Skip to main content
x

देखणे, रामचंद्र अनंत

         रामचंद्र अनंत देखणे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील कोरेगाव येथे झाला. प्राथमिक शिक्षण कोरेगाव येथील प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण शिरूर या तालुक्याच्या गावी विद्याधाम प्रशालेत झाले.ते शाळेत सतत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेत पुण्याच्या सर परशुरामभाऊ (एस. पी.) महाविद्यालयात प्रवेश घेऊन त्यांनी बी.एस्सी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील कारखान्यात नोकरी केली. वर्षभरातच प्रदूषण मंडळात त्यांना नोकरी मिळाली. दरम्यान अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान हे विषय घेऊन त्यांनी एम.ए. ही पदवी प्रथम श्रेणीत मिळवली. पाठोपाठ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत जनसंपर्क व प्रसिद्धी अधिकारी म्हणून ते रुजू झाले व तीच त्यांची कर्मभूमी झाली.

‘भारूड वाङ्मयातील तत्त्वज्ञान’ या विषयावर संशोधन करून १९८५मध्ये पुणे विद्यापीठातून त्यांनी पीएच. डी. पदवी प्राप्त केली. कुटुंबातच वारकरी परंपरा व लोकसाहित्याची आवड असल्यामुळे देखणे यांच्याकडेही तो वारसा आला होता. वयाच्या पाचव्या वर्षी वासुदेवाचे सोंग घेऊन त्यांनी  पहिले भारूड सादर केले. १९७२-१९७३मधील दुष्काळात काही काळ शिक्षण सोडून ते आपल्या गावी परत आले असता घरच्या गायी पांजरपोळात नेल्या गेल्या, परंतु रात्रीतून त्या तेथून सुटून परत घरी आल्या. या प्रसंगातून त्यांना कथाबीज मिळाले व ‘जितराब’ ही पहिली कथा त्यांनी लिहिली. त्या वेळी त्यांचे वय केवळ १७ वर्षांचे होते.

त्यानंतर त्यांनी केलेली उल्लेखनीय वाङ्मयसेवा सर्वपरिचित आहे. ‘हौशी लख्याची’, ‘येरवाळीचं येणं’, ‘गोरज’, ‘साठवणीच्या गोष्टी’ हे कथासंग्रह; ‘भूमिपुत्र’, ‘गोपा-निनाद’ या कादंबर्‍या लिहिल्या. ‘भारूड वाङ्मयातील तत्त्वज्ञान’, ‘बहुरूपी महाराष्ट्र’, ‘बहुरंगी भारूड’, ‘लागे शाहिरी गर्जाया’, ‘महाराष्ट्राची सांस्कृतिक लोककला’, ‘महाराष्ट्राचा लोकदेव खंडोबा’, ‘भारूड आणि लोकशिक्षण’, ‘गोंधळ परंपरा, स्वरूप आणि आविष्कार’, ‘आनंद तरंग’, असे संशोधित साहित्य लिहिले. संतसाहित्य, चिंतनात्मक व चरित्रात्मक वाङ्मयात ‘संत साहित्यातील पर्यावरण विचार’, ‘तुका म्हणे जागा हिता’, ‘ज्ञानदीप लावू जगी’, ‘लोकशिक्षक गाडगेबाबा’, ‘जीवनयोगी साने गुरुजी’, ‘एकचि टाळी झाली’, ‘कर्मयोगाचे नीतिशास्त्र’, ‘जीवनाची सुंदरता’, ‘वारी-परंपरा व स्वरूप’, ‘आनंदाचे डोही’ हे लिखाण केले. ‘श्री ज्ञानेश्वरी चिंतन व चर्चा’, ‘नरसिंह’, ‘पर्यावरण बोध’ हे साहित्य संपादित केले. देखणे यांचा लेखनयज्ञ अव्याहतपणे चालू असतो. त्याचबरोबर अखिल भारतीय कीर्तन कुल, पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष, ऑक्टोबर २००४ मध्ये राळेगण सिद्धी येथे झालेल्या पहिल्या ग्रामजागर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांसारखे सन्मान त्यांना प्राप्त झाले.

महाराष्ट्र शासनाचा २००३ चा सांस्कृतिक राज्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार, आचार्य अत्रे उत्कृष्ट कलावंत पुरस्कार, गदिमा पुरस्कार इत्यादी पुरस्कार डॉ.देखणे यांना मिळालेले आहेत.बहिणाबाई चौधरी ‘साहित्यरत्न पुरस्कार’ त्यांना २०१७ साली प्राप्त झाला . 

लेखनाच्या जोडीनेच भारुड आणि लोककला सादरीकरणाचे त्यांचे कार्यक्रमही विशेष लोकप्रिय झाले. 

वयाच्या सहासष्टव्या वर्षी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.  

- सविता टांकसाळे/ आर्या जोशी

देखणे, रामचंद्र अनंत