Skip to main content
x

देशपांडे, नागोराव घनश्याम

    ‘रानारानांत गेलि बाइ शीळ!’ या सुप्रसिद्ध गीताचे निर्माते नागोराव देशपांडे यांचा जन्म त्यांच्या आजोळी सेंदुरजन, ता. सिंदखेडराजा येथे झाला. त्यांचे वडील साखरखेर्डा परगण्याचे (तालुका मेहकर) वतनदार देशपांडे होते. ते राजकारणी व परमार्थ मार्गातले होते आणि त्यांनी धार्मिक व राजकीय स्वरूपाची बरीच रचना केली होती. नागोराव यांचे शालेय शिक्षण मेहकर येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयात झाले. त्यांना गणिताची आवड असल्यामुळे त्यांनी आधी बी.एस्सी.साठी प्रवेश घेतला परंतु नंतर स्वतःची खरी प्रवृत्ती जाणून ते बी.ए.कडे गेले. बी.ए.नंतर एम.ए.कडे ते वळले खरे, तथापि विषमज्वर होऊन पोटाची व्याधी जडल्यामुळे ते तसेच अर्धवट सोडून पुढे ते एल्एल.बी. झाले. अर्थार्जनासाठी त्यांनी मेहकर (जिल्हा बुलढाणा) येथे वकिली केली.

१९२९ साली देशपांडे बी.ए.ला असताना एके रात्री नागपूरला धनतोलीवरून बर्डीकडे पुलावरून येताना ‘शीळ’ या कवितेचा जन्म झाला. टिपूर चांदणे पडले होते, नदीतले पाणी झळकत होते त्याच वेळी बाजूच्या मैदानाकडून बासरीचा घुमणारा आवाज ऐकू येत होता. या वातावरणात मनात ताल उत्पन्न झाला व दहा-पंधरा मिनिटांत ‘शीळ’ कविता झाली,’ अशी या कवितेची जन्मकथा त्यांनी सांगितली आहे. जी.एन.जोशी यांनी ही कविता गायनाच्या बैठकीत म्हणावयास सुरुवात केली, त्या गाण्याची ध्वनिमुद्रिका निघाली व कवी म्हणून ना.घ.देशपांडे प्रकाशात आले. व्यावसायिक गायकाने कवितेला चाल लावून तिची ध्वनिमुद्रिका होण्याचा हा पहिला प्रयोग. ‘शीळ’ (१९५४), ‘अभिसार’ (१९६३), ‘खूणगाठी’ (१९८५) हे त्यांचे प्रसिद्ध कवितासंग्रह आहेत. १९८५ नंतरची त्यांची कविता ‘गुंफण’ (१९९६) या संग्रहात आणि ‘कंचनीचा महाल’, ‘गिरिजेचा संसार’, ‘निःश्वास गीतावली’ व ‘जुईची कळी’ या बर्‍याच पूर्वी लिहिलेल्या चार दीर्घकविता ‘कंचनीचा महाल’ (१९९६) या संग्रहात संकलित केल्या आहेत. त्यांचे आत्मपर ललितलेखन ‘फूल आणि काटे’ (१९९०) या पुस्तकात ग्रंथित झाले आहे.

ना.घ.देशपांडे यांनी निःसंकोचपणे प्रेमकविता लिहिली. निर्भरता आणि धुंदी हे या प्रेमकवितेचे अंगभूत विशेष आहेत. स्त्री-पुरुषांना परस्परांविषयी वाटणारी नैसर्गिक ओढ, प्रेमातील उन्माद व व्याकूळता त्यांनी प्रत्ययकारी शब्दांत व्यक्त केली. त्यांना आपल्या कवितेमधून कुठलेही समाजप्रबोधन करावयाचे नाही किंवा कोणत्याही समस्याग्रस्त स्त्रीचित्रणासाठी कवितेचा वापर करावयाचा नाही. या कवितेतून प्रकटणारे प्रेम सर्वस्वी लौकिक, असांकेतिक व उत्कट आहे. ‘झाले जगाचे कडे माझ्यातुझ्याएवढे’ असे प्रेमातच सर्व विश्व पाहणारी स्त्री त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. ‘कायदा येथील न्यारा ये। करूं वेडाच सौदा प्रेम दे। अन् प्रेम घे अन् यौवनाची ही नव्हाळी’ हा ना.घ.देशपांडे यांच्या कवितेचा मंत्रच म्हणता येईल. ‘नजरेचे जुगार। तुझ्यामाझ्यांत गऽ!’ अशी प्रीतिभावना त्यांच्या कवितेतून व्यक्त होते. ‘फार नको वाकू। जरी उंच बांधा। फार नको झाकू। तुझा गौर खांदा.... श्वास तुझेमाझे। जसा रानवारा। प्रीत तुझीमाझी। जशी सांजतारा’ अशी मनमोकळी, अकृत्रिम प्रेमाभिव्यक्ती हा ना.घ.देशपांडे यांच्या प्रेमकवितेचा स्थायिभाव आहे. धीट प्रणयानुभूती, चित्रमयता आणि नाद यांचा सुमेळ साधणारी गीतात्म रचना आणि भाव व भाषा यांच्यातील परस्परपूरकता हे विशेष त्यांच्या काव्यात एकवटलेले दिसतात. ‘मन पिसाट माझे अडले रे (पिसाट मन), अंतरीच्या गूढ गर्भी (आता), नदी किनारी, नदी किनारी, नदी किनारी, गऽ (नदी किनारी), घर दिव्यात मंद तरी। बघ, अजून जळते वात (अजून)’ अशा त्यांच्या अनेक कविता मराठीमधील गीते म्हणून प्रसिद्धी पावल्या.

ना.घ.देशपांडे यांचा स्त्रीविषयक दृष्टीकोन मराठीतील अन्य कवींपेक्षा वेगळा आहे. ‘या विश्वाच्या प्रक्रियेत स्त्री हा एक मूलभूत महत्त्वाचा घटक आहे, अशी माझी निष्ठा आहे... ती एक सर्जनाची महत् शक्ती तर आहेच, पण जीवनात आकर्षण उत्पन्न करणारी एक मंगलमय प्रेरणाही आहे. माझ्या कवितांत स्त्रीविषयक कविता जास्त आहेत, असे काही लोक म्हणतात व ते खरेही आहे. ही उणीव आहे असे मला वाटत नाही. हे नैसर्गिक व काही अंशी आवश्यक आहे. हे आकर्षण जिवंत ठेवण्यासाठीच पार्वतीचे पुरातन नर्तन झाले होते. विश्वमनात या आकर्षणाचे स्पंदन सुरू आहे’ या शब्दांत त्यांनी आपली काव्यांर्गत स्त्रीविषयीची भूमिका, ‘खूणगाठी’च्या प्रस्तावनेत मांडली आहे. आपली काव्यनिर्मितीची प्रक्रिया कशी घडते, ते स्पष्ट करताना ना.घ.देशपांडे लिहितात ‘रात्रीच्या गहन अंधारात काळ्यानिळ्या ढगांत एकच एक वीज झळकून जावी व एक सुंदर सोहळा एकच क्षण उभा राहावा असे कविता येताना मनात होते. सारे मन प्रकाशित व पुलकित होते. या झळकीची ओढ व आठवण अट्टाहास मनाला पकडते. हा सोहळा चिरंतन व्हावा अशी प्रेरणा होते. काही आकार, काही विकार, काही रंग, काही गंध, काही स्पर्श, काही स्वर, काही भूत, काही भविष्य, काही वर्तमान एकमेळ होऊन मनाच्या आकाशात शब्द होऊन उचल घेतात. मनातला चितारी त्यांची गुंफण करतो. ती कविता असे मला वाटते. ही झळक का व केव्हा येते, हे सांगणे फार कठीण आहे.’(‘खूणगाठी’, प्रस्तावना,)

नायिकांची प्रणयातुरता व मुक्त प्रेमजीवनाविषयीची आसक्ती त्यांच्या कवितांतून अनेकवार व्यक्त होते. ‘अभिसार’ हे शीर्षक या दृष्टीने सूचक आहे. त्यांच्या प्रेमकवितेने शारीरिकता टाळली नसली, तरी मनोमीलनावाचून त्यांच्या प्रेमभावनेला पूर्णता लाभत नाही. किंबहुना, मनोमीलनानंतर शरीरमीलन असा क्रम त्यांच्या अनेक कवितांतून प्रतीत होतो. आपल्या कवितेतील भावाभिव्यक्ती करण्यासाठी काही वेळा ना.घ.देशपांडे निसर्गाचे साहाय्य घेतात. या दृष्टीने ‘अभिसार’ संग्रहातील त्यांच्या कविता पाहण्याजोग्या आहेत. नायिकेचे एकटेपण, सळसळणारे वारे, लुकलुकणारे तारे, फुलांचे हार माळून उभी असलेली जाई, झिंगलेले रान, किर्र रात्र, सर्व विश्वावर चढलेली विलक्षण धुंदी, या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘अभिसार’ कवितेतील नायिकेच्या मनातील उत्कट प्रीतिभावना रम्याद्भुत स्वरूपात प्रकटली आहे. निसर्गानुभूतींचे चित्रण करताना त्यांची कविता रंगसंवेदनांचा उपयोग अटळपणे मनमुराद करते.

ना.घ.देशपांडे यांच्या दीर्घकविता रचनादृष्ट्या व आशयदृष्ट्या संपन्न म्हणाव्यात अशा आहेत. ‘निःश्वास गीतावली’ ही आईच्या निधनावरील विलापिका होय. ती सुमंदारमाला या पल्लेदार वृत्तात लिहिली आहे. या सबंध विलापिकेला मातृनिधनाने उचंबळून आलेल्या हृदयातील अनिवार भावनांची गती लाभली आहे. ‘तुझे भास होतात कित्येक आता अहोरात्र येते स्मृती अंतरी। हळू फाटणार्‍या ढगांतून काळ्या जशी पाझरे चंद्रिका पांढरी’ या शब्दांत आईच्या आठवणीने व्याकूळ झालेले कवीचे हृदय बोलते केले आहे.

‘कंचनीचा महाल’ ही दीर्घकविता एका दंतकथेवर आधारलेली आहे. ‘मेहकरच्या उत्तरेला पैनगंगेच्या काठी अर्धगोल टेकडीच्या एका भागात एक जुनी वास्तू आहे. तिला ‘कंचनीचा महाल’ म्हणतात..... तेथे एक कंचनी राहत होती. तिला लोणार येथील सरोवरापाशी असलेल्या कमलजा देवीच्या मंदिराचा दिवा तिच्या महालातूनच बघायचा होता. तिने मजल्यावर मजले बांधत सात मजले बांधले व दिवा पाहिला. मात्र दिवा पाहिल्याबरोबर ती शिळा होऊन महालासमोर पडली. आत्ता आत्तापर्यंत तो शिळेचा दगड कायम होता. आता ही वस्तू भग्नावस्थेत असून पूर्वेकडून वर जाण्याच्या काही पायर्‍या शिल्लक आहेत.’ (‘कंचनीचा महाल’, प्रस्तावना)

‘गिरिजेचा संसार’ ही एका कुमार्गी लागलेल्या तरुणीसंबंधीची कविता आहे. ‘जुईची कळी’ या कवितेत सबायतीचा उपयोग केला आहे. ‘मराठीत प्लुतात ‘अ’ मिळवून कवितेत उपयोजितात. या कवितेत ‘अगोट्’ वृत्त वापरून उच्चारातील प्लुत कायम ठेवले आहेत.’ (तत्रैव, प्रस्तावना)

काळाच्या ओघात त्यांची कविता छंदोबद्धतेकडून मुक्ततेकडे वळली. या ‘गद्यघोषा’बद्दल ते स्वतः समाधानी होते. कारण ‘या नव्या पद्धतीत कमी स्वरसंख्येत जास्त अर्थ येतो, म्हणजे कवितेची भाषा जास्त सकस होते.... शिवाय निरनिराळे भाव व्यक्त करण्याला आवश्यक व निवडक शब्दांचा उपयोग व भावानुकूल शब्दक्रम करायलाही मदत होते’ असे स्पष्टीकरण ‘खूणगाठी’च्या प्रस्तावनेत त्यांनी दिले आहे. स्वतःचा प्रकृतिधर्म ओळखून त्यानुसार काव्यरचना करणारा मराठीतील गुणवान गीतकाव्याचा निर्माता म्हणून ना.घ.देशपांडे यांचे मराठी कवितेतील स्थान अढळ आहे.

- प्रा. डॉ.विलास खोले

देशपांडे, नागोराव घनश्याम