Skip to main content
x

देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण

    वघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व बनून जवळजवळ अर्धशतक महाराष्ट्राला रिझवणार्‍या पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ ‘पुल’ ह्यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ गावदेवी इथल्या कृपाळ हेमराज चाळीमध्ये झाला. त्यांचे वडील लक्ष्मणराव देशपांडे उर्फ आबा बेळगावच्या चंदगड गावचे. आपल्या ओढग्रस्तीच्या कुटुंबजीवनात त्यांनी संगीतप्रेम जपले, जे पुढे पुलंमध्येही आले. पुलंचे आजोबा (आईचे वडील) म्हणजे कारवारचे वामन मंगेश दुभाषी. त्यांनी ‘ऋग्वेदी’ या टोपणनावाने ग्रंथ लिहिले. त्यांचा ‘आर्यांच्या सणांचा इतिहास’ हा ग्रंथ, त्यांनी केलेले टागोरांच्या ‘गीतांजली’चे भाषांतर हे त्यांच्या व्युत्पन्नतेचे द्योतक आहेत. त्यांच्या कन्या कमल (सौ. लक्ष्मीबाई) ह्या पुलंच्या मातोश्री. गोड गळा आणि पेटीवादनाची आवड ही त्यांची वैशिष्ट्येही वंशपरंपरेने पुलंमध्ये आली. आई-वडील, आजी-आजोबा, शेजारी राहणारे मातुल कुटुंब यांच्या निगराणीत पुलंचे बालपण अगोदर जोगेश्वरी व नंतर विलेपार्ले येथे आनंदात गेले.

नकला करणे, गाणे म्हणणे, पेटी वाजवणे, नाटके लिहिणे-बसवणे, त्यांत भूमिका करणे, उत्तमोत्तम भाषणे ऐकणे आणि स्वतः करणे अशा अनेक उपक्रमांमधून पुलंचे व्यक्तिमत्त्व विकसित होत होते. उत्तम निरीक्षण, उत्तम भाषाप्रभुत्व आणि हरहुन्नरीपणा ह्यांच्यामुळे त्यांचा नावलौकिक होत होता. पुलंनी १९३६ साली मॅट्रिक, १९३८ साली इंटर आणि १९४१ साली एल.एल.बी पूर्ण केले. (या काळात इंटरच्या परीक्षेनंतर थेट एल.एल.बी. होता येत असे.) पण १९४१ साली वडिलांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे पुलंना त्यांचे मुंबईचे बिर्‍हाड आवरून पुण्याला स्थलांतरित व्हावे लागले. कष्टी आई आणि उमेदीच्या वयातली भावंडे (बंधू उमाकांत, रमाकांत आणि बहीण मीरा) यांना वडिलकीचा आधार द्यावा लागला. १९४२ साली पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयामध्ये बी.ए.साठी नाव नोंदवणे, चरितार्थासाठी भावगीतांचे कार्यक्रम करणे अशी धडपड सुरू झाली. १९५० मध्ये सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून ते एम.ए. झाले. त्यानंतर बेळगावच्या राणी पर्वतीदेवी महाविद्यालयात, मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात आणि मालेगाव शिक्षण संस्थेत त्यांनी अध्यापनाचे काम केले. १९४३ साली बडोद्याच्या ‘अभिरुची’ मासिकामध्ये पुलंनी लिहिलेले अण्णा वाडगावकर हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले. तिथून त्यांची अर्धशतकी लेखकीय कारकिर्द सुरू झाली.

१९४४ साली बी.ए. झाल्यावर दादरच्या ओरिएन्ट हायस्कूलमध्ये ते शिक्षकाची नोकरी करू लागले. रत्नागिरीच्या ठाकूर वकिलांची कन्या सुनीता ह्या सहशिक्षिका तेथे त्यांना भेटल्या. १२ जून १९४६ रोजी रत्नागिरी येथे नोंदणी विवाह करून दोघांनी ५४ वर्षांचे समृद्ध दांपत्यजीवन अनुभवले.

नाटककार खेळीया-

चिंतामणराव कोल्हटकरांच्या ललितकलादर्शनाच्या नाटकानंतर मो. ग. रांगणेकर ह्यांच्या नाट्यनिकेतन कंपनीच्या नाटकांमध्ये पुल काम करीत असत. रांगणेकर लिखित-दिग्दर्शित ‘कुबेर’ या चित्रपटात पुलंनी नायकाच्या धाकट्या भावाची भूमिका केली. ‘जा जा ग सखी, जाऊन सांग मुकुंदा’ हे गीतही गायले. इथून त्यांची मराठी चित्रपटसृष्टीतील झगमगती कारकिर्द सुरू झाली. १९४७ सालच्या ‘कुबेर’पासून १९५४ सालच्या ‘गुळाचा गणपती’पर्यंत एकूण २४ मराठी चित्रपटांत कथा, पटकथा, संवाद, संगीत, भूमिका, दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रांमध्ये पुलंची कामगिरी घडली.

‘तुका म्हणे आता’ हे मंचस्थ झालेले पुलंचे पहिले नाटक. ८ नोव्हेंबर १९४८ रोजी त्याचा पहिला प्रयोग पुण्यात झाला. यश मिळाले नाही, पण रंगभूमीवरचे प्रेम दृढ झाले. डिसेंबर १९५५ मध्ये आकाशवाणीच्या सेवेत, पुणे केंद्रावर ते रुजू झाले. १९५९ ते १९६१ या काळात भारतातल्या दूरदर्शनचे पहिले निर्माते म्हणून दिल्लीत आकाराला आलेली कारकिर्द ही त्यांच्या प्रसारमाध्यमातल्या जाणकारीची द्योतक ठरली. १९५७-५८ हा काळ त्यांच्या जीवनात अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरला. २६ जानेवारी १९५७ रोजी ‘तुझे आहे तुजपाशी’ हे त्यांचे सामाजिक नाटक रंगभूमीवर आले. ते मराठी नाट्यसृष्टीतील मैलाचा दगड मानले जाते.

याच काळात जनवाणी, साधना, दीपावली, शिरीष, विविध वृत्त वगैरे नियतकालिकांमधून बटाट्याच्या चाळीतल्या सामूहिक घडामोडी विनोदी अंगाने रंगवणारे त्यांचे लेख प्रसिद्ध झाले. ते खूप गाजले. १९५८ साली मौज प्रकाशन गृहाने त्यांचे ‘बटाट्याची चाळ’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. २० ऑगस्ट १९५८ ला पुलंनी युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मिडिया ऑफ मास एज्युकेशनचा अभ्यास करण्यासाठी लंडन गाठले. इंग्लंडमधल्या त्या वास्तव्यावर, एकूण प्रवासावर आधारलेले ‘अपूर्वाई’ हे त्यांचे प्रवासवर्णन अगोदर किर्लोस्कर मासिकात क्रमशः प्रसिद्ध झाले. नोव्हेंबर १९६० मध्ये ते पुस्तकरूपाने आले. लंडनमधल्या मुक्कामातच ‘बटाट्याची चाळ’मधल्या निवडक अंशांचे जाहीर अभिवाचन त्यांनी केले, जी पुढे विलक्षण गाजलेल्या एकपात्री खेळाची नांदी होती. अशा प्रकारे नाटककार पुल, प्रवासवर्णनकार पुल आणि खेळीया पुल. हे तिघेही १९५७-५८ मध्ये उदयाला आले.

विनोदाची पखरण-

पु.लंच्या या सर्व आविष्कारांमध्ये विनोदाची सुखद पखरण होती. शिवाय स्वतंत्रपणे विनोदी साहित्यही त्यांनी विपुल प्रमाणात लिहिले. त्यामुळे त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वामधला विनोदकार हाच बहुसंख्य लोकांच्या स्मरणात राहिला, जवळचा वाटला. स्वतःच्या रोजच्या, सामान्य जीवनाकडे बघण्याची एक उमेदी निकोप जीवनदृष्टी त्यांना पुलंनी दिली. पुलंपर्यंतच्या गाजलेल्या मराठी विनोदकारांनी मानसपुत्र निर्माण केले.

पुलंनी बटाट्याची चाळमधून साठ बिर्‍हाडांचा एक मानस-समूह निर्माण केला आणि त्यांच्या दैनंदिन जगण्यातून मध्यमवर्गीय जीवनसरणीची मार्मिक उलटतपासणी केली. सूक्ष्म निरीक्षण, भाषेवर विलक्षण हुकमत, उपरोध-उपहास-विडंबन ह्यांचा सहज वापर, विविध क्षेत्रांमधील संदर्भांची समृद्धी, सहृदयता आणि तारतम्याचे भान ह्यांमुळे पुलंचा विनोद सहजसुंदर झाला. निर्विष झाला.

जगातल्या दोन महायुद्धांनी हादरलेली, देशाच्या पारतंत्र्याने पिचलेली, महागाई-टंचाई-कुचंबणा-कोतेपणा ह्यांनी गांजलेली वेळोवेळी येणार्‍या साम्यवाद-समाजवाद-स्त्रीवाद ह्या नवविचारांचा अर्थ लावताना गांगरलेली, जीवनाचा उपभोग घेताना अपराधगंडाने पछाडलेली अशी माणसे ही पुलंचे लक्ष्य होती. त्यांना पुलंनी आपल्या व्यक्तित्वाने, कर्तृत्वाने, वक्तृत्वाने मोकळेढाकळे केले. जीवनोन्मुख केले. ‘खोगीरभरती’, ‘नसती उठाठेव’, ‘गोळाबेरीज’, ‘हसवणूक’, ‘खिल्ली’, ‘मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास’ ह्या त्यांच्या विनोदी लेखसंग्रहांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. तर ‘वार्‍यावरची वरात’, ‘असा मी असा मी’, ‘हसवण्याचा माझा धंदा’, ‘वटवट’ इत्यादी बहुरूपी कार्यक्रमांचे शेकडो प्रयोग मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. अपूर्वाईनंतर ‘पूर्वरंग’, ‘जावे त्याच्या देशा’, ‘वंगचित्रे’ इत्यादी प्रवासवर्णनपर लेखनातून मराठी माणसाला बोटाला धरून त्यांनी जगभर फिरवले, त्यांची क्षितीजे विस्तारली. ‘सारं कसं शांत शांत’, ‘विठ्ठल तो आला आला’, ‘पूर्वज, सांत्वन’, ‘मोठे मासे छोटे मासे’ इत्यादी एकांकिकांमधून मराठी मनाला हसत-खेळत चिमटे काढले. पुलंनी विनोद लिहिला, अभिनीत केला, उत्तम वक्तृत्वाने तो लोकांपर्यंत पोहोचवला, सिनेमा-नाटकांतून तो दाखवला. इतक्या दीर्घ काळ मुक्तहस्ताने विनोदाची चौफेर उधळण करणारा दुसरा विनोदकार मराठी समाजाला मिळाला नाही. मात्र पुल केवळ विनोदकार नव्हते.

गुणग्राही कलावंत- 

१९७७ मध्ये देशात आणीबाणी जाहीर झाली आणि पुलंमधला विवेकवादी स्वातंत्र्यप्रेमी लोकांसमोर आला. सेवादलाचे, गांधीजी व सावरकर यांच्या विचारांचे, पुढे लोहियाप्रणित समाजवादाचे संस्कार घेतलेले पुलंचे मन तेव्हाच्या राजकारण्यांतल्या मनमानीमुळे व्यथित झाले. आणि काही काळ त्यांनी विदूषकाचा पोषाख उतरवून लेखणीचे शस्त्र हाती घेतले. आणीबाणीच्या विरोधातली पुलंची जाहीर भाषणे, ‘खिल्ली’ ह्या पुस्तकात संग्रहित झालेले राजकीय उपहासपर लेख, जयप्रकाशजींच्या डायरीचा अनुवाद यांतून वेगळेच पुल लोकांना ऐकायला-वाचायला मिळाले.

पुलंमधली गुणग्राहकता, मूल्यविवेक, उत्कट भव्यतेची आस आणि क्षुद्रतेचा तिटकारा हे सारे त्यांना नुसते रंजनपर लेखक राहू देत नव्हते. देश-परदेशांत जिथे काही चांगले काम होत असेल, त्याची नोंद घेणे, ते करणार्‍यांना मानाचा मुजरा करणे ही त्यांची आंतरिक गरज होती. तिच्यापोटी त्यांनी अत्यंत प्रभावी व्यक्तिचित्रे लिहिली जी पुढे ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘गणगोत’, ‘गुण गाईन आवडी’, ‘मैत्र’ इत्यादी पुस्तकांमध्ये संग्रहित झाली. ह्या गुणग्राहकतेचा वेगळा आविष्कार म्हणजे त्यांनी केलेली भाषांतरे-रूपांतरे ‘सुंदर मी होणार’, ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘राजा आयदिपौस’, ‘एक झुंज वार्‍याशी’, ‘ती फुलराणी’ ही त्यांची नाटके गाजलेल्या पाश्‍चात्त्य कलाकृतींवर आधारलेली होती. हेमिंग्वेच्या ‘ओल्ड मॅन अ‍ॅन्ड द सी’ ह्या कादंबरीचा ‘एका कोळियाने’ हा त्यांनी केलेला अनुवादही लक्षणीय होता. ह्याखेरीज दाद देण्याचा एक वेगळा उपक्रम पुलंनी सपत्नीक केला. तो म्हणजे बा.सी. मर्ढेकर, बा.भ. बोरकर, आरती प्रभू इत्यादी ज्येष्ठ कवींच्या कवितावाचनाचे जाहीर कार्यक्रम करणे. एका कलावंताने दुसर्‍या कलावंतांना अशी जाहीर दाद देणे, त्याच्यासाठी परिश्रम घेणे हे दुर्मिळच म्हणावे लागेल.

पुलंच्या सामाजिक जाणिवेचा ढळढळीत आविष्कार म्हणजे त्यांनी १९६६ साली स्थापन केलेले पु.ल. देशपांडे प्रतिष्ठान.  ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी॥’ हे ब्रीदवाक्य असणार्‍या या सामाजिक विश्वस्त निधीतून पुलंनी विविध शैक्षणिक-सांस्कृतिक संस्थांना आपल्या हयातीत सुमारे एक कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले.

ह्या प्रदीर्घ आणि झगमगत्या कारकिर्दीत पुलंना अनेक मानसन्मान मिळाले. अध्यक्षपदे, पारितोषिके, सत्कार ह्यांनी उत्तरायुष्य गजबजून गेले. उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार १९५८ ते १९६६ ही सहा वर्षे त्यांच्या सहा पुस्तकांना ओळीने मिळाले. ती पुस्तके म्हणजे ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘बटाट्याची चाळ’, ‘अपूर्वाई’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ आणि ‘पूर्वरंग’. यांपैकी ‘व्यक्ती आणि वल्ली’ पुस्तकाला १९६६ चा साहित्य अकादमी पुरस्कारही प्राप्त झाला, याच वर्षी भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ दिली गेली. १९९० मध्ये ‘पद्मभूषण’ हा किताब मिळाला.

याखेरीज मध्य प्रदेश शासनाचा कालिदास सन्मान, बालगंधर्व स्मृतिगौरव मानचिन्ह, ग.दि.मा पुरस्कार, गडकरी पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, रवींद्र विद्यापीठ, कोलकाता यांच्यातर्फे ‘साहित्याचार्य’ (म्हणजेच डी.लिट) पुणे विद्यापीठ-टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या तर्फे डी.लिट, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाट्यसंमेलन, तमाशा परिषद यांची अध्यक्षपदे, पहिल्या जागतिक मराठी परिषदेतर्फे गौरव असे अनेक मान-सन्मान पुलंकडे चालत आले. ह्या सर्वांचे एक कायमस्वरूपी प्रदर्शन विलेपार्ले इथल्या लोकमान्य सेवा संघामध्ये योजलेले आहे. तो एका व्यक्तीचा जीवनपट आहे. तसेच महाराष्ट्राच्या एका सांस्कृतिक कालखंडाचा तो धावता आढावाही आहे.

- मंगला गोडबोले

देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण