Skip to main content
x

चव्हाण, यशवंत नारायण

नानासाहेब चव्हाण

      शवंतराव नारायणराव ऊर्फ नानासाहेब चव्हाण यांचा जन्म रांजणगाव ता. चाळीसगांव येथे झाला. बी. ए. ची पदवी घेतल्यानंतर चाळीसगावच्या आनंदीबाई बंकट विद्यालयात ते शिक्षकपदी रुजु झाले. १९५१ ते १९५४ या कालावधीत त्यांनी नोकरी केली. ३१ डिसेंबर १९५३ रोजी त्यांनी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ  मर्यादित चाळीसगाव या संस्थेची स्थापना व नोंदणी केली. शाळेतल्या कित्येक विद्यार्थ्यांची चाळीसगाव शहरात राहण्याची सोय नव्हती. त्यांच्यासाठी नानांनी राष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाची स्थापना केली. त्यामुळे अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची मोफत सोय वसतिगृहात झाली.

     वसतिगृह, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, वरिष्ठ महाविद्यालय, तांत्रिक विद्यालय, संगणक केंद्र इ. शाखांचा टप्प्याटप्प्याने विस्तार केला. या शिक्षण संस्थेची आज नऊ बालक मंदिरे, दोन प्राथमिक शाळा, पंचवीस माध्यमिक विद्यालये, पाच कनिष्ठ महाविद्यालये, एक वरिष्ठ महाविद्यालय, एक अंधशाळा, दोन आश्रमशाळा आणि एक संगणक केंद्र अशा ४६ शाखा आहेत. १९६० मध्ये तांत्रिक शिक्षण देणारे खाजगी संस्थेच्या राष्ट्रीय तांत्रिक विद्यालय हे महाराष्ट्रातले पहिले विद्यालय आहे.

     पदयात्रा आणि दिंडी यावर नानांचे असीम प्रेम होते. संत विनोबा भावे यांची भूदान पदयात्रा चाळीसगाव तालुक्यातून गेली. त्यावेळी १९५९ साली रांजणगाव ते चाळीसगाव आणि चाळीसगाव ते मेहूणपुरा अशा पदयात्रेत नाना स्वतः विद्यार्थ्यांसोबत सामील झाले. चाळीसगाव ते दौलताबाद अशी दिंडी टाळमृदुंगासह जनार्दन स्वामींच्या कर्मभूमीत नेली, तर दुसर्‍या वर्षी नाथांच्या कर्मभूमीत चाळीसगाव ते पैठण अशी नेली.

     अध्यात्मिक शिक्षण, गणित व विज्ञानाचे शिक्षण, तांत्रिक शिक्षण, श्रमसंस्कार शिक्षण, अंधांचे शिक्षण, मोलमजुरी करणाऱ्यांचे शिक्षण आणि शेतकर्‍यांचे शिक्षण अशा रीतीने सर्वव्यापी शिक्षण देऊन अनेक प्रज्ञावंत विद्यार्थी तरुण नानांच्या सहवासातून, कर्तृत्वातून निर्माण झाले. हे कार्य करतांना कोणत्याही राजकीय प्रवाहात ते पडले नाहीत. त्यामुळेच महाराष्ट्राचे एकेकाळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नानांना ‘पंढरीचा पांडुरंग’ असे संबोधले आहे.

      साने गुरुजी हे नानासाहेबांच्या जीवनाचे एक दैवत होते. नानांची अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेशी जवळीक निर्माण झाली. रा. ग. मोहाडीकर म्हणतात, “नानांचा साधासुधा वेष, शुभ्र पांढरी टोपी, धोतर व शर्ट यात कधीही बदल झाला नाही.”

      २३ व्या अखिल भारतीय विज्ञान संमेलनात नानासाहेबांच्या कार्याचा गौरव कऱण्यात आला. नाशिक येथील सारडा प्रतिष्ठानने त्यांना 'नंदिनी पुरस्कार' अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला संघाने त्यांच्या संस्थेला 'बालसेवा पुरस्कार' दिला.

 - म. ल. नानकर

चव्हाण, यशवंत नारायण