Skip to main content
x

भागवत, मुकुंद दत्तात्रेय

             मुकुंद दत्तात्रेय भागवत यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील बार्शी गावामध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. बार्शी येथेच त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. घरात शेतीची पूर्वपिठिका असल्याने त्यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. बी.एस्सी. (कृषी) पदवीनंतर मिळाल्यानंतर त्यांनी पुणे येथील आघारकर संशोधन संस्थेत (महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टीवेशन ऑफ सायन्स - एम.ए.सी.एस.) अखिल भारतीय गहू समन्वय योजनेत डॉ. गो.बा. देवडीकर व डॉ. वि.पु. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १९७१मध्ये कामाला सुरुवात केली. सदर नोकरीत असतानाच त्यांनी पुणे विद्यापीठाच्या वनस्पती विषयांतर्गत अनुवंश व कोशिकाशास्त्रात एम.एस्सी. व पीएच.डी. पदवीसाठी संशोधन केले. १९७१मध्ये गहू संशोधनावर सुरू केलेले काम सतत ३६ वर्षे करून २००७मध्ये ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतरही ते ऑगस्ट २००७ ते मार्च २०११ या कालावधीत याच संस्थेत एमिरेटस शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या ३६ वर्षांच्या सेवा कालावधीमध्ये गव्हाच्या - बन्सी, सरबती व खपली, एमएसीएम ९, एमएसीएस १९६७, एमएसीएस २६९४, एमएसीएम २८४६, एमएसीएस ३१२५, एमएसीएस २४९६, एमएसीएस ६१४५, एमएसीएम ६२२२ व एमएसीएस २९७१ अशा एकंदर नऊ वाणांच्या विकासात व प्रचारात महत्त्वाचा वाटा उचलला, तर गव्हाच्या जंगली व लागवडीखाली असलेल्या २००० वाणांच्या संगोपनापैकी ७०० वाणांच्या सुमारे २४ गुणासाठी वर्गीकरण केले होते. नवीन वाणांच्या प्रसारासाठी पथदर्शक प्रयोगाचे शेतकर्‍यांच्या शेतावर आयोजन करण्याचे कामही त्यांनी केले होते. कोशिकाशास्त्रातील त्यांचे संशोधनही महत्त्वाचे आहे. गव्हाच्या चतुर्गुणीत वाणामध्ये प्रत्येकी ‘अ’ व ‘ब’ जिनोम गुणसुत्राची अधिक मात्रा (२प + १) असलेले वाण विकसित करून त्याची शास्त्रीय संशोधनात उपयोगिता या संबंधीचे संशोधनही त्यांनी केले होते. गव्हाच्या सुधारित वाणाच्या पैदासकार बीजोत्पादनाचे आयोजन व प्रसार करण्याचे कामही त्यांनी केले होते.

             भागवत यांचे संशोधनपर नियतकालिकामध्ये ४० संशोधनपर लेख प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच शेतकरी विषयक मासिकातून गहूविषयक लेखांना प्रसिद्धी मिळाली आहे. या संबंधी त्यांनी आकाशवाणीवरही काही भाषणे केलेली आहेत.

             भागवत यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना मराठी विज्ञान परिषदतर्फे संशोधनपर लेखनासाठी प्रथम पुरस्कार ऑक्टोबर २००१ मध्ये देण्यात आला होता. त्यांनी गव्हाच्या वार्षिक कार्यशाळेत अनेक वेळा सहभाग घेतला होता. ऑगस्ट २००७मध्ये पुणे येथे भरलेल्या वार्षिक कार्यशाळेच्या आयोजनातही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. आघारकर संशोधन संस्थेच्या होळ व सोनगाव येथील प्रायोगिक प्रक्षेत्राच्या स्थापनेत व विकासात पुढाकाराने भागवत सहभागी होते, हे कौतुकास्पद आहे.

- संपादित

भागवत, मुकुंद दत्तात्रेय