देशमुख, बाळकृष्ण नरहर
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बाळकृष्ण नरहर देशमुख यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. त्यांचे वडील रावबहादूर नरहर देशमुख अहमदनगर येथे ज्येष्ठ वकील होते. बाळकृष्णांचे शालेय शिक्षण अहमदनगर येथे म्युनिसिपल स्कूलमध्ये आणि ए.ई.सोसायटीच्या शाळेत, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात आणि कायद्याचे शिक्षण पुण्याच्या आजच्या आय.एल.एस. विधि महाविद्यालयात झाले. फर्गसनमधून बी.ए. व एम.ए. आणि विधि महाविद्यालयामधून एलएल.बी. या पदव्या संपादन केल्यानंतर ५ ऑगस्ट १९४१ रोजी ते मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून रुजू झाले. त्यानंतर चौदा वर्षे अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयात त्यांनी दिवाणी आणि फौजदारी, मूळ आणि अपील असे सर्व प्रकारचे खटले यशस्वीरीत्या लढविले.
१२ एप्रिल १९५५ रोजी देशमुख यांची नियुक्ती सहायक न्यायाधीश म्हणून झाली. १९६५पर्यंत त्यांनी विविध ठिकाणी संयुक्त न्यायाधीश आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून काम केले. काही काळ ते मुंबई शहर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीशही होते.
७ जून १९६५ रोजी देशमुख यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून झाली. ६ जून १९६७ रोजी ते उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश झाले. ६ ऑक्टोबर १९७८ रोजी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १८नोव्हेंबर१९८० रोजी ते निवृत्त झाले.
उच्च न्यायालयातील न्या.देशमुख यांच्या पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्यासमोर अनेक महत्त्वाचे खटले आले आणि त्यांत त्यांनी महत्त्वाचे निर्णय दिले. यामध्ये घटनेच्या कलम २२६ च्या व्याप्तीसंबंधी तसेच दिवाणी प्रकिया संहिता (‘सिव्हिल प्रोसिजर कोड’) आणि औद्योगिक विवाद कायदा (‘इंडस्ट्रियल डिस्प्यूटस् अॅक्ट’) यासंबंधी काही प्रश्न समाविष्ट होते. हिंदू वारसाहक्क कायदा (हिंदू सक्सेशन अॅक्ट), जमीन अधिग्रहण कायदा (लँड अॅक्विझिशन अॅक्ट) आणि महाराष्ट्र शेत जमिनी (धारणा-मर्यादा) कायदा (महाराष्ट्र अॅग्रिकल्चरल लँड्स्-सीलिंग ऑन होल्डिंग्ज्-अॅक्ट) कायद्यांतील काही तरतुदींचा अर्थ लावण्यासाठी न्या.देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठांपुढे सुनावणी झाली आणि त्यांत न्या.देशमुख यांनी निर्णय दिले. सुंदर नवलकर खटल्याचाही येथे उल्लेख करता येईल. महाराष्ट्र मोकळ्या जमिनी कायद्याच्या (‘महाराष्ट्र व्हेकंट लँडस् अॅक्ट’) घटनात्मक वैधतेचा प्रश्नही एका खटल्यात त्यांच्यासमोर आला होता.
निवृत्तीनंतर न्या.देशमुख यांनी कायदा-शिक्षणाच्या क्षेत्रात विशेष रस घेतला. पुण्याचे आय.एल.एस. विधि महाविद्यालय आणि स.प.महाविद्यालय यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध होता.