चव्हाण, यशवंत बळवंत
यशवंत बळवंत चव्हाण यांचा जन्म पूर्वीच्या सातारा आणि आताच्या सांगली जिल्ह्यात वसलेल्या देवराष्ट्र या खेड्यात झाला. यशवंतरावांचे वडील बळवंतराव हे 1917 मध्ये प्लेगच्या साथीत बळी पडले आणि त्यांचे वयाच्या पाचव्या वर्षी पितृछत्र हरपले. त्यामुळे त्यांना आईसह कराडला आजोळी राहायला जावे लागले. त्यांचे शालेय शिक्षण तेथील टिळक विद्यालयात झाले. तेथेच त्यांच्यावर राष्ट्रवादाचे संस्कार झाले. शिक्षकांनी सांगितलेल्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या गोष्टींनी प्रभावित झालेल्या यशवंतरावांनी शाळेसमोरील झाडावर तिरंगा फडकवला. त्यामुळे त्यांना अटक झाली तेव्हा त्यांच्या आईने त्यांना इंग्रजांची माफी मागण्यास मज्जाव केला व धीर देऊन मानसिकदृष्ट्या खंबीर केले. या संस्कारात वाढलेल्या यशवंतरावांनी पुढे आपल्या कर्तृत्वाने राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण, साहित्य, कला अशी विविध क्षेत्रे यशस्वीपणे समृद्ध केली.
स्वातंत्र्यसंग्रामाच्या धकाधकीच्या वातावरणात चव्हाण यांचे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण झाले. ते कारागृहातून मुक्त झाल्यावर 1934 साली मॅट्रिक उत्तीर्ण झाले. नंतर ते कोल्हापुरातील महाविद्यालयातून बी. ए. झाले व पुढे पुण्यातील महाविद्यालयातून एल्एल्. बी. उत्तीर्ण झाले.
‘सहकार चळवळीतूनच उद्याच्या समृद्ध भारतासाठी विविध क्षेत्रात नेते व कार्यकर्त्यांची पिढी निर्माण होऊ शकते. म्हणूनच सुदृढ सहकारी संस्था समाजाची शक्तिपीठे बनल्या पाहिजेत,’ असा यशवंतरावांचा दृढ विश्वास होता त्यानुसार विविध सहकारी क्षेत्रांना मार्गदर्शन करणारे यशवंतराव हे राजकीय क्षेत्राप्रमाणेच सहकार क्षेत्रातही द्रष्टा नेता म्हणून तळपले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तपभराने 1 मे 1960 रोजी, संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी राजकीय, सामाजिक, सहकार, सांस्कृतिक क्षेत्रात लक्षणीय काम करून आधुनिक महाराष्ट्राचे शिल्प घडविण्यासाठीचा पाया रचून दिला. त्यांना त्यामुळे ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ ही ओळख मिळाली. राजकारणात राहूनही त्यांनी त्यांच्यातील संवेदनशील, सुसंस्कृत आणि विचारवंत माणूस कधीच वेगळा पडू दिला नाही.
सर्वसामान्य माणूस व शेतकरी यांच्या प्रश्नांची लहानपणापासूनच जाणीव असलेल्या चव्हाण यांनी सहकार चळवळ बलवान करण्यासाठी त्यामध्ये सर्वसामान्य सभासदांना व शेतकर्यांना मतस्वातंत्र्य असावे, लोकशाही मार्गानेच चळवळ चालली पाहिजे यासाठी नेहमीच आग्रह धरला. शेतकर्यांच्या व्यवसायात अडथळे येऊ नयेत यासाठी सहकारी संस्थांनी जागरूक असले पाहिजे आणि सहकार चळवळ ही कृषी आणि औद्योगिक अर्थव्यवस्थेचे अधिष्ठान आहे, असे ते ठामपणे सांगत. शेतकर्यांच्या मानेभोवतीचा सावकारी पाश तोडून त्यांच्या प्राथमिक मूलभूत गरजा विनासायास भागविण्यासाठी, त्यांना उचित अर्थसाहाय्य मिळावे हा सहकार चळवळीचा मुख्य हेतू होय. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शासनाने या चळवळीला ऊर्जितावस्था आणण्याचे काम सुरू केले. त्यासाठी प्रसंगी पारंपरिक धोरणांमध्ये बदलही केले व नवे कायदे आणले. त्यांच्या याच द्रष्ट्या धोरणांमधून महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, 1960 आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, 1961 हे कायदे व नियम अस्तित्वात आले. त्या कायदे नियमांची 26 जानेवारी 1962 पासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. ही घटनाच महाराष्ट्र राज्याच्या सहकार क्षेत्रात क्रांती घडविणारी होती व चव्हाण आणि त्यांचे सहकारी त्याचे सूत्रधार होते. त्यांनी सहकारी संस्थांना भागधारक, शेतकर्यांसाठी लाभकारक ठरतील अशा स्वरूपाचे अर्थसाहाय्य, शासकीय अनुदान योजना, बँक हमी अशा सोयीसवलती व प्रोत्साहन योजना पुढे आणून सहकार क्षेत्र जोपासले. ग्रामीण भागातील जनतेला व शेतकर्यांना शेतकी कर्ज वितरणासाठी विकास संस्था, जिल्हा बँका आणि राज्य बँका अशी त्रिस्तरीय संरचना त्यांनी निर्माण केली. त्यामुळे शेतीकर्जपुरवठ्यावर नियंत्रण आले आणि धोरण परिणामकारकरीत्या राबविणे शक्य झाले. ज्या साखर कारखान्यांनी महाराष्ट्राला सहकाराची ओळख दिली, ती साखर कारखानदारी, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये खाजगी क्षेत्राकडे होती. परंतु 1945 मध्ये डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखालील परिषदेमध्ये सहकारी तत्त्वावर साखर कारखाना उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रवरानगर येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी देशातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा केला. महाराष्ट्रातील सहकार चळवळीसाठी ही प्रेरणादायी घटना होती. सहकाराची ही ज्योत अक्षय तेवत ठेवण्याचे काम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आस्थेने केले.
यशवंतरावांच्या शेतीपूरक धोरणांमुळे महाराष्ट्रात शेतकरी भागधारकांच्या मालकीचे पुढे अल्पावधीत 18 सहकारी साखर कारखाने उभे राहिले. सरकारने ऊस वाढीसाठी प्रोत्साहनपर योजना आखल्या. त्यातूनच कृषी खात्यामार्फत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस व साखर उत्पादनामध्ये उच्चांक प्रस्थापित झाला. त्यानंतरचा महाराष्ट्र साखर उत्पादनात अग्रेसर राहिला आहे.
याच दरम्यान ग्रामीण भागात शेतीमालावर प्रक्रिया करणार्या अन्य सहकारी संस्था, सहकारी खरेदी-विक्री संघ, बाजार समिती, सहकारी सूत गिरण्या, सहकारी कुक्कुटपालन संस्था, सहकारी दूध उत्पादन संस्था, आदी अनेक उद्योग उभे राहिले. याच सहकारी चळवळीच्या माध्यमातून मग सहकारी पतपेढ्या व नागरी बँकांचे जाळे विणले गेले. ग्रामीण भागामध्ये दळणवळणाच्या सोयी, पाणी, वीज, रस्ते अशा मूलभूत सोयीसुविधा व शैक्षणिक संस्था निर्माण झाल्या आणि ग्रामीण विकासाला गती मिळण्याचे महत्त्वपूर्ण काम झाले.
यशवंतरावांनी आपल्या कार्यकाळात जनतेचा सहभाग व विश्वास मिळवला. त्यामुळेच महाराष्ट्र राज्याला सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, शेती, तसेच सहकार क्षेत्राचा चेहरा मिळाला. शुगर फार्मचे राष्ट्रीयीकरण, नाशिक येथील क्षयरोग चिकित्सालय या कार्याचा समावेश होतो. त्यांनी सफाई कामगारांनी डोक्यावरून मैला वाहून नेण्याची पद्धत बंद करण्यात पुढाकार घेतला, त्यांच्या काळातच नागपूरच्या दीक्षाभूमीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक म्हणून मान्यता मिळाली तसेच महारवतन पद्धत बंद करण्यात आली. अशा रीतीने त्यांनी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणार्या विषयासंबंधी निर्णय घेण्याचे, तसेच कामांना चेतना देण्याचे काम केले.
अतिशय संवेदनशील असणारे चव्हाण कविमनाचे होते. त्यांच्या ‘सह्याद्रीचे वारे’ हा भाषण संग्रह, ‘ऋणानुबंध’, ‘युगांतर’, ‘भूमिका’, या लिखाणांमधून; तसेच ‘कृष्णाकाठ’ या आत्मकथनातून त्यांच्या साहित्य प्रतिभेची ओळख होते. त्यांनी ‘सोनहिरा’ मधून आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांच्या पत्नी वेणूताई या त्यांच्या ऊर्जास्त्रोत होत्या. यशवंतरावांच्या त्या जीवननाद ठरल्या. वेणूताईंचे जून 1983 मध्ये निधन झाले आणि हळवे यशवंतराव एकाकी पडले.