Skip to main content
x

चंदावरकर, भास्कर मंगेश

हुआयामी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या पं. भास्कर चंदावरकर यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांची मावशी सीता माविनकुर्वे (पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या शिष्या) या गायिका होत्या. तसेच बालवयापासून पुण्यातील सरदार आबासाहेब मुजुमदारांसारख्या संगीतप्रेमीच्या सहवासात आल्याने भास्कर चंदावरकरांच्या संगीतप्रेमास प्रोत्साहन मिळाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण वाडिया महाविद्यालय व फर्गसन महाविद्यालय येथे झाले.
त्यांनी पं. रविशंकर आणि पं. उमाशंकर मिश्र यांच्याकडून सतारवादनाचे शिक्षण घेतले. त्यांनी पाश्चात्त्य संगीताचेही पद्धतशीर शिक्षण घेतले. त्यांनी १९६२-१९७८ आणि १९८५-८६ या काळात भारतात आणि युरोपियन देशांमध्ये आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंडमध्ये सतारवादनाच्या अनेक मैफली केल्या.
फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये चंदावरकरांनी संगीताचे प्राध्यापक म्हणून १९६५ ते १९८० अशी चौदा वर्षे काम केले. तसेच अहमदाबादची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, पंजाब-हरियाणा विद्यापीठ, दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, बंगलोर येथील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट या संस्थांमध्ये त्यांनी अतिथी प्राध्यापक म्हणूनही काम केले. अमेरिकेतही अनेक विद्यापीठांमध्ये व्याख्याने, चर्चासत्रे, कार्यशाळा, भारतीय संगीत शिकविणे अशा विविध प्रकारचे सांगीतिक कार्यही त्यांनी केले.
चंदावरकरांनी १९९२ ते १९९९ या काळात पोलंड, झेकोस्लोव्हाकिया, जपान अशा विविध देशांत कलाविषयक संस्थांचे सल्लागार म्हणून काम केले. भारत आणि बांगलादेशाच्या सांस्कृतिक धोरण समितीचे सदस्य म्हणून त्यांनी या काळात काम केले. बांगलादेशात फोर्ड फाउण्डेशनचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांची १९८९ मध्ये दूरदर्शन व आकाशवाणीने मानद कार्यक्रम निष्पादक म्हणून नियुक्ती केली होती. राष्ट्रीय चित्रपट महोत्सव, अल्मा अटा (किरगिस्तान) येथील जागतिक जॅझ महोत्सव येथे त्यांनी अनेक वेळा परीक्षक म्हणून काम पाहिले.
संगीतकार म्हणून चंदावरकरांची कारकीर्द विशेष लक्षणीय म्हणावी लागेल. मराठी, कन्नड, हिंदी आणि इंग्रजी या भाषांतील अनेक नाटकांना त्यांचे संगीत होते. त्यांनी १९७२ साली संगीत दिलेले ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक आणि त्यातील संगीताचा वापर यांचा ठसा मराठी रंगभूमीवर आजही आहे. ‘तीन पैशांचा तमाशा’, ‘ये रे ये रे पावसा’, ‘आषाढ़ का एक दिन’, ‘गिरिबाला’, ‘रामनाम सत है’, ‘जेतेगिरी बेन चंदेरी’ ही त्यांनी संगीत दिलेली काही प्रमुख नाटके होत. तसेच जर्मन भाषेतील ‘नागमंडल’, जपानी भाषेतील ‘मीवा’ या नाटकांनाही त्यांचे संगीत होते.
चंदावरकरांनी सुमारे चाळीस चित्रपटांना संगीत दिले. ‘सामना’ (१९७४), ‘घाशीराम कोतवाल’ (१९७६), ‘सर्वसाक्षी’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ (१९७८), ‘गारंबीचा बापू’ (१९८०), ‘आक्रित’ (१९८१), ‘एक डाव भुताचा’ (१९८२), ‘कैरी’ (२००२), ‘बयो’, ‘सरीवर सरी’ (२००५), ‘श्वास’ (२००४), ‘मातीमाय’ (२००६) या मराठी चित्रपटांना, तसेच ‘जय जवान जय किसान’ (१९७१), ‘माया दर्पन’ (१९७२),
  ‘जादू का शंख’ (१९७४), ‘अरविंद देसाई की अजीब दास्तान’ (१९७८), ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूं आता है’ (१९८०), ‘हमीदाबाई की कोठी’, ‘खंडहर’ (१९८४), ‘परोमा’ (अपर्णा सेन कृत, १९८४), ‘रावसाहेब’ (विजया मेहता कृत, १९८६), ‘थोड़ासा रूमानी हो जाए’ (अमोल पालेकर कृत, १९९०) या हिंदी चित्रपटांना त्यांचे संगीत होते. ‘वंशवृक्ष’ (१९७१), ‘कनक पुरंदर’, ‘तब्बलियू नीनदे मगने’ (१९७७) या कन्नड, ‘स्वप्नादनम’ या मल्याळी, ‘मायामिरिग’ (१९८४) या उडिया आणि ‘नाइन अवर्स टू रामा’, ‘अ लँप इन द निश’ या इंग्रजी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. समांतर नाटक व चित्रपटांच्या चळवळींच्या संदर्भात भास्कर चंदावरकरांचे संगीत दिग्दर्शक म्हणून मोलाचे योगदान आहे.
चंदावरकर कित्येक प्रांगणीय आणि रंगमंचीय प्रस्तुतींचे संचालक होते. ‘नक्षत्रांचे देणे’ हा काव्य-संगीताचा कार्यक्रम ही त्यांची शब्द-संगीताला दिलेली अनमोल देणगी आहे. तसेच ‘स्वप्नकोश’ हा बॅले, ‘प्रतिमा’ नृत्यनाट्य, ‘रंगविविधा’, ‘व्होल्गा ते गंगा’ अशी अनेक रंगमंचीय प्रस्तुतीकरणे त्यांनी सादर केली. गणराज्य दिवस (१९८७), सुषिर वाद्य महोत्सव (दिल्ली), चित्रपट शताब्दी महोत्सव (मुंबई, १९९५) असे अनेक कार्यक्रम प्रांगणीय प्रस्तुती म्हणून त्यांनी सादर केले होते.
भास्कर चंदावरकरांचे योगदान महाराष्ट्रातील नवविचारवादी कलेच्या बाबतीत अत्यंत मौलिक असे आहे. त्यांनी विविध नियतकालिकांत संगीतविषयक लेखन केले होते व त्यांच्या पश्चात ‘वाद्यवेध व भारतीय संगीताची मूलतत्त्वे’ हे त्यांच्या व्याख्यानांवर आधारित पुस्तक प्रकाशित झाले. याशिवाय अनेक लोकांना, ‘नीनासम’सारख्या वेगळ्या धर्तीवरील संस्थांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संगीतविषयक मार्गदर्शन, व्याख्याने असे त्यांचे कार्य तर मोजता-मापता येणार नाही असे होते.
त्यांना १९८८ साली ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार, २००२ साली ‘चैत्र’ या मराठी लघुपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट संगीतकार’ म्हणून ‘राष्ट्रीय चित्रपट सन्मान’ मिळाला. वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी पुणे येथे त्यांचे निधन झाले.

डॉ. शुभदा कुलकर्णी

 

चंदावरकर, भास्कर मंगेश