Skip to main content
x

दाते, अरविंद रामचंद्र

दाते, अरुण

रविंद रामचंद्र दाते यांचा जन्म इंदूरला झाला. त्यांचे मूळ नाव अरविंद असले तरी संगीताच्या क्षेत्रात ते ‘अरुण दाते’ याच नावाने ओळखले जातात. रसिकाग्रणी, कलासक्त म्हणून प्रसिद्ध असलेले रामूभैया दाते हे त्यांचे वडील होते. घरात सतत मोठमोठ्या कलावंतांचा राबता असल्याने अरुण दाते यांच्यावर लहानपणापासूनच संगीत, साहित्य व उत्तम कलेचे संस्कार झाले. गायनाकडे त्यांचा लहानपणापासूनच ओढा होता. त्यांचा गोड आवाज व गाण्याची आवड बघून कुमार गंधर्वांनी त्यांना पहिली उर्दू गझल शिकवली.
शास्त्रीय संगीत व गझल गायकीवर उत्तम प्रभुत्व असलेले के. महावीर हे त्यांना गुरू म्हणून लाभले. मुंबईत वस्त्रोद्योग अभियांत्रिकी (टेक्स्टाइल इंजिनिअरिंग) चे शिक्षण घेत असतानाच त्यांचे संगीत शिक्षणही सुरू होते. वस्त्रोद्योग अभियांत्रिकीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते बिर्ला उद्योगसमूहात कामाला लागले. नोकरीत प्रगतीचे अनेक टप्पे पार करीत उपाध्यक्ष ह्या उच्चपदावरून ते निवृत्त झाले. सुरुवातीला ते हिंदी व उर्दू गझला रेडिओवर व लहान कार्यक्रमांमधून गात असत. श्रीनिवास खळे यांनी त्यांच्याकडून १९६२ साली  आकाशवाणीसाठी ‘शुक्रतारा’ हे गीत गाऊन घेतले व मराठी भावगीत गायनाच्या क्षेत्रात नवीन तार्‍याचा उदय झाला. त्यानंतर ते सातत्याने श्रीनिवास खळे, यशवंत देव व इतर अनेक संगीतकारांच्या दिग्दर्शनाखाली मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य व इतर अनेक उत्तमोत्तम कवींच्या रचना गात राहिले व अत्यंत लोकप्रिय गायक म्हणून त्यांनी कीर्ती व अनेक मानमरातब मिळवले. त्यांची शुक्रतारा मंद वारा, भेट तुझी माझी स्मरता, अखेरचे येतील माझ्या, धुके दाटलेले, स्वरगंगेच्या काठावरती, जेव्हा तुझी नी माझी, इत्यादी गाणी गाजली.
त्यांनी गायलेल्या गाण्यांची संख्या एकशेतीस आहे. मराठी भावगीत विश्वात अरुण दातेंंनी आपला ठसा उमटवला . ‘शुक्रतारा’ या रसिकप्रिय कार्यक्रमाचे त्यांनी आतापर्यंत २,५२० प्रयोग केले . एकाच गायकाचे, फक्त स्वत:चीच गाणी गाऊन इतके कार्यक्रम होणे हा मराठी संगीत विश्वातला विक्रमच होय.
 १९९३ साली अमेरिकेतील तूसाँ सिटीतर्फे त्यांना मानद नागरिकत्व प्राप्त झाले. तसेच त्यांना ‘शनिवारवाडा कला महोत्सव’ पुरस्कार (२००२), ‘पूर्णवाद कला उपासक’ पुरस्कार (२००८), पहिला ‘स्व. महेंद्र कपूर’पुरस्कार (२००९), पहिला ‘गजाननराव वाटवे’ पुरस्कार (२०१०) राम कदम पुरस्कार (२०१६)  व महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे ‘महाराष्ट्र भूषण’ असे विविध पुरस्कार प्राप्त झाले.

             — ज्योती दाते

दाते, अरविंद रामचंद्र