Skip to main content
x

डांगळे, अर्जुन उमाजी

       र्जुन डांगळे यांचा जन्म मुंबई येथील माटुंगा लेबर कँप येथे झाला. ‘छावणी हालते आहे’ हा त्यांचा पहिला कविता संग्रह. त्याचबरोबर ‘ही बांधावरची माणसं’ हा कथासंग्रह, ‘दलित विद्रोह’, ‘आंबेडकरी चळवळीचे अंतरंग’, ‘मैदानातील माणसे’,

अर्जुन डांगळे यांचा जन्म मुंबई येथील माटुंगा लेबर कँप येथे झाला. ‘छावणी हालते आहे’ हा त्यांचा पहिला कविता संग्रह. त्याचबरोबर ‘ही बांधावरची माणसं’ हा कथासंग्रह, ‘दलित विद्रोह’, ‘आंबेडकरी चळवळीचे अंतरंग’, ‘मैदानातील माणसे’, ‘निळे अधोरेखित’ हे त्यांचे लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘छावणी हालते आहे’ या कविता संग्रहाआधी १९६७ साली ‘आकार’ या प्रातिनिधिक कवितासंग्रहात अर्जुन डांगळे यांची कविता समाविष्ट करण्यात आली होती. ‘दलित पँथर’ या संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या अर्जुन डांगळेंच्या कवितेचे वर्णन करताना दया पवार म्हणतात, “अर्जुनची कविता म्हणजे दलित पँथरच्या चळवळीची ओळख आहे. तत्कालीन मराठी कवितेच्या प्रभावाखाली न येता अर्जुनने आपली स्वतंत्र वाट चोखाळली आहे.”

अर्जुन डांगळे यांच्या कथेसंबंधी राजन गवस लिहितात, “वर्तमानाला थेट प्रतिक्रिया देणार्‍या या कथा रूढ समीक्षा दृष्टीने चिमटीत सापडणे केवळ अशक्य. त्यामुळे समीक्षेचे कानून बदलण्याची धीट मागणी ही कथा करते. दलित चळवळीच्या बहराच्या काळातील गुंते, निर्माण होणारे प्रश्न वाचकासमोर ठेवून विचार करायला भाग पडते.” अर्जुन डांगळे यांनी ‘दलित साहित्य: एक अभ्यास’, ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे: निवडक वाङ्मय’, ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड: काळ आणि कर्तृत्व’, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ’, ‘पॉयझन्ड ब्रेड’ (इंग्रजी) इत्यादी पुस्तकांचे संपादन केले आहे.

‘छावणी हालते आहे’ या कवितासंग्रहास १९७८ साली राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. त्याच वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त आकाशवाणीवरून सादर झालेल्या राष्ट्रीय कविसंमेलनात मराठीचे प्रतिनिधित्वही अर्जुन डांगळे यांनी केले. मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने दिला जाणारा ‘दिवंगत लालजी पेंडसे समाजवादी विचारवंत पुरस्कार’ अर्जुन डांगळे यांना मिळाला आहे. मुंबई विद्यापीठात अर्जुन डांगळे यांच्या ग्रंथांचा वापर संदर्भग्रंथ म्हणून होत असतो. ‘पॉयझन्ड ब्रेड’ या इंग्रजी ग्रंथाला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

अर्जुन डांगळे कवी आहेत तसे कार्यकर्तेही आहेत. ते साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष, महाराष्ट्र फाउंडेशनचे सल्लागार, कॉ.आर.बी. मोरे मेमोरिअल फाउंडेशनचे उपाध्यक्ष, प्रा.डी.डी. कोसंबी एज्युकेशनल ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अशा विविध जबाबदार्‍या पार पाडत आहेत.

अर्जुन डांगळे यांच्या एकूण लिखाणाचे वैशिष्ट्य शोधता आपल्या लक्षात येते की, त्यांच्या साहित्यात गतकाळातील यातनांचे फारसे चित्रण नाही, कारण वर्तमानकाळातील यातनाही सनातन आहेत. अनेक व्याधींनी ग्रासलेल्या समाजाचे शब्दचित्र डांगळे साकारतात. जीवनाच्या मूळ प्रश्नांबाबत या लेखकाला आस्था आहे. दैन्य, शोषण इत्यादींचे चित्रण करणारी कथा केवळ दलितांची असू शकत नाही; तिचे मूळ जागतिक असते, याचे भान देणारी सर्वस्पर्शी कथा-कविता अर्जुन डांगळे यांनी लिहिली.

कवी अर्जुन डांगळे हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करतात. कवीला दूरदृष्टी असते. पुढच्या काळाच्या पाऊलखुणा त्याला दिसतात. चळवळीची वाताहत होते, तेव्हा अर्जुन डांगळे लिहितात,

एकाच गावाला जायला निघालेले हे वाटसरू,

वेगवेगळ्या वाटेने गेले आहेत दूरदूर...

अर्जुन डांगळे यांंनी ७०च्या दशकात केलेले हे भाकित आज खरे ठरले आहे.

दक्षिण भारतातील ‘कला अय्यंगार ‘ पुरस्कार डांगळे यांना प्राप्त झाला आहे. 

- रवींद्र गोळे

डांगळे, अर्जुन उमाजी