Skip to main content
x

चांदूरकर, मधुकर नरहर

      मुंबई व मद्रास उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असणारे  मधुकर नरहर चांदूरकर यांचा जन्म नागपूरला झाला. त्यांचे शालेय शिक्षण नागपूर येथे सोमलवार अ‍ॅकॅडमीमध्ये व उच्चशिक्षण नागपूर येथील हिस्लॉप महाविद्यालयामध्ये झाले आणि त्यांनी नागपूर विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए.ची पदवी संपादन केल्यावर  अगोदर नॅशनल कॉलेजमध्ये आणि नंतर हिस्लॉप महाविद्यालयामध्ये अध्यापन केले. परंतु नंतर वडिलांच्या आणि बंधूंच्या व्यवसायाकडे आकर्षित झाल्याने त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या कायदा महाविद्यालयातून १९५२मध्ये एलएल.बी.पदवी संपादन केली आणि ते नागपूर जिल्हा न्यायालयात वकिली करू लागले. १३डिसेंबर१९५४ रोजी ते तेव्हाच्या नागपूर उच्च न्यायालयात अ‍ॅडव्होकेट म्हणून रुजू झाले. त्यांनी मुख्यत्वे दिवाणी, फौजदारी आणि करविषयक खटले लढविले. ते अनेक कंपन्या इत्यादींचे कायदेशीर सल्लागार होते, त्याचप्रमाणे सहायक सरकारी वकील आणि आयकर विभागाचे स्थायी वकीलही होते. त्यांच्या सहकारी वकिलांमध्ये  ते अतिशय लोकप्रिय होते. महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलवर त्यांची निवड झाली आणि ते त्याचे उपाध्यक्ष झाले. याशिवाय ते महाराष्ट्र लॉ जर्नलचे संस्थापक-संपादक होते.

      २८ऑक्टोबर१९६७ रोजी चांदूरकर यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून झाली. ७ऑगस्ट१९६८ रोजी ते उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले. मुंबई उच्च न्यायालयातील आपल्या सुमारे सतरा वर्षांच्या कारकिर्दीत न्या.चांदूरकर यांनी एक मनमिळाऊ आणि काटेकोर न्याय देणारे न्यायाधीश म्हणून लौकिक मिळविला. त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. त्यामध्ये महाराष्ट्र कर्जमुक्ती कायद्यासंबंधी खटला, कंपनी कायद्याखालील नॅशनल रेयॉन आणि युनिट ट्रस्ट यांच्यातील खटला, कुलाब्यातील नागरिकांचा मुंबई पोर्ट ट्रस्टविरुद्धचा रिट अर्ज, यांचा विशेष उल्लेख करता येईल. याशिवाय, १जानेवारी१९७८ रोजी एअर इंडियाच्या ‘सम्राट अशोक’ या विमानाला झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी एक-सदस्य आयोग म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सर्वंकष चौकशी करून त्यांनी आपला अहवाल सादर केला.

      जानेवारी १९८४मध्ये न्या.चांदूरकरांची मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. परंतु लगेच एप्रिल १९८४मध्ये त्यांची बदली मद्रास उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून करण्यात आली. तेथून ते १३मार्च१९८८ रोजी निवृत्त झाले. चेन्नईमधील आपल्या चार वर्षांच्या वास्तव्यात न्या.चांदूरकर तेथेही लोकप्रिय झाले व त्यांनी तेथील वकीलवर्गाचा आदर व विश्वास संपादन केला.

      निवृत्त होऊन मुंबईला परतल्यावर न्या.चांदूरकर लवादाचे काम करीत. अनेकदा एखादा विषय दोन लवादांकडे सोपविला गेल्यास त्या लवादाचे अध्यक्ष म्हणून न्या.चांदूरकरांची निवड होत असे. सर्वोच्च न्यायालयाने आणि कलकत्ता उच्च न्यायालयाने त्यांची काही प्रकरणांत लवाद म्हणून नेमणूकही केली होती.

- शरच्चंद्र पानसे

चांदूरकर, मधुकर नरहर