स्थान मिळवणार्‍या वि.आ. बुवा यांचा जन्म पंढरपूर येथे झाला. पंढरपूर आणि मिरज येथे त्यांचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाले. व्ही.जे.टी.आय. (मुंबई) येथे ४२ वर्षे नोकरी करून ते १९८६ मध्ये निवृत्त झाले. त्यांचे वास्तव्य कल्याण येथे आहे. १९५० पासून त्यांनी लेखनाला प्रारंभ केला. आत्तापर्यंत त्यांची १४१ पुस्तके प्रसिद्ध झाली असून आणखी ९ पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. मुंबई आकाशवाणीसाठी त्यांनी सहाशे कार्यक्रमांचे लेखन केले आहे. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर त्यांचे व्याख्यानांचे आणि कथाकथनाचे सुमारे एक हजार कार्यक्रम झाले आहेत. शासकीय नाट्यस्पर्धेसाठी त्यांनी अनेक वर्षे परीक्षक म्हणून काम केले आहे. काही काळ त्यांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. अनेक नियतकालिकांमधून त्यांचे सुमारे दोन हजार लेख प्रसिद्ध झाले आहेत. गेली साठ वर्षे ते दिवाळी अंकांसाठी लेखन करीत आहेत. त्यातून आणि निरनिराळ्या विशेषांकांमधून सुमारे १००० कथा आणि लेख असे त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले आहेत. संस्कृतची त्यांना विशेष आवड आहे.

     वि.आ.बुवा यांनी कथा, लघुकादंबरी, ललितलेख, एकांकिका, व्यक्तिचित्रे, लोकनाट्य अशा अनेक क्षेत्रांत लेखन केले. यांमध्ये त्यांनी लिहिलेल्या नाटकांचा आणि अन्य लेखनाचाही समावेश आहे. वि.आ.बुवा यांचे ‘उगीच काहीतरी’, ‘एकविसावा नग’ , ‘ओष्ठतंत्रम्’, ‘कशासाठी पैशासाठी’, ‘खटाटोप’, ‘खट्याळ काळजात घुसली’ हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. तसेच ‘इकडे अंबू तिकडे गंगू’, ‘एक एक चमचा’, ‘चिंतू द ग्रेट’ या लघुकादंबर्‍या त्यांनी लिहिल्या आहेत. ‘एकापेक्षा एक’ आणि ‘पुढे चालू ठेवू’ या एकांकिकांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांनी लिहिलेली टिकोजीराव, वासुदेव शेख महंमद ही व्यक्तिचित्रे प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘तीन दांडेकर आणि एक मालन’ या नाटकाचे लेखनही केले आहे. आकाशवाणीसाठी त्यांनी ‘सहज सुचलं म्हणून’, ‘पुन्हा प्रपंच’ आणि ‘आंबट गोड’ या श्रुतिकांचे तसेच ‘पोपटपंची’ या लोकनाट्याचे लेखन केले आहे. हलक्याफुलक्या विनोदी विषयावरचे ललित लेखन वि.आ.बुवा सहजगत्या करतात. ‘पापाकडून पपाकडे’, ‘पुस्तक बहात्तरी’, ‘प्रेमाची ऐशी की तैशी’ ‘निवडक नवरे’, ‘निवडक बुवा’, ‘नुकतंच सोळावं संपून सतरावं’, आदी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

     वि.आ.बुवा यांचे लेखन सुरू झाले ते प्रभाकर पाध्ये यांच्या प्रेरणेने! ‘सोबत’ साप्ताहिकातून त्यांचा लेखनप्रवास सुरू झाला. १९५०च्या सुमारास  ते काही वर्षे ‘इंदुकला’ नावाचे हस्तलिखित काढत असत. या अंकात मराठीतल्या नामवंत लेखकांचे साहित्य प्रसिद्ध होत असे. ‘अकलेचे तारे’ हे त्यांचे पहिले पुस्तक बलवंत पुस्तक भांडाराचे अण्णासाहेब परचुरे यांनी प्रकाशित केले. महाराष्ट्र ग्रंथ भांडारच्या शं.वा.कुलकर्णी यांनी काढलेला वि.आ.बुवा यांचेच साहित्य असलेला ‘बुवा’ हा दिवाळी अंक तुफान लोकप्रिय झाला.

     विपुल प्रमाणात लिहिलेले त्यांचे लेखन प्रामुख्याने सामान्य वाचकांसाठी आहे. त्यामुळे सामान्य माणसाचे दैनंदिन जीवन, त्याच्या आशाआकांक्षा, त्याची सुखदुःखे, त्याच्या जीवनातील विसंगती यांचेच दर्शन त्यांच्या साहित्यातून होते. त्यांच्या साहित्याला अफाट लोकप्रियता लाभली. कित्येक दिवाळी अंक त्यांच्या लेखनाशिवाय वाचकांच्या पसंतीला उतरत नाहीत. ‘आवाज’ दिवाळी अंकाशी त्यांचे जवळचे नाते जुळले आहे. वि.आ.बुवा आणि विनोदी साहित्य असे समीकरणच मराठी वाचकांच्या मनात तयार झाले आहे. ही त्यांच्या साहित्याला वाचकांनी दिलेली पावतीच आहे.

     १९७२ साली कल्याण येथे भरलेल्या साहित्यसंमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. पंढरपूर, ठाणे, पुणे येथे त्यांचे सत्कार झाले. त्यांच्या ‘प्रेमाची एडडज स्टाइल’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा विनोदी साहित्याचा पुरस्कार मिळाला.

- डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर

बुवा, विनायक आदिनाथ