Skip to main content
x

देसाई, माधवी रणजित

         विविध प्रकारचे लेखन केलेल्या माधवी रणजीत देसाई या मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर व्यक्ती असलेल्या भालजी पेंढारकर यांच्या कन्या. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे सर्व शिक्षण कोल्हापूर येथे झाले. राजाराम महाविद्यालयातून त्या बी.ए. झाल्या. मराठी व इतिहास हे विषय घेऊन पदवीधर झाल्याने त्यांना या दोन्ही विषयांची आवड होतीच. वडिलांच्या सान्निध्यामुळे त्यांचा तत्कालीन अनेक दिग्गजांशी परिचय झाला आणि भालजींमुळे त्यांना धर्म, इतिहास इत्यादींविषयी लहानपणापासूनच आवड निर्माण झाली व वाचनाची गोडी लागली. त्यांनी लहान वयातच  तत्कालीन विविध नामवंत साहित्यिकांचे साहित्य वाचलेले होते. त्यांचा पहिला विवाह काटकर यांच्याशी झाला होता; पण ते अल्पायुषी ठरल्याने १९७५ साली त्यांनी सुप्रसिद्ध साहित्यिक रणजित देसाईंशी पुनर्विवाह केला; पण १९८७ साली त्यांना घटस्फोट घ्यावा लागला.

१९५३ साली, विवाहोत्तर गोव्यात आल्यावर त्यांनी मुक्तिसंग्रामात भाग घेतला व पुढे त्यांना सत्याग्रहात तुरुंगवासही भोगावा लागला. सुमारे सतरा वर्षे त्यांनी मुंबईत अध्यापनही केले. कविता-लेखनाने त्यांच्यातील साहित्यिकाचा जन्म झाला. त्यांचे स्वत:चे जीवन कादंबरीसदृशच झाल्याने त्यांनी आपल्या कथा-कादंबर्‍यांमधून भोवतीच्या स्त्रियांच्या दु:खांना, त्यांच्या जगण्याला शब्दरूप दिले. त्यांचे ‘सायली’, ‘चकवा’, ‘घर माणसांचे’ हे कवितासंग्रह प्रसिद्ध असून ‘असं म्हणू नकोस’, ‘सागर’, ‘कथा सावलीची’, ‘शुक्रचांदणी’, ‘किनारा’ इ. कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. नामवंत हिंदी लेखिका अमृता प्रीतम यांच्या कथांचे अनुवादही त्यांनी प्रसिद्ध केलेला आहेत. कादंबरीकार म्हणूनही त्यांना मान्यता मिळालेली असून गोव्याच्या पार्श्वभूमीवरील ‘प्रार्थना’ ही त्यांची कादंबरी गाजली. गायिका अंजनी मालपेकर यांच्यावरची ‘कांचनगंगा’ ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी. त्यांच्या ‘मंजिरी’, ‘नियती’, ‘सगुणी’ याही कादंबर्‍यांमधून त्यांनी स्त्री-जीवनातले वास्तव मांडलेले आहे. ‘धुमारे’ या ललित लेखसंग्रहातूनही त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन, निसर्गाची नावीन्यपूर्ण रूपे यांची काव्यमय शैलीतली दर्शने वाचकाला खिळवून ठेवतात.

त्यांचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी १८०० ते २००९ या दोन शतकांतील गोव्यातील ६४ कर्तृत्वसंपन्न स्त्रियांची ‘गोमंत सौदामिनी’ या पुस्तकात रेखाटलेली, वाचनीय संदर्भमूल्य लाभलेली शब्दचित्रे.

‘नाच ग घुमा’ या आत्मचरित्रातून त्यांनी स्वतःची कहाणी प्रांजळपणाने सांगितली आहे. एका प्रतिभावंत साहित्यिकाशी विवाह झाल्यानंतर अनेक कारणांनी वाट्याला आलेला अपेक्षाभंग आणि त्यानंतर अपरिहार्यपणे सामोरे आलेले एकाकीपण यांचे हृदयस्पर्शी चित्रण त्यांच्या आत्मचरित्रात आहे.

  भैरू रतन दमाणी पुरस्कार तसेच साहित्य क्षेत्रातील अन्य पुरस्कारही त्यांना लाभले आहेत. 

- मधू नेने/ आर्या जोशी 

देसाई, माधवी रणजित