Skip to main content
x

देशपांडे, आत्माराम रावजी

अनिल

           राठी कवितेच्या वाटचालीमध्ये आणि अपारंपरिक शिक्षणक्षेत्रात भरीव योगदान असणारे कवी ‘अनिल’ उपाख्य आत्माराम रावजी देशपांडे यांचा जन्म विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुरातील. अमरावती येथील  तत्कालीन हिंदू हायस्कुलातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात दाखल झाले. वर्‍हाडात त्या काळातल्या पांढरपेशा समाजामध्ये शिक्षणासाठी पुण्याला फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेण्याची जणू चढाओढ असे. अनिलांनी मॅट्रिकची परीक्षा (१९१९) अलाहाबाद येथून उत्तीर्ण केली होती. तत्त्वज्ञान हा विषय घेऊन पुण्यात त्यांनी १९२४ साली बी.ए. ची पदवी घेतली. पुढे त्यांनी कायदे शिक्षणाचे धडे घेतले. मध्यंतरीच्या काळात त्यांनी कोलकाता येथील शांतिनिकेतनात नंदलाल बोस यांच्याकडे भारतीय चित्रकलेचा रीतसर अभ्यास केला. १९२५ साली एल्एल.बी. झाले आणि त्यांनी अमरावतीला वकिली सुरू केली.
           यातूनच होशंगाबाद (मध्य प्रदेश) येथे सब-जज्ज म्हणून त्यांना नियुक्ती मिळाली. कुसुमावती आणि कवी अनिल यांच्यामधील पत्रव्यवहार ‘कुसुमानिल’ पुस्तकात प्रसिद्ध झाला असून एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक म्हणून त्यास मराठी साहित्यात स्थान मिळाले आहे. १९३० साली त्यांच्या काव्यलेखनास प्रारंभ झाला. ‘फुलवात’ हा अनिलांचा पहिला कवितासंग्रह १९३२ साली प्रसिद्ध झाला आणि त्या वेळच्या समस्त मराठी साहित्यविश्वाचे लक्ष ‘फुलवात’ने वेधून घेतले. त्या काळात ‘रविकिरण मंडळा’तील कवींचा बोलबाला मराठीत विशेषत्वाने होता. पांडित्यपूर्ण, संस्कृतप्रचुर शब्दकळा, प्रसंगोत्पातता, शब्दालंकार, यमकादी बंधनांवर कठोर कटाक्ष यांचा त्यांच्या कवितेमध्ये भर असे. या पार्श्वभूमीवर ‘हृदयीं लावियली फुलवात’ अशा ओळी घेऊन अनिलांचा ‘फुलवात’ हा संग्रह बाहेर आला. साधी, सरळ व भावस्पर्शी रचना आणि उत्कट गीतात्मता हे या कवितेचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य ठरले. त्यानंतर तीनच वर्षांनी अनिलांची ‘प्रेम आणि जीवन’ ही मुक्तछंदातील कविता रसिकांपुढे आली. पाठोपाठ १९४० साली अनिलांनी ‘भग्नमूर्ती’ हे आपले चिंतनात्मक खंडकाव्य (१९३५) रसिकांना सादर केले. त्यातून कला आणि संस्कृती यांवर अनिलांनी भाष्य केले आहे. महायुद्ध, भारताचा स्वातंत्र्यलढा, मार्क्सवादाचा पगडा आणि त्याने केलेली एकूणच समाजरचनेची नवी मांडणी, अशा सर्व उठावात्मक चळवळींचा हा काळ. ‘भग्नमूर्ती’ किंवा ‘निर्वासित चिनी मुलास’ (१९४३) ह्या रचनांमधून त्यांचे चिंतनात्मक पडसाद दिसून येतात. या रचनांसाठी अनिलांनी वापरलेल्या मुक्तछंदाने मराठी साहित्यविश्वात मोठेच वादळ निर्माण केले. ‘मुक्तछंद म्हणजे गद्यच आणि परस्फूर्त: अतएव मराठी काव्यपरंपरेला विघातक’ हा अनिलांवरचा मुख्य आक्षेप होता. अनिलांचा छंदःशास्त्राचा दांडगा अभ्यास होता. या आक्षेपाला उत्तर देताना अनिल म्हणतात, “मराठी भाषेची मोडणी आणि पंडितपूर्व कवितेची घडण यांच्याशी मेळ ठेवूनच मुक्तछंदाचा वापर मी केला आहे.” (उदाहरणार्थ ‘प्रेम आणि जीवन’ ही रचना. यात पाच आणि सहा अक्षरांच्या चरणकांच्या स्वैर जुळणीने सिद्ध होणारा मुक्तछंद योजण्यात आला आहे.) 
             ‘फुलवात’ (१९३२) ते ‘पेर्ते व्हा’ (१९४७) आणि ‘सांगाती’ (१९६१) ते ‘दशपदी’ (१९७६) असे दोन ठळक टप्पे अनिलांच्या कवितेमध्ये दिसून येतात. ‘फुलवात’मधून त्यांनी नवथर प्रेमाची जाणीव रेखाटली. ‘पेर्ते व्हा’मध्ये त्यातील भावोत्कटता अधिक सघन झालेली असून त्या सघनतेने सामाजिक आशयाचे भानही तेवढ्याच उत्कटपणे जपले आहे.

‘उद्या! उद्या तुझ्यामधेंच

फाकणार ना उषा?

तुझ्यामधेंच संपणार

ना कधी तरी निशा?

असा प्रश्न ‘पेर्ते व्हा’ मधून अनिल करतात आणि

उद्या, तुझ्यामधें निवांत

आजचा अशांत मी

उद्या! तुझ्यामुळे जिवंत

आजचा निराश मी!!’

असा निरवानिरवीचा आशावादी सूरही उमटवतात.

‘पेर्ते व्हा’ या संग्रहातील ‘बंड’ या कवितेचा शेवट करताना बंडाचा हेतू स्पष्ट करीत अनिल लिहितात,

‘धुळीत मिळविण्यास तडाक्यांत

साम्राज्यें अंधारयुगांचीं

स्थापायास अधिराज्य

समतेचे.’

आशयासाठी मुक्तछंदाचा वापर करीत असतानाही परंपरागत  छंदोबद्धतेची कास अनिल सोडत नाहीत. अशा वेळी केशवसुतांची त्यांच्या कवितेवरील छाया स्पष्टपणे समोर येते.

‘गरीब आणि पावसाळा’ या कवितेत कवी अनिल म्हणतात-

‘इकडे पाणी, तिकडे पाणी, वरखाली पाणी पाणी

दीनवाणी झोपडी कशीतरि तग धरुनी केविलवाणी

उघडी पोरें-गोजिरवाणी-भिरभिर भेदरल्या नयनीं

दारामध्ये उभी बिलगुनी कुडकुडत्या चिमण्यावाणी..’

समाजाचे हे जे चित्र आहे, ते बदलले पाहिजे याची तीव्र जाणीव ‘पेर्ते व्हा’ मधून प्रतिबिंबित होते. भारतातील दारिद्य्र आणि पश्चिमेकडील श्रीमंती यांची तुलना मग स्वाभाविकपणेच अनिल करून जातात-

‘तिकडेच सारें कांहीं

आज येथें कांहीं नाहीं!

तिकडेच आले ढग

तिकडेच बरसात

तिकडेच सांज खुले

आंत भरल्या रंगांत’

लयबद्ध नादमयता, सौंदर्यानुगामी संयत, सौम्य शब्दकळा आणि सामाजिक जाणिवेची चिंतनात्मकता ही अनिलांच्या कवितेची वैशिष्ट्ये. ‘फुलवात’चा अपवाद सोडल्यास ‘प्रेम आणि जीवन’पासून ‘पेर्ते व्हा’पर्यंतच्या सर्व कवितांमधून ती अधोरेखित होतात.
          कवितेसोबतच भारत सरकारच्या समाज शिक्षण खात्याचे संचालक (१९४८-१९५२) म्हणून व नॅशनल फंडामेन्टल एज्युकेशन विभागाचे संचालक (दिल्ली-१९५२ व पुढे) म्हणून देशाच्या शैक्षणिक धोरणातले अनिलांचे योगदान लक्षणीय आहे. युनेस्कोच्या साक्षरता प्रसार तज्ज्ञ समितीवर अनिलांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. या समितीच्या पॅरिस येथील बैठकीच्या (१९६२) अध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड झाली होती. केंद्र व राज्य सरकारांच्या अपारंपरिक शिक्षण, प्रौढ शिक्षण, सर्व शिक्षा अभियान इत्यादी उपक्रमांची पाळेमुळे अनिलांच्या मागील पदांवरील कार्यांमध्ये व उपक्रमशीलतेमध्ये शोधता येतात.
         ‘पेर्ते व्हा’नंतर ‘सांगाती’ (१९६१) व ‘दशपदी’ (१९७६) हे अनिलांचे दोन महत्त्वाचे संग्रह प्रसिद्ध झाले. मालवण येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (१९५८) अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला. याच काळातील शिक्षणाखेरीजची अनिलांची संस्थात्मक कामगिरीही महत्त्वाची आहे. आजचा विदर्भ साहित्य संघ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही त्याची उदाहरणे होत. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या (१ मे १९६०) काळातच विदर्भामध्ये  स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा जोर होता. लोकनायक बापूजी अणे यांच्यासारख्यांचे वैचारिक अधिष्ठान विदर्भाच्या मागणीमागे होते.
        स्वाभाविकपणेच मराठी जनमानसात एक दुभंग निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सामील झालेल्या वेगवेगळ्या विभागांतील समग्र मराठी माणसांच्या भावनिक ऐक्याला बळकटी देण्यासाठी विभागीय साहित्य संस्थांना (महाराष्ट्र साहित्य परिषद- पुणे, विदर्भ साहित्य संघ- नागपूर, मुंबई मराठी साहित्य संघ- मुंबई व मराठवाडा साहित्य परिषद- औरंगाबाद) एका छत्रछायेखाली आणण्याचे, त्यासाठी घटना तयार करण्याचे संस्थात्मक कार्य अनिलांचेच! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक घडणीतील अनिलांचे हे योगदान महत्त्वाचेच आहे. अनिलांनी एकाच साच्याची कविता कधी लिहिली नाही. कवितेच्या अंतरंगात आणि बाह्यांगात त्यांनी वेगवेगळे प्रयोग प्रत्येक टप्प्यावर केले. ‘हृदयीं लावियली फुलवात’ (सांगाती : १९६१) म्हणता म्हणता,

‘सारेच दीप कसे मंदावले आता

ज्योती विझूं विझूं झाल्या

....

सारी स्वरूपे कुरूप झाली

हुरूप कशाचा नाही चित्ता’

असे अतिशय गंभीर, पोक्त नवेच वळण त्यांच्या कवितेने घेतले.

        मं.वि.राजाध्यक्ष म्हणतात, “बिनसरावाची, वेगळी वाट हा कवी धुंडीत आला.” कवितेच्या क्षेत्रातील आपली वाट अडचणीची आहे, याचे पूर्ण भान अनिलांना होते. तरीही ‘फुटे शब्द अशब्दाला’ यावर आणि भारतीय कवि-परंपरेतील ज्ञानेश्वरांवर त्यांची अविचल निष्ठा होती.  पिण्डगत वृत्ती मुमुक्षूची! त्यातूनच ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीला छिद्र करावे आणि त्या छिद्रातून लहानसर शक्तिशाली कॅमेरा आत सोडावा व समाधिस्थ ज्ञानेश्वरांचे छायाचित्र घ्यावे, असा प्रयोग मांडण्याचे धाडस त्यांनी केले होते. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.
        पुरातत्त्व, शिल्प, संगीत आणि तत्त्वज्ञान हे अनिलांच्या आवडीचे विषय. त्यांच्या भावाविष्कारात ह्या सर्वांची सौंदर्यलक्षी सरमिसळ दिसून येते.  त्या आविष्काराला चिंतनाची व एक प्रकारच्या अतृप्ततेची डूब लाभली आहे. सांगती आणि विशेषतः ‘दशपदी’ ह्या संग्रहातील रचनांमधून ती दिसते. ‘सांगाती’मध्ये अनिल ‘आज अचानक गाठ पडे’ असा सूर धरतात आणि ‘दशपदी’मधून त्याचा विस्तार साधतात. या विस्तारात,

‘हाती दिवा होता त्याची कधीच विझून गेली वात

कशानेही उजळत नाही अशी काळीकुट्ट रात’

अशी विषादाची भावनाही वितळून गेलेली असते. 

अनिलांचा ‘दशपदी’ हा संग्रह १९७६मध्ये प्रसिद्ध झाला. एकूण एकोणचाळीस दशपद्या त्यात आहेत. भारतीय परंपरेतील द्विपदी, पंचपदी, अष्टपदी अशा रचनाबंधांमध्ये अनिलांनी दशपदी ह्या नव्या आकृतिबंधाची भर घातली व ती परंपरा समृद्ध केली. मध्यवर्ती आशयस्थानी एकच एक भावावस्था असलेला दहा ओळींचा सलग सोलीव कंद म्हणजे ‘दशपदी’. सयमक मुक्तछंद असेही दशपदीचे वर्णन करता येईल. १९५९पासून त्यांनी हा रचनाबंध हाताळावयास सुरुवात केली. ‘विराणी’ ही त्यातील पहिली रचना, तर ‘तुझ्याविना’ ही शेवटची रचना १९७४ मध्ये लिहिली गेली.

असा उशिरा आलेला पाऊस

तळहातावर झेलून घ्यावा

टिपून ल्यावा पापण्यांवरती

कपाळीच्या घामामध्ये मिळवावा 

असा धीरदेखील दशपदी देते. अर्थात त्यातलाही विषाद लपून राहत नाही. हा विषाद जेव्हा गडद होतो, तेव्हा अनिल लिहितात,

‘कुणि जाल का सांगाल का

सुचवाल का ह्या कोकिळा 

रात्री तरी गाऊ नको खुलवू नको अपुला गळा

आधीच सायंकाळची बरसात आहे लांबली

परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली

हार पूर्वीचा दिला तो श्वास साहुन वाळला

आताच आभाळातला काळोख मी कुर्वाळला....’

अनिलांच्या अशा दशपद्यांतील आर्त रसिकांना ज्ञानेश्वरांच्या आर्ताचे स्मरण दिल्याशिवाय राहत नाही.

‘दशपदी’ या संग्रहामध्ये ‘दशपदी दर्शन’ हे आपले दशपदीसंबंधीचे स्वतंत्र टिपणही अनिलांनी जोडले आहे आणि ‘दशपदी’च्या अंतरंगाची व बाह्यरंगाची मांडणी केली आहे. त्याला जोडूनच विजया राजाध्यक्ष यांनी ‘पदचर्चा’ केली असून ही दोन्ही टिपणे म्हणजे स्वतंत्र काव्यचर्चाच आहे.
           मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांच्या मते, “अनिलांची कविता नेहमीच सौंदर्याचा शोध घेत आली. सौंदर्याचा अर्थ फार व्यापक घ्यायचा....(अनिलांच्या) शेवटच्या दशपद्यांपैकी बहुतेकांत निसर्गाचे नितळ चित्रण आहे. पण ते नुसते वर्णन नाही; निसर्ग आणि कवी एकमेकांशी तादात्म्य झाले आहेत.”

- वामन तेलंग

देशपांडे, आत्माराम रावजी