Skip to main content
x

चितळकर, रामचंद्र नरहर

संगीतकार

 

भारतीय चित्रपट संगीताच्या शिल्पकारांपैकी एक कर्तृत्ववान संगीत दिग्दर्शक म्हणजे सी. रामचंद्र. त्यांनी मराठी, हिंदी आणि तेलगू भाषिक चित्रपटांना दिलेल्या संगीतामुळे त्यांचे चित्रपटसृष्टीत आगळे स्थान निर्माण झाले.

रामचंद्र नरहर चितळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चितळी गावी झाला. लहानपणापासूनच संगीताची आवड असल्याने संगीत शिकण्यासाठी ते नागपूरला शंकरराव सप्रे यांच्याकडे गेले. त्यांच्याकडे काही वर्षे शिकल्यानंतर विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडेही त्यांनी काही काळ संगीत अध्ययन केले. उपजत गोड गळा, चौकसपणा, तीव्र ग्रहणशक्ती आणि कष्टाळू वृत्ती हे त्यांचे आणखी काही विशेष होते.

संगीताच्या वेडानेच त्यांनी पुण्यातल्या सरस्वती सिनेटोनमध्ये संगीत विभागात प्रवेश मिळवला. तेथे ते हार्मोनियम वाजवत. प्रभात फिल्म कंपनीचे कोल्हापुरातून स्थलांतर झाल्यानंतर त्या स्टुडिओत सम्राट फिल्म कंपनीतर्फे हिंदी व मराठी भाषेत नागानंद’ (१९३५) नावाचा चित्रपट तयार केला. या चित्रपटासाठी कंपनीला तरुण आणि चांगला गाणारा युवक हवा होता. अनेक तरुणांची छाननी केल्यानंतर यासाठी चितळकरांची निवड झाली. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत त्यांचे नाव होते आर.एन. चितळकर. त्यानंतर त्यांनी मुंबईचा रस्ता धरला. नागानंदचे संगीत दिग्दर्शक वामनराव सडोलीकर यांच्याकडून एक प्रशस्तिपत्र घेऊन ते सोहराब मोदी यांच्या मिनर्व्हा मुव्हीटोन या कंपनीत गेले. तिथल्या संगीत विभागात त्यांनी उमेदवारी सुरू केली. तिथले संगीतकार ग्यानदत्त, बी.एस. हुगन व मीरसाहेब यांच्याकडून त्यांनी महत्त्वाच्या बर्‍याच गोष्टी शिकून घेतल्या. लाल हवेलीया १९४४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी अभिनेता याकूबसाठी सी. रामचंद्र यांनी पार्श्‍वगायन केले. याच काळात त्यांची आणि मा. भगवान यांची ओळख झाली. मा.भगवान यांनी त्यांना वनमोहिनीजयकोडीया दोन तमिळ चित्रपटांच्या संगीतासाठी करारबद्ध केले आणि नंतर मा. भगवान यांच्याच सुखी जीवन’ (१९४२) या हिंदी चित्रपटाला चितळकर यांनी संगीत देऊन नवा अध्याय सुरू केला. नंतरच्या काळात त्यांनी जयंत देसाई यांच्या चित्रपटांना संगीत देऊन चांगले नाव कमावले. जयंत देसाई यांनीच त्यांच्याकडे सी. रामचंद्रया नावाचा आग्रह धरला. पुढे फिल्मिस्तान कंपनीत त्यांनी सफर’ (१९४६), ‘शहनाई’ (१९४७),  ‘साजन’ (१९४७), ‘समाधी’ (१९५०), ‘अनारकली’ (१९५३) वगैरे चित्रपटांना संगीत दिले. चित्रपटसृष्टीत लोक त्यांना अण्णासाहेबया आदरार्थी नावाने संबोधू लागले. ते चित्रपटाला संगीत देताना सी. रामचंद्रअसे नाव लावत. मात्र अण्णासाहेबया नावानेही त्यांनी काही चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले. पार्श्‍वगायनासाठी मात्र ते चितळकरअसे नाव लावत असत.

सी. रामचंद्र यांनी १९४७ साली प्रदर्शित झालेल्या चूल आणि मूलया मराठी चित्रपटासाठीही संगीत दिग्दर्शन केले. फेमस पिक्चर्सच्या बाबूराव पै यांचा हा चित्रपट होता. सी. रामचंद्र यांनी या चित्रपटातील गाण्यांना खास ठेवणीतल्या मराठमोळ्या चाली दिल्या आणि आपले साहाय्यक दत्ता डावजेकर यांना चित्रपटाची गाणी ध्वनिमुद्रित करण्याची संधी दिली. नंतर १९५२ साली भालजी पेंढारकर यांच्या खास आग्रहास्तव त्यांनी छत्रपती शिवाजीया चित्रपटाला संगीत दिले. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट बनवला होता. सी. रामचंद्र यांनी अतिशय समरस होऊन या चित्रपटाला संगीत दिले आणि काही गाणीही गायली. त्यापूर्वीही १९५० सालच्या राम राम पाव्हणंया चित्रपटासाठी त्यांनी पार्श्‍वगायन केले होते. चित्रपटाचे संगीत लता मंगेशकर यांचे होते. पुढे भगवान आर्ट प्रॉडक्शनच्या सरगम’ (१९५०) आणि अलबेला’ (१९५१) या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले. मा. भगवान यांच्यावर चित्रित झालेल्या भोली सुरत दिलके खोटेया गाण्यासह या चित्रपटाचे संगीत लोकप्रिय झाले.

 लेखक बाबूराव अर्नाळकर यांच्या कथेवर आधारित धनंजय’ (१९६०) या चित्रपटालाही सी. रामचंद्र यांनी संगीत दिले, तसेच पार्श्‍वगायनही केले. इतकेच नव्हे, तर या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिकाही केली. संत निवृत्ती ज्ञानदेव’ (१९६४) या चित्रपटाला त्यांनी दिलेले संगीत खूप गाजले. त्यानंतर त्यांनी संगीत दिलेला पुढचा चित्रपट होता धर्मपत्नी’ (१९६८). याही चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका केली आणि पार्श्‍वगायनही केले.

सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेला अखेरचा चित्रपट होता घरकुल’ (१९७०). या चित्रपटाची निर्मितीही त्यांचीच होती. त्यांचे चिरंजीव यशवंत यांच्या नावाने यशवंत बॅनरखाली हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटाचे संगीतही खूप गाजले; शिवाय या चित्रपटाला महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट पटकथा-संवाद, उत्कृष्ट पार्श्‍वगायक, उत्कृष्ट पार्श्‍वगायिका, विशेष अभिनेत्रीसह उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक अशी सात पारितोषिके मिळाली.

मात्र घरकुलनंतर सी. रामचंद्र या क्षेत्रातून निवृत्त झाले. जवळपास दोनशे चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते आणि चारशेपेक्षा जास्त गाण्यांसाठी त्यांनी पार्श्‍वगायन केले होते. त्यानंतर गीत गोपाळ’, ‘रस यात्रा’, ‘शब्द संगीतअसे गाण्याचे कार्यक्रम ते करत असत. त्यांनीच संगीतबद्ध केलेल्या गाण्यांवर आधारित भुलाये न बनेही खास संगीतरजनी सी. रामचंद्र सादर करत होते. चित्रपटगीतांना संगीत देण्याबरोबरच अनेक गैरफिल्मी गाणीही सी. रामचंद्र यांनी ध्वनिमुद्रित केली होती. ती आकाशवाणीवरून प्रसारित होत होती.

पाकिस्तानी आणि चिनी लष्कराने भारतावर जेव्हा हल्ला केला, त्या वेळी ऐ मेरे वतन के लोगोहे अप्रतिम गाणे गाजत होते. हे गाणे ऐकून तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचेही डोळे पाणावले होते. प्रदीप यांनी लिहिलेल्या या गाण्यांचे संगीत सी.रामचंद्र यांचे होते. उत्कृष्ट देशभक्तीपर गीत म्हणून आजही हे गाणे स्मरणात आहे.

वयाच्या ६४व्या वर्षी मुंबईत अल्प आजाराने सी. रामचंद्र यांचे निधन झाले.

- शशिकांत किणीकर

 

संदर्भ :
१) चितळकर रामचंद्र, ‘माझ्या जीवनाची सरगम’,  इनामदार बंधू प्रकाशन; १९७७

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].