भुईभार, महादेव गुलाबराव
महादेव गुलाबराव भुईभार यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील निंभोरा या खेड्यात झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण निंभोरा, वाशिम व खामगाव येथे झाले. त्यांचे एम.ए.पर्यंतचे उच्च शिक्षण अकोला येथेच झाले. त्यांचा विवाह १९५७ साली झाला. त्यांचे बालपण सुखवस्तू असले तरी, आजूबाजूची परिस्थिती पाहून गरीब शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव त्यांना झाली.
शेतकऱ्यांचे अस्वच्छ राहणीमान, त्यांच्यातील अंधश्रद्धा आणि त्यांचा कर्जबाजारीपणा पाहून ते व्यथित झाले. आपले निंभोरा आदर्श गाव बनावे या विचाराने त्यांना झपाटून आपले कार्य सुरू केले. ग्रामीण जीवनावरील कीर्तनकलेचा प्रभाव लक्षात घेऊन त्यांनी त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यास सुरुवात केली. प्रत्येक शेतकऱ्याने शेती करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आपल्या गावात तयार कराव्यात, गावातील पैसा कोणत्याही कारणाने कारखानदाराच्या घशात जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी कृषि-कीर्तनाद्वारे आम जनतेला आवर्जून सांगितले. भुईभार कर्ते सुधारक असल्यामुळे त्यांनी निंभोरा आदर्श गाव करून दाखवले, म्हणून त्यांची निंभोऱ्यांचा महादेव अशीच ओळख वाढत गेली. त्यांनी कापसाला भाव मिळण्यासाठी आंदोलनाचे नेतृत्व केले. त्या वेळी त्यांना अटकही झाली. शेतीमधील सर्व तंत्रज्ञान आपलेसे करून शेतकऱ्यांना जागृत करणे हे कार्य त्यांनी चालूच ठेवले. शेतीमधील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करणे हे त्यांनी परमकर्तव्य मानले. शेतकऱ्यांचे आक्रोश ऐकून भुईभार यांचे हृदय द्रवत असल्यामुळे शेतकऱ्यांचे खरे कैवारी अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज आणि डॉ. पंजाबराव देशमुख भुईभारांचे आदर्श असल्यामुळे त्यांच्या उपदेशानुसार त्यांनी कार्य केले. त्यांनी शेतकऱ्यांना दिलेला ‘पाणी अडवा, पाणी जिरवा आणि शेतीतील उत्पन्न वाढवा’ हा मंत्र सर्वांनी आत्मसात केला. भुईभार शेतकऱ्याला ‘ग्रामनाथ’ व शेतकऱ्याच्या पत्नीला ‘रुक्मिणी’ या नावाने संबोधत असल्यामुळे समाजाने ‘कृषि-संत’ म्हणून त्यांचा गौरव केला. कर्ज काढू नका व सावकारी पाशामध्ये अडकू नका अशा प्रकारचे प्रबोधन भुर्ईभार कृषी कीर्तनाद्वारे करत आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला उत्तम बाजारपेठ मिळावी म्हणून ते अविरत झटत असतात. त्यांनी अकोला जिल्ह्यामध्ये व अकोला पंचायत समितीमध्ये वेगवेगळी पदे भूषवली आहेत. ते युवक कृषक संघाचे संस्थापक अध्यक्ष होते व अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे कृतिशील सदस्य होते.