Skip to main content
x

देसाई, प्रेरणा शैलेश

         प्रेरणा शैलेश देसाई यांचा जन्म मुंबई येथे झाला. नारायणदास व सुमनबेन किल्लावाला यांच्या त्या कन्या आहेत. त्यांनी महाराजा सयाजी विद्यापीठ, वडोदरा म्युझिक कॉलेज येथून भरतनाट्यम् नृत्य या विषयात बी..ची पदवी प्राप्त केली. त्याकरिता त्यांना कलाक्षेत्र शैलीच्या ज्येष्ठ गुरू श्रीमती अंजली मेहर यांचे मार्गदर्शन मिळाले.

मुंबईत परतल्यानंतर त्यांना पंदनल्लूर शैलीचे ज्येष्ठ गुरू नाना कासार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. प्रेरणा देसाई यांच्या ज्येष्ठ भगिनी डॉ. अंजनी अरुणकुमार, ज्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व भरतनाट्यम् नृत्यशैली या दोन्हींचाही अभ्यास केला होता, त्यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले.

 प्रेरणा देसाई यांनी ८ जून १९६८ रोजी पुणे येथे आराधना नृत्यसंस्थेची स्थापना करून नृत्याचे शिक्षण देण्यास प्रारंभ केला. पारंपरिक भरतनाट्यम् मार्गम् च्या  शिक्षणाबरोबरच त्यांनी आधुनिक भरतनाट्यम् मार्गम्  चे ही शिक्षण विद्यार्थिनींना दिले. भरतनाट्यम् नृत्याचे प्रशिक्षण देणारी पुण्यातील महत्त्वाची संस्थाही या संस्थेची ओळख होती. मात्र, पारंपरिक कर्नाटक संगीताऐवजी हिंदुस्थानी संगीतावर आधारित भरतनाट्यम् रचना सादर करण्याचे प्रथम श्रेय प्रेरणा देसाई यांना जाते. डॉ. अंजनी अरुणकुमार यांनी धृपद-धमार व हवेली संगीताचा वापर करून अभ्यासपूर्ण रितीने व कलात्मकतेने भरतनाट्यम् नृत्यासाठी तीन नवीन मार्गम् तयार केले. मात्र, या सर्व रचनांना नृत्याचा साज चढविणे व त्याचे प्रस्तुतीकरण करणे हे फार मोठे काम प्रेरणा देसाई यांनी केले.

बालपणीचे संस्कार व आई-वडिलांकडून आलेली अध्यात्माची ओढ, तसेच महर्षी अरविंद यांच्या विचारांचा पगडा प्रेरणा देसाई यांच्यावर आहे व त्यामुळेच नृत्यप्रस्तुतीतही कला आणि अध्यात्म यांची सांगड त्यांनी घातलेली दिसते. संतों की अमृतवाणीसारख्या अनेक रचनांतून याची अनुभूती रसिकांनी घेतली आहे. कलेची आराधना हा मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे असे मानून त्यांनी सातत्याने त्याचा ध्यास घेतला आहे.

सूर सिंगार परिषदेतर्फे १९७५ साली सिंगारमणीहा किताब, तसेच १९९१ मध्ये लायनेस क्लबकडून उत्कृष्ट शिक्षकपुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. तसेच त्यांना अनेक दिग्गजांकडून कौतुक व शाबासकी मिळाली. बाबुल मोरा नैहर छुटो ही जायया ठुमरीवरील त्यांचे सादरीकरण विशेष प्रसिद्ध झाले. भक्ताची परमेश्वर प्राप्तीची आस त्यात दिसून येते.

शुमिता महाजन, स्वाती दातार, संध्या धर्म, सुलभा तेंडुलकर, नीता सुरा या त्यांच्या शिष्या, तसेच पुत्र स्नेहलकुमार देसाई हे नृत्याची प्रस्तुती व अध्यापन या क्षेत्रांत कार्यरत आहेत.

स्वाती दातार

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].