Skip to main content
x

डांगे, सदाशिव अंबादास

     सदाशिव अंबादास डांगे यांचा जन्म हिंगणघाट गावात झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वर्ध्यात झाले. पुढे हिस्लॉप महाविद्यालयातून ते संस्कृत विषय घेऊन १९४२ साली बी.ए. झाले. आपल्या आयुष्यातील सलग ८ वर्षे त्यांनी समाजसेवेकरिता वाहिली. त्यासाठी तामिळनाडू व केरळ हे त्यांचे कार्यक्षेत्र होते.

     त्यांनी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून १९५२ मध्ये एम्.ए. पदवी संपादित केली. त्यांनी १९५५ मध्ये प्रयाग येथून हिंदी भाषेत साहित्यरत्न ही पदवी प्राप्त केली. त्यांनी १९५७ मध्ये नागपूर विद्यापीठातून हिंदी विषयात एम्.ए. पदवी प्राप्त केली. १९६० मध्ये त्यांनी ‘लीजंड्स इन द महाभारत — विथ अ ब्रीफ सर्व्हे ऑफ फोक टेल्स’ या विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर नागपूर विद्यापीठातूनच डी.लिट. पदवी प्राप्त केली. ते विदर्भातील खामगाव — नागपूर येथील महाविद्यालयात १९५४-१९६२ या काळात संस्कृत विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. १९६२-१९६९ ही सात वर्षे त्यांनी नागपूर विद्यापीठातील अधिस्नातक विभागात अधिव्याख्याता म्हणून काम पाहिले. नंतर १९६९-१९७९ या काळात मुंबई विद्यापीठात प्रपाठक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९७९-१९८२ मुंबई विद्यापीठाचे संस्कृत विभागाचे आर.जी. भांडारकर प्राध्यापक पद आणि विभागप्रमुख पद भूषवून ते सेवानिवृत्त झाले. डांगे यांच्या अध्यापनाचे प्रमुख विषय वेद, वैदिक विधी, पुराणे, धर्मशास्त्र आणि व्याकरण हे होते. त्यांचे लेखनकार्य पुढीलप्रमाणे आहे -

     १) ‘लीजंड्स इन द महाभारत’ — १९६९ (दुसरी सुधारित आवृत्ती — ‘मिथ्स फ्रॉम द महाभारत — क्वेस्ट फॉर इम्मॉर्टेलिटी’ — खंड १, १९९७) २) ‘पॅस्टोरल सिम्बॉलिझम फ्रॉम द ऋग्वेद’, - १९७० ३) ‘वेदिक कन्सेप्ट ऑफ फिल्ड अँड द डिव्हाईन फ्रक्टीफिकेशन’ — १९७१, ४) ‘हिंदू धर्म आणि तत्त्वज्ञान’ - १९७३, दु. आ. २०१६, ५) ‘अश्वत्थाची पाने’ - १९७४, ६) ‘कल्चरल सोर्सेस फ्रॉम द वेद’ - १९७७, ७) ‘सेक्शुअल सिम्बॉलिझम फ्रॉम द वेदिक रिच्युअल’ - १९७९, ८) ‘वेदिक मिथ्स इन सोशल पर्स्पेक्टिव्ह’ - १९८२, ९) ‘पुराणिक मिथ अँड कल्चर’ - १९८७, १०) ‘एन्सायक्लोपीडिया ऑफ पुराणिक बिलिफ्स अँड प्रॅक्टिसेस’ - खंड १ ते ५ — १९८६ ते १९९०, ११) ‘क्रिटिक्स ऑन संस्कृत ड्रामाज’ - १९६३; १९९४, (सहलेखिका डॉ. सिंधू डांगे,) १२) ‘डिव्हाईन हिम्स अँड अ‍ॅन्शिएंट थॉट’ खंड १-२, १९९५, १३) ‘पुराकथांचा अर्थ - वाद आणि विवेचन’ - १९९४, १४) ‘टुवर्ड्स अंडस्टॅडिंग हिंदू मिथ्स’ - १९९६, १५) ‘इमेजस फ्रॉम वेदिक हिम्स अ‍ॅण्ड रिच्युअल्स’ - २०००, १६) ‘वेदिक सॅक्रिफाईसेस’ — ‘अर्ली नेचर’ — खंड १-२, २०००, १७) ‘मिथ्स फ्रॉम द महाभारत : स्टडी इन पॅटर्न्स अँड सिम्बल्स’, खंड २, - २००१, १८) ‘मिथ्स फ्रॉम द महाभारत : प्रोब इन अर्ली डिम हिस्ट्री अँड फोकलोर’, खंड ३, - २००१, १९) ‘ग्लिनिंग्स फ्रॉम वेदिक टू पुराणिक एज’ (डॉ. स. अं. डांगे यांच्या शोधनिबंधांचे संकलन) संपादन - डॉ. सिंधू डांगे - २००२. याशिवाय देशी-परदेशी नियतकालिकांतून त्यांचे २६०पेक्षा अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यांनी विविध चर्चासत्रे, विद्यापीठे यांतून मार्गदर्शनपर विद्वत्तापूर्ण अशी शंभराहून अधिक व्याख्याने दिली.

     डॉ. डांगे यांनी वैदिक विधींवर सखोल व चिकित्सक संशोधन केले. त्याला लोकसंस्कृतीच्या अभ्यासाची जोड दिली आणि असा निष्कर्ष काढला की, या दोन्ही संस्कृतींमध्ये देवाण-घेवाण झाली आहे. वैदिक विधींमध्ये लैंगिक प्रतीके अधिकतर आढळतात. हे धार्मिक विधी द्यावा-पृथ्वी मीलनाचे विधी आहेत. त्यांच्यामुळे भूमातेचे आकाशाशी नाते जडते आणि पृथ्वीवर धनधान्य, फळे, पशुपक्षी यांची सुबत्ता होते. यज्ञप्रसंगी वैदिक विधींमध्ये रूढ असणारी लैंगिक प्रतीकात्मकता आजपर्यंत विविध रूपांत टिकून आहे. उत्खननांत उपलब्ध झालेल्या असंख्य अवशेषांतून-विशेषत: विचित्र अवस्थेतील मूर्तीतून ते दृग्गोचर होते, तद्वतच मंदिरांवरील मिथुन-मैथुन शिल्पांतूनही ती दिसते. व्रतांच्या उद्यापनाच्या वेळी आपण जे मेहूण (मिथुन) बोलावतो, तिथवर या विधींची परंपरा आढळते. या संशोधनामुळे वैदिक सूक्तांचे गूढ आणि कूट अर्थ उलगडण्यास मदत झाली. डॉ. डांगे यांनी ‘कॉस्मोसेक्शुअ‍ॅलिझम’ हा नवा शब्द तयार करून इंग्रजी वाङ्मयाला दिला. त्यांच्या संशोधनामुळे आणखी काही कूट प्रश्‍नांची उत्तरे मिळाली. उदा. मुंजीत गोटा का करतात, पाद्री विवाहविधीत वधूचे चुंबन का घेतो, गणपतीच्या उपासनेत लाल रंग आणि मंगळवार यांना का महत्त्व, युद्धात रथाचा ध्वज तुटणे अपशकुनी का ? इत्यादी.

     संस्कृत नाटकांच्या प्रांतात प्रचलित मान्यतांना धक्का देऊन काहीतरी वेगळे प्रतिपादन करण्याचे श्रेय नाटककार भासाला दिले जाते, त्याप्रमाणे डॉ. डांगे यांच्या काही लेखांमधूनही असाच प्रत्यय येतो. ‘उत्तररामचरितम्’ हे भवभूतीचे नाटक करुणरस प्रधान आहे, असा सर्वमान्य समाज! पण आपल्या ‘क्रिटिक्स ऑन संस्कृत ड्रामाज्’ या पुस्तकात (सहलेखिका डॉ. सिंधू डांगे) त्यांनी समाजाला धक्का देऊन प्रस्तुत नाटक विप्रलंभ - शृंगारप्रधान आहे, हे पटवून दिले. सदर पुस्तकातील ‘प्रतिमानाटक अँड राज्यशुल्क ऑफ कैकेयी’ या लेखातही प्राचीन हिंदू धर्मशास्त्रास अनुसरून वेगळा मुद्दा मांडला आहे. दशरथ-कैकेयी यांच्या विवाहसमयी वधुपित्यास दिले गेलेले शुल्क हे अयोध्येच्या राज्याच्या स्वरूपात होते. त्यामुळे दशरथाच्या मृत्यूनंतर अयोध्येचे राज्य, कैकेयीचा पुत्र म्हणून भरताकडे किंवा भरताच्या अनुपस्थितीत कैकेयीच्या भावांकडेच जाणे अपरिहार्य होते. सामान्य माणसांना अज्ञात असणार्‍या गोष्टी तज्ज्ञांच्या प्रयत्नांद्वारे अशा प्रकारे ज्ञात होऊ शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

     डॉ. डांगे यांनी ‘पुराकथांचा अर्थ - वाद आणि विवेचन’ या ग्रंथाची मराठीत निर्मिती केली. प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती करताना त्यांनी Mythology या इंग्लिश शब्दासाठी ‘मिथ/मिथक/दिव्यकथा/देवकथा’ अशा संज्ञा वापरण्याऐवजी पुराकथा ही संज्ञा तयार केली. वरील सर्व संज्ञांपेक्षा पुराकथेची संकल्पना व्यापक आहे. तसेच ‘Functionalism’साठी प्रयोजनवाद आणि ‘Structuralism’ साठी बांधणीवाद ही संकल्पना नव्याने तयार करून वापरली.

     बारा विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवीसाठी सदाशिव अंबादास डांगे यांचे मार्गदर्शन लाभले. मुंबई विद्यापीठात संस्कृत प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यातही डॉ. डांगे यांचा मोलाचा सहभाग आहे.

     डॉ. डांगे यांना एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई तर्फे भारतविद्येतील असामान्य योगदानाबद्दल १९८३ साली रजत पदक प्राप्त झाले. उत्तर प्रदेश संस्कृत अकादमीतर्फे १९८९ मध्ये त्यांना ‘विशिष्ट पुरस्कार’ मिळाला. १९९० मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांच्या संस्कृत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा बहुमान केला. १९९३ मध्ये भारत सरकारने राष्ट्रपती पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. ‘पुराकथांचा अर्थ’ या पुस्तकाला १९९४ मध्ये महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला. तसेच ‘अश्वत्थाची पाने’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. ‘हिंदू आणि तत्त्वज्ञान’ या ग्रंथाला महाराष्ट्र शासन, पुणे विद्यापीठ तसेच केसरी-मराठा ट्रस्ट पुणे यांच्याकडून पुरस्कार प्राप्त झाला. मुंबई विद्यापीठाने संस्कृत विभागात डॉ. डांगे यांच्या स्मरणार्थ ‘प्रा. एस. ए. डांगे भारतविद्या अध्यासन’ असे अध्यासनही स्थापन केले.

     वेद आणि वैदिक कर्मकांड हा जरी त्यांचा प्रिय विषय असला, तरी रामायण-महाभारत, पुराणे, धर्मशास्त्र, व्याकरण, धर्म व पुराकथाशास्त्र तसेच नाटके या अनेक प्रांतातही त्यांची लेखणी स्वच्छंद विहरत होती. त्यामुळेच खर्‍या अर्थाने त्यांना भारतविद्येचा तज्ज्ञ म्हणता येते

  डॉ. गौरी माहुलीकर

डांगे, सदाशिव अंबादास