Skip to main content
x

भवाळकर, उदय वसंत

दय वसंत भवाळकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन येथे झाला. मालती व वसंतराव शंकरराव भवाळकर हे त्यांचे आई-वडील. बालपणात संगीताचे प्राथमिक धडे त्यांनी आपल्या बहिणीकडे (माधवी सुभेदार) घेतले. ख्याल गायकीचे शिक्षण घेत असताना, पंधराव्या वर्षी भोपाळच्या धृपद केंद्राकडून त्यांना धृपदाच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती (१९८१ ते १९८५) मिळाली. धृपद गायकीची एकोणीस पिढ्यांची परंपरा असणार्‍या डागर घराण्याच्या उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर व त्यांचे ज्येष्ठ बंधू रुद्रवीणावादक उ. झिया मोहिउद्दीन डागर यांच्याकडून उदयजींना बारा वर्षे धृपद गायकीची सखोल तालीम भोपाळ व मुंबई येथे मिळाली.

या गुरुकुल पद्धतीतील पारंपरिक तालमीत गुरूसमोर सातत्याने होणारा रियाझ, चिंतन यांमुळे त्यांनी धृपद गायकीची सर्व अंगे आत्मसात केली. एका मैफलीतील यशस्वी प्रस्तुतीच्या निमित्ताने उ. नसीर अमिनुद्दीन डागर खाँसाहेबांनी १९८७ साली त्यांना सुवर्णपदक दिले. तसेच त्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्तीही (१९८६ ते १९८९) मिळाली. यानंतर त्यांची धृपद गायक म्हणून लखलखीत कारकीर्द सुरू झाली.

दीर्घ दमसास, सुरेल व श्रुतियुक्त गानोच्चार, नोमतोम आलापचारीतून रागाचा सविस्तर व धीरगंभीर बर्ताव, धृपद-धमारच्या बंदिशी गाताना पखावजच्या तालावर केलेली सहजसुंदर लयक्रीडा या वैशिष्ट्यांमुळे त्यांचे गायन लोकप्रिय ठरले आणि अल्पावधीतच त्यांनी जागतिक कीर्ती प्राप्त केली. त्यांच्यासारखा एक ताज्या दमाचा धृपद गायक रंगमंचावर इतकी उच्च दर्जाची प्रस्तुती करतो हे पाहून नव्या पिढीत या शैलीचे आकर्षण वाढले व त्यामुळे धृपद गायकीचा प्रसार तरुणवर्गात वाढला, हे उदयजींचे मोठे योगदान आहे.

देश-विदेशांतील मैफलींत त्यांनी लक्षणीय प्रस्तुती केली आहे. तसेच ‘स्पिकमॅके’ या संस्थेच्या उपक्रमात त्यांचा अनेक वर्षे सहभाग आहे. दूरदर्शन, आकाशवाणीसारख्या माध्यमांतूनही त्यांची कलाप्रस्तुती सातत्याने होत असते. वर्ल्ड म्युझिक फेस्टिव्हल (इंग्लंड व बेल्जियम), इंटरनॅशनल व्हॉइस फेस्टिव्हल (रॉटरडॅम व बार्सिलोना), इंडियन फेस्टिव्हल (अ‍ॅमस्टरडॅम), संगीत परंपरा महोत्सव (बर्लिन), स्फिंक्स महोत्सव (बेल्जियम), क्विन एलिझाबेथ हॉल (लंडन) इ. जागतिक स्तरावरील अनेक महत्त्वाच्या समारोहांत त्यांनी आपली कला सादर केली आहे. संगम संगीताच्या प्रयोगांतही त्यांनी रुची दाखवून आन्साम्बल मॉडर्न (जर्मनी), समकालिक नर्तनशैलीतील कलाकार अस्ताद देबू, तसेच स्पेन व अमेरिकेतील कलाकारांसह त्यांनी नाविन्यपूर्ण आविष्कार केले आहेत. त्यांच्या गायनाची अनेक व्यावसायिक ध्वनिमुद्रणे जगभरात वाखाणली गेली आहेत. ‘क्लाउड डोअर’, ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस अय्यर’, ‘अनाहत’, ‘रसिकप्रिया-लोकप्रिया’, ‘रीटा’ या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायनही केले आहे.

मैफलींसह प्रत्यक्ष अध्यापन व धृपद गायकीवर सप्रयोग व्याख्यानांद्वारे या लुप्तप्राय झालेल्या प्राचीन संगीत शैलीस पुनरुज्जीवित करण्याचे त्यांच्या गुरुजनांचे कार्य त्यांनी मोठ्या साफल्याने पुढे नेले आहे. पुणे येथील त्यांच्या निवासी गुरुकुलात देशा-विदेशांतून अनेक विद्यार्थी पारंपरिक पद्धतीने धृपद गायकीचे मार्गदर्शन घेतात. कोलकाता येथील संगीत रिसर्च अकादमी, नाशिक येथील संगीत विद्यापीठ यांसारख्या भारतातील, तसेच परदेशात हॉलंड येथील रॉटरडॅम कॉन्झर्व्हेटरिअम ऑॅफ म्युझिक व अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संस्कृती संगीतशास्त्र विभागात उदय भवाळकर निवासी अभ्यागत कलाकार गुरू म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी युरोपमधील अनेक देशांत कार्यशाळा घेतल्या आहेत.

त्यांनी २००२ साली वीणा फाउण्डेशनची स्थापना केली व त्याद्वारे ते धृपद गायकीचे प्रशिक्षण, प्रसार व मैफलींचे आयोजन करतात. तसेच आर्थिकदृष्ट्या अक्षम विद्यार्थ्यांस धृपदाच्या अभ्यासासाठी शिष्यवृत्तीही दिली जाते. धृपदाच्या प्राचीन परंपरेचा वारसा ते अशा प्रकारे पुढच्या पिढीकडे सोपवण्याचेही कार्य करत आहेत.

‘कुमार गंधर्व सन्मान’ (मध्य प्रदेश सरकार, २००१), ‘विश्व संगीत रत्न’ (डेला हेरिटेज फाउण्डेशन, मुंबई, २००५), रझा फाउण्डेशनचा पुरस्कार (दिल्ली, २००६) रझा फाउंडेशन पुरस्कार (२००८) यांद्वारे उदयजींना गौरविण्यात आले आहे.

चैतन्य कुंटे

भवाळकर, उदय वसंत