Skip to main content
x

भापकर, दत्तात्रेय गोपाळ

          त्तात्रेय गोपाळ भापकर यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण अहमदनगर येथेच झाले. कृषी महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील कृषी महाविद्यालयात झाले. त्यांनी १९५१मध्ये बी.एस्सी. (कृषी), १९६१मध्ये एम.एस्सी. (कृषी), तर १९६३मध्ये अमेरिकेतील कॅनसास विद्यापीठातून वनस्पतिशास्त्र या विषयात पीएच.डी. मिळवली.

          भापकर पदवीधर झाल्यावर १९५१मध्ये त्वरित शासनाच्या कृषी खात्याचे सेवेत रुजू झाले. त्यांची सोलापूर जिल्ह्यामधील जेऊर येथे कोरडवाहू शेती केंद्रावर कृषि-अधिकारी या पदावर नेमणूक झाली. त्यांनी तेथे कार्यरत असताना कोरडवाहू शेतीमध्ये कमी कालावधीची पिके कशी घ्यावी, जमिनीच्या पोतानुसार वरखते कशी द्यावी, पीक घेण्यापूर्वी माती परीक्षण का आवश्यक आहे, या बाबींवर शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नवीन अभ्यासपूर्वक पिके घ्यावीत याचे संस्कार झाले व अनेकांनी पिके बदलली, वाण बदलले. त्यानंतर त्यांची १९५५च्या दरम्यान रायगड जिल्ह्यामधील खोपोली येथे भात संशोधन केंद्रामध्ये संपर्क संशोधक म्हणून नेमणूक झाली. त्या वेळी स्थानिक शेतकऱ्यांमध्ये या संशोधन केंद्राबाबत जरा नाखुषी होती. तसेच विद्युत केंद्रामधून वीज निर्माण करून नंतर सोडले जाणारे पाणी हे शेतीसाठी उपयुक्त नसते कारण त्यातून वीज काढून घेतलेली असते असा भीतीयुक्त गैरसमज होता. डॉ.भापकर यांनी या एकमेव गैरसमजाचे निराकरण करण्यासाठी सतत तीन वर्षे केंद्रावर उन्हाळ्यात वायंगणी (उन्हाळी भात), भाजीपाला, गहू, नाचणी इ. पिके घेतली. त्यांनी पिकांमध्ये कोणत्याही प्रकाराची पोषणमूल्ये कमी नसून चव, गुणवत्ता कमी नाही, तसेच उत्पादनामध्ये सुद्धा घट नाही, हे सिद्ध करून दाखवले. या सततच्या प्रयोगामुळे त्या भागात शेतकरी उन्हाळी भात, गहू, कडधान्ये, भाजीपाला, कलींगड ही पिके मोठ्या प्रमाणावर घेताना दिसतात. पावसाळी भाताचे पीक घेतल्यानंतर त्याच जमिनीमध्ये त्याच ओलाव्यावर गहू हे उत्तम उत्पादनाचे पीक घेता येते. काळाची गरज असणाऱ्या भात आणि नाचणी या पिकांवर येणारे रोग, विविध किडींचे आक्रमण याबाबत त्यांनी संशोधन करून या संकटावर मात करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूची दिली.

          डॉ. भापकर डिसेंबर १९८७मध्ये राहूरी येथील म.फु.कृ.वि.तून निवृत्त झाले. नंतरही त्यांनी सेवाभावी वृत्तीने सेंद्रीय शेतीचे महत्त्व व प्रसाराचे काम केले व सामूहिक शेतीबाबत चर्चासत्रे व शिबिरे घेतली . ते जलसिंचन व कमी पाण्यात उत्तम उत्पादन याबाबत मार्गदर्शन करतात. भापकरांचे १००हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत, परिषदांमध्ये २७ प्रबंध वाचले गेले आहेत. त्यांची ‘शेतीचा हिशोब’, ‘औषधी वनस्पती’, ‘भुईमूगाची लागवड’ ही तीन पुस्तके प्रसिद्ध झाली.

- मिलिंद कृष्णाजी देवल

भापकर, दत्तात्रेय गोपाळ