दामले, मोरो केशव
मोरो केशव दामले हे कवी केशवसुतांचे बंधू. १८९३ साली तर्कशास्त्र,इतिहास व तत्त्वज्ञान हे विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून ते एम.ए. झाले.यासाठी त्यांना दक्षिणा फेलोशिप मिळाली होती. पुढे १८९४ ते १९०७पर्यंत उज्जैनच्या माधव कॉलेजात ते लॉजिक व फिलॉसॉफी या विषयांचे प्राध्यापक होते. १९११ मध्ये त्यांनी ‘शास्त्रीय मराठी व्याकरण’ हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ ९९० पानांचा असून मराठी व्याकरणाची शास्त्रीय पद्धतीने रचना करण्याच्या उद्देशाने लिहिला आहे. पूर्व वैय्याकरणांच्या कृतीचे यात परीक्षण केलेले आहे. इतिहास संशोधक वि.का. राजवाडे यांनी या पुस्तकावर परीक्षणात्मक, सूचनात्मक व संशोधनात्मक असा एक निबंध लिहिला आहे.
‘बर्ककृत आधुनिक असंतोष’, ‘विचार परिभ्रमण’, ‘शुद्धलेखन व सुधारणा’ हे त्यांचे तीन निबंध ‘ग्रंथमाला’ मासिकातून प्रसिद्ध झाले. त्यांनी न्यायशास्त्रावरही एक पुस्तक लिहिले असून ते गायकवाड सरकारने दोन भागात प्रसिद्ध केले. माधव कॉलेज बंद पडल्यामुळे नागपूरच्या सरकारी सिटी हायस्कूलमध्ये त्यांची नेमणूक झाली. परंतु १९१३च्या मे महिन्यात मोरो केशव दामले नागपूरहून पुण्यास येत असताना रेल्वे अपघातामध्ये त्यांचे निधन झाले.