Skip to main content
x

भावे, पुष्पा अनंत

     पूर्वाश्रमीच्या पुष्पा प्रभाकर सरकार यांनी मराठी व संस्कृत विषय घेऊन एम.ए. केले. त्यांनी रामनारायण रुईया महाविद्यालयात अध्यापन केले. अनेक चर्चासत्रांत शोधनिबंध सादर केले. विविध पुस्तकांमध्ये ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यांनी संपादित केलेल्या ‘वेचक पुंडलिक’ (१९८५) या पुस्तकाच्या प्रस्तावनेत पुढील मुद्दे समोर ठेवून पुंडलिकांच्या कथांचे विश्लेषण केलेले आहे; कथेची घडण, अंतर्गत बांधीवपणा, कथात्म अनुभवाचे अंतर्लक्षी स्वरूप, कथेतून प्रतीत होणारी मृत्यू, बालमन आणि एकाकीपणाची विविध रूपे, प्रतिमा व प्रतिमास्वरूप होणारी वर्णने, या बाबींचा परामर्श घेताना त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे कोणाही कथालेखकाच्या कथांचे मूल्यमापन करायला उपयुक्त ठरू शकतील हे विशेष.

     ‘रङनायक’ (१९८५) या पुस्तकात ‘प्रायोगिक रंगभूमी’ हा लेख समाविष्ट केलेला आहे. त्यामध्ये प्रायोगिक म्हणजे काय?, प्रायोगिक रंगभूमीची गरज, मराठी नाट्यव्यवहारात त्याचा नकारात्मक दृष्टीने होणारा वापर, त्याच्या यशापयशाची कारणे; अशा विविध प्रश्नांचा ऊहापोह केलेला आहे.

     ‘आम्हांला भेटलेले डॉ. श्रीराम लागू’ या संपादित केलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी लागूंची नाट्यनिष्ठा, डॉक्टरी ज्ञान आणि रंगमंचीय भान यांचा त्यांनी घातलेला मेळ, वाचिक व कायिक अभिनय, त्यांच्या कलात्मक जाणिवा/उणिवा समीक्षकाच्या भूमिकेतून टिपलेल्या आहेत. याशिवाय लागूंची सामाजिक बांधीलकीची जाणीव, नास्तिकवाद, तर्कनिष्ठ विचारसरणी आणि त्यामध्ये जाणवलेली संगती आणि विसंगती यांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न भावे यांनी केलेला आहे. अवघ्या काही पानांमध्ये एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा वा कथांचा आरपार छेद घेण्याची विलक्षण हातोटी भावे यांच्यापाशी आहे.

     प्रगल्भ आणि सुस्पष्ट विचारधारा, व्यासंग आणि कृतिशीलता यांमुळे त्यांनी राजकारण, शिक्षण, रंगभूमी, साहित्य, समीक्षा अशा विविध विषयांवर लिखाण केले व वेळप्रसंगी तत्सम चळवळीत भाग घेतला.

     स्त्रीवादी दृष्टिकोनाविषयीचा समग्र विचार करायचा असेल तर तो मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, मानसशास्त्र, वाङ्मयीन समीक्षेचे तत्त्वज्ञान या विविध ज्ञानक्षेत्रांतील मर्मदृष्टी योजून करायला पाहिजे, असे मत त्यांनी स्त्री, अभ्यासासंबंधीच्या अनेक लेखांतून मांडले आहे. ‘अभिरुची : ग्रामीण आणि नागर’ (संपादक : गो.म. कुलकर्णी), ‘मराठी टीका’ (संपादक : वसंत दावतर), ‘महात्मा फुले गौरवग्रंथ’ अशा अनेक पुस्तकांमध्ये त्यांचे लेखन समाविष्ट केलेले आहे. ‘विविधज्ञानविस्तार लेख सूची’ चे (१९६८) संकलन त्यांनी केले आहे.

     दलित व स्त्रिया यांच्यासंबंधीच्या चळवळीमध्ये मानवतावादी दृष्टिकोन केंद्रस्थानी असावा या मताचा पुरस्कार करून त्या अनेक चळवळींमध्ये सहभागी झालेल्या आहेत. १९९४ साली स्थापन झालेल्या ‘पाकिस्तान - इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अ‍ॅण्ड डेमॉक्रसी’ या संघटनेच्या महाराष्ट्र शाखेच्या त्या अध्यक्षा आहेत. दोन्ही देशांची भूमिका सामान्य माणसाचे हित डोळ्यांसमोर ठेवून युद्धविरहित असली पाहिजे, या मताचा त्यांनी सातत्याने पुरस्कार केला आहे.

     - मृणालिनी चितळे

भावे, पुष्पा अनंत