Skip to main content
x

चुनेकर, सुरेश रामकृष्ण

     सुरेश रामकृष्ण चुनेकर यांचा जन्म पुणे येथे झाला. शिक्षण पुणे व सातारा येथे झाले. १९६८ ते १९७३ या काळात त्यांनी मराठी संशोधन मंडळ, मुंबई येथे प्रपाठक व उपसंचालक म्हणून काम केले. १९७९ ते १९८४ ह्या काळात संगमनेर महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले व त्यानंतर १९८५ साली ते पुणे विद्यापीठात प्रपाठक म्हणून रुजू झाले. १९९६ साली ते पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख झाले. एम. ए., पीएच. डी. असल्याने चुनेकर यांनी पुणे विद्यापीठातून विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना पीएच. डी.साठी मार्गदर्शन केले.

     १९६८ ते १९७९ ह्या काळात त्यांनी ‘मराठी संशोधन पत्रिकेचे’ संपादन केले. याच काळात त्यांनी महत्त्वाच्या सूची बनविण्याचे कामही केले. ‘बाळकृष्ण अनंत भिडे ह्यांच्या कवितांची सूची’ (१९५९), ‘भिडे ह्यांच्या समग्र वाङ्मयाची वर्णनात्मक सूची’ (१९६९), ‘अ. का. प्रियोळकर यांच्या वाङ्मयाची सूची’ (१९७९) अशा सूच्या त्यांनी तयार केल्या. मराठी संशोधन पत्रिकेतून प्रसिद्ध झालेल्या साहित्याचे ४, ५, ६, ७ हे खंड संपादित केले. ‘माधवराव पटवर्धन वाङ्मयदर्शन’ हा त्यांचा ग्रंथ १९७३ साली मौजतर्फे प्रकाशित झाला. १९८० साली त्यांनी ‘माधव जूलियन’ हा ग्रंथ साहित्य अकादमीसाठी लिहिला. समग्र माधव जूलियन खंड १ - स्फुट काव्य, खंड २-खंडकाव्य या दोन ग्रंथांचे त्यांनी सहसंपादन केले. माधवराव पटवर्धन यांच्या अभ्यासकांसाठी हे लेखन अतिशय मोलाचे मानले जाते. ‘सूचींची सूची’ (१९९५), ‘अंतरंग’ (१९९६), ‘जयवंत दळवी यांची नाटके’ (१९९५) ही पुस्तके त्यांनी लिहिली. १९८१ साली त्यांनी जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘सोनपावले’ या कथासंग्रहाचे संपादन केले. वि. द. घाटे ह्यांच्या ‘काही म्हातारे व एक म्हातारी’ ह्या व्यक्तिचित्रात्मक पुस्तकाचेही (तृतीयावृत्ती) संपादन केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मराठी वाङ्मयाचा इतिहास ह्या ग्रंथात समीक्षेच्या इतिहासाचे लेखन केले. त्यांची समीक्षा काटेकोर व शिस्तबद्ध असते.

- नरेंद्र बोडके

चुनेकर, सुरेश रामकृष्ण