Skip to main content
x

चौरसिया, हरिप्रसाद छेदीलाल

       रिप्रसाद  छेदीलाल चौरसिया यांचा जन्म  उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला. त्यांचे  वडील पट्टीचे कुस्तीगीर होते व त्यांना आपल्या मुलांनी आपल्यासारखेच कुस्तीगीर व्हावे असे वाटत असे. परंतु कुस्तीक्षेत्रात हरिप्रसाद कधीच रमले नाहीत.

छेदीलालजींच्या घरात त्या वेळी पंडित राजाराम भाड्याने राहत होते. त्यांनी हरिप्रसादना गाणे शिकविण्याची तयारी दर्शविली. अशा तऱ्हेने ते हरिप्रसादांचे गायन क्षेत्रातले पहिले गुरू झाले. आवाज फुटण्याच्या वयात हरिप्रसाद गायन सोडून बासरीवादनाकडे वळले. बासरीवादनाचे प्राथमिक धडे न घेता, नैसर्गिक सहजतेने ते बासरीवर गीत-भजन-धुना वाजवू लागले.

वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना प्रथमच प्रत्यक्षपणे रसिकांसमोर बासरीवादन करण्याची संधी मिळाली. आणि हरिप्रसाद यांनी या संधीचे सोने केले. गुलाम जिलानी या वाद्यविक्रेत्याने हरिप्रसादना ह्या बासरीवादनाचे बक्षीस म्हणून ‘पांढरी  पाच’ सुरातील बासरी प्रदान केली.

पंडित भोलानाथजी हे हरिप्रसादजींना बासरीतील पहिले गुरू लाभले. पंडित भोलानाथ हे अलाहाबाद आकाशवाणी केंद्रावर कार्यरत होते. दोघांच्या वयात खूप अंतर नव्हते, तसेच भोलानाथजी संसारी नसल्यामुळे दोघे एकत्र राहू लागले. भोलानाथ आकाशवाणीतून काम संपवून येत आणि मग हरिप्रसादना बासरी शिकवत.

हरिप्रसादजींनी १९५७ साली आकाशवाणीवर पहिली संगीत चाचणी परीक्षा दिली आणि ‘ऑल इंडिया रेडिओ’, कटक, ओरिसा येथे त्यांची नोकरी सुरू झाली. आकाशवाणीवर  ते सकाळी सहा ते अकरा आणि नंतर संध्याकाळी पाच ते नऊ अशा दोन वेळा काम करत. दुपारच्या फावल्या वेळात त्यांचे तासन्तास, बंद स्टूडिओत बासरीवादन चाले.

त्यांची १९६२ साली मुंबईला बदली झाली आणि इथूनच त्यांच्या प्रवासाला आणि खर्‍या कारकिर्दीला सुरुवात झाली. मुंबईला येताच त्यांनी मुंबईच्या चित्रपटसृष्टीवर आपल्या बासरीचा मोहक ठसा उमटविला. सगळ्याच संगीतकारांकडे त्यांनी बासरीवादन केले. हरिप्रसादजींना बर्‍यापैकी पैसाही मिळू लागला. त्यांनी १९६५ साली आकाशवाणीतील नोकरीचा राजीनामा दिला.

एक संगीतकार म्हणूनही त्यांनी चित्रपटसृष्टीत काम केले. ‘२७ डाउन’ हा त्यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट असला, तरी नंतर त्यांनी शिवकुमार शर्मा यांच्यासह ‘शिव-हरी’ या नावाने सिलसिला, चांदनी, लम्हे, डर, विजय, साहेबा इ. अनेक चित्रपटांना संगीत दिले व ते विलक्षण जनप्रियही झाले.

हरिजींनी १९६८ सालापासून अन्नपूर्णादेवी यांच्याकडून मैहर-सेनिया घराण्याची तंतकारी वादनपद्धतीची तालीम घेतली. तत्पूर्वी ते ख्यालगायनास अनुसरून वादन करीत, मात्र हरिप्रसादजींचे शास्त्रीय संगीतातले अतिशय मोठे योगदान म्हणजे बासरीतून तंतुवाद्यासारखे आलाप, जोड आणि झाला वाजविण्याची तंत्रपद्धत हे होय.  त्यांनी इंदिराकल्याण, हरिप्रिया, प्रभातेश्वरी, कलारंजनी, मधुमल्हार इ. रागांची निर्मिती केली. त्यांच्या सर्वांगपरिपूर्ण अशा बासरीवादनामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली.

पाश्चिमात्य संगीताबरोबर भारतीय (हिंदुस्थानी) शास्त्रीय संगीताचा मेळ करून, त्यांचा अप्रतिम संगम (फ्युजन) त्यांनी जगविख्यात यहुदी मेन्युइन, जॉर्ज हॅरिसन, हेन्री ट्युनिए, जॉन मॅक्लोग्लिन इत्यादी संगीतकारांसमवेत घडविला. पं. रविशंकरांच्या अनेक संगीतप्रकल्पांत ते वादक म्हणून सहभागी होते.

हरिजींनी २००२ साली मुंबई येथे गुरुशिष्य परंपरेला पुढे नेणारे ‘वृंदावन गुरुकुल’ सुरू केले. मल्हारराव कुलकर्णी, रमाकांत पाटील, देवप्रिया व शुचिस्मिता चॅटर्जी, समीर राव, सुनील अवचट अशा शिष्यांसह हरिजींचा शिष्यपरिवार फ्रान्स, जर्मनी, जपान, अमेरिका अशा अनेक देशांत कार्यरत आहे. ‘रॉटरडॅम कॉन्झर्व्हेटोरिअम ऑफ म्युझिक’मध्ये भारतीय संगीत विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं .

हरिप्रसादजींच्या सुमारे पाचशे ध्वनिमुद्रिका उपलब्ध आहेत. ‘कॉल ऑफ द व्हॅली’, ‘सृष्टी’, ‘मुक्ती’, ‘रीव्हर्स’, ‘नथिंग बट द विंड’, इ. ध्वनिमुद्रिका खूप गाजल्या. त्यांना ‘संगीत नाटक अकादमी’, ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार, ‘कालिदास सन्मान’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ आणि ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’, तसेच २०१० मध्ये फ्रेंच सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान असे अनेक सन्मान प्राप्त झाले .

रूपक कुलकर्णी

चौरसिया, हरिप्रसाद छेदीलाल