Skip to main content
x

भिसे, शंकर रामचंद्र

भिसे, आचार्य

     रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील साई गावात शंकर रामचंद्र भिसे यांचा जन्म झाला. लहानपणीच पितृवियोग झाल्याने ठाणे येथे तात्यासाहेब खारकर यांच्या घरी राहून वी.जे.विद्यालयामध्ये त्यांना शालेय शिक्षण घ्यावे लागले. रात्रशाळेत नोकरी करून, शिकवण्या करून त्यांनी मुंबईच्या विल्सन महाविद्यालामधून बी.ए. पदवी मिळविली. त्रिंबक अप्पाजी कुलकर्णी यांनी भिसे यांना त्यांच्या गिरगावातील शाळेत नोकरी देऊ केली. भिसे यांना सार्वजनिक शिक्षण संस्था स्थापण्यात अधिक रस होता. त्यातूनच १९१८ मध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीचा जन्म झाला. भिसे सोसायटीचे पहिले कार्यवाह झाले.

     खेडेगावातील मुलांच्या शिक्षणासाठी गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. टी.ए. कुलकर्णी यांंनी बोर्डीचे आत्माराव सावे यांंच्या सहकार्याने ११ जानेवारी १९२० रोजी बोर्डीला शाळा सुरू केली. भिसे हे बोर्डीला गेले आणि आत्माराम सावे आणि त्यांनी मिळून चित्रे गुरुजी यांंच्या प्रयत्नांनी बोर्डीची शाळा रूप धारण करू लागली. घोलवड गावातील उदार पारशी महिला श्रीमती धनबाईजींनी दोन एकर जमीन व पन्नास हजार रुपये दिले. धनबाईजींच्या मातोश्री यांच्या नावाने सुनाबाई पेस्तनजी हकीमजी विद्यालय या नावाने शाळेची उमारत उभी राहिली. भिसे शाळेचे काम पाहू लागले.

      भिसे यांच्यावर महात्मा गांधींची राहणी व विचार यांंचा खूप मोठा परिणाम झालेला होता. त्यांनी विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळेच्या अभ्यासक्रमाला शेती, शिलाई, सूतकताई, सुतारकाम अशा व्यावसायिक शिक्षणाची जोड दिली. त्याचबरोबर परिसर स्वच्छता, ग्रामसफाई, वृक्षारोपण, काटकसर, सहभोजन अशा विविध उपक्रमांतून मुलांमध्ये राष्ट्रीय एकात्मता विकसित करण्याचे प्रयत्न त्यांनी सातत्याने केले. देशापुढील सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आव्हाने पेलण्यास सक्षम असे भावी नागरिक त्यांनी घडविले. 

      १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीत त्यांनी उंबरगावला वैयक्तिक सत्याग्रह केला. परिणामी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. बोर्डी - घोलवड येथील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ यांनी त्यांच्या मार्गाचे अनुकरण केले, तुरुंगवास भोगला. आदिवासींच्या विकासाचे कार्य त्यांनी हाती घेतले. २० मे १९४० रोजी पालघर तालुक्यातील मानीवली गावात त्यांनी आदिवासी परिषद भरविली. ठक्कर बाप्पा, बाळासाहेब खेर परिषदेस आले होते. त्याच वेळी ‘आदिवासी सेवा मंडळा’ची स्थापना करण्यात आली.

       १९५४ मध्ये भिसे निवृत्त झाले तरी सोसायटीच्या कामात ते लक्ष घालीत. प्रा. टी. ए. कुलकर्णींच्या निधनानंतर ते गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष झाले.

        त्यांच्या पुढाकाराने १९५७ मध्ये आदिवासी सेवा मंडळाच्या वतीने डहाणू तालुक्यात तलवाडा गावी आदिवासी मुलांसाठी महाराष्ट्रातील पहिली आश्रमशाळा सुरू करण्यात आली. सावकारी पाशातून आदिवासींची मुक्तता करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात ‘जंगल कामगार सोसायटीज्’ निर्माण करण्यात आल्या. भिसे यांनी आदिवासींवरील अत्याचारांचे वास्तव चित्रण ‘जंगलची छाया’ या  पुस्तकात केले आहे. आदिवासींची दारूसारख्या व्यसनातून सुटका व्हावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. १९५९ मध्ये त्यांनी बोर्डी येथे अखिल भारतीय आदिम जाती परिषदेचे आयोजन यशस्वीरीत्या केले. या परिषदेचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केले होते. परिषदेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते.

        बोर्डीला सुरू केलेले शेती शिक्षणाचे वर्ग पुढे कोसबाडला कृषी शिक्षण संस्था सुरू करून तेथे नेण्यात आले. कोसबाड केंद्रात अनेक उपक्रम सुरू झाले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आश्रमशाळा व माध्यमिक शाळांतून कोसबाड, तलासरी येथे हजारो आदिवासी शिक्षण घेऊ लागले. १९६२ मध्ये बोर्डीच्या शाळेत तांत्रिक विभाग सुरू झाला आणि व्यावसायिक शिक्षणाची सोय झाली. १९६५ मध्ये संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात ठाणे जिल्ह्यात तीन ठिकाणी आदिवासी परिषदा त्यांनी भरविल्या. हजारोंच्या संख्येने परिषदांत आदिवासी उपस्थित होते. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतून प्रेरणा घेऊन ठाणे जिल्ह्यात त्यांनी ग्रामदान अभियान सुरू केले होते.

        भिसे यांनी अनेक शासकीय समित्यांतून मार्गदर्शन केले. मूलोद्योग पद्धतीचे मूल्यमापन करण्यासाठी नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. कोठारी आयोगाच्या मागासवर्गीय अभ्यासगटाचे ते सदस्य होते. त्यांनी ह्या शाळेच्या माध्यमातून शिक्षणाचे अनेक प्रयोग केले, सेवाभावी व आदर्श नागरिक घडविले. बोर्डीच्या शाळेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात त्यांच्या विद्यार्थ्यांनी एक भव्य सभागृह बांधले व त्यांना गुरुदक्षिणा म्हणून ‘गुरुदक्षिणा मंदिर’ अर्पण केले.

- वि. ग. जोशी

भिसे, शंकर रामचंद्र