Skip to main content
x

देशपांडे, यशवंत खुशाल

     हानुभाव वाङ्मयाचे अभ्यासक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला. प्राथमिक शिक्षण घनज येथे तर माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण अनुक्रमे अमरावती व मुंबई येथे झाले. १९०६ साली ते एम.ए झाले. एल्एल.बी. झाले. यवतमाळमध्ये वकिली सुरू केली व १९४०मध्ये व्यवसायातून निवृत्त झाले. १९०७ मध्ये त्यांची ‘माझी शांती’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली.

डॉ. भांडारकर व इतिहासाचार्य राजवाडे यांच्या संशोधन कार्याने प्रभावित झाल्यामुळे, त्यांना संशोधन कार्याची आवड उत्पन्न झाली. हिंदुस्थानभर हिंडून संस्कृत व मराठी ग्रंथ, ऐतिहासिक कागदपत्रे, शिलालेख, ताम्रपट, नाणी, मूर्ती, छायाचित्रे या दुर्मिळ गोष्टी ह्यांचा संग्रह त्यांनी केला.

१९२६ मध्ये यवतमाळ येथे ‘शारदाश्रमची’ स्थापना केली. त्याच्यातर्फे प्रकाशित होणार्‍या ‘शारदाश्रम’ (१९३३) या वार्षिकाचे संपादनही केले. ‘थिऑसॉफिकल सोसायटी’, ‘प्राच्यविद्या परिषद’ यांच्या कार्यात त्यांचा सहभाग होता. १९३९ मध्ये झुरिक येथे भरलेल्या जागतिक इतिहास परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. ब्रुसेल्स येथे झालेल्या प्राच्यविद्या परिषदेलाही ते उपस्थित होते. ‘रॉयल सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन’च्या सदस्यत्वाचा बहुमान त्यांना मिळाला होता.

मराठी साहित्याच्या दृष्टीने देशपांडे यांचे बहुमोल कार्य म्हणजे महानुभाव वाङ्मयाचा त्यांनी करून दिलेला परिचय होय. यासाठी त्यांनी उभा महाराष्ट्र, पंजाब, पेशावरपर्यंत भ्रमंती केली. कित्येक महानुभाव मठांना त्यांनी भेटी दिल्या. तिथल्या महंतांशी चर्चा केल्या. माहिती संग्रहित केली. अनेक ग्रंथांचे वाचन केले. त्यानंतर त्यांनी ‘महानुभावीय मराठी वाङ्मय’ (१९२६) हा ग्रंथ सिद्ध केला. याशिवाय ‘ऋद्धिपूरवर्णन’ (१९२९), ‘श्रीचक्रपाणी चरित्र’ (१९३६), ‘पंडित भीष्माचार्य संकलित निरुक्तशेष (१९६१) या ग्रंथांचे संपादन केले. सुंदरी लिपीमध्ये लिहिलेल्या ‘भीष्माचार्य पाठ’, ‘वाइन्देशकार पाठ’, ‘विराट पाठ’ अशा विविध पाठांच्या आधारे, संशोधनपूर्वक संपादन केलेला मराठी वाङ्मयातील गद्यचरित्र ग्रंथ म्हणजे ‘श्रीचक्रपाणी चरित्र’. या प्राचीन चरित्रग्रंथाचे महत्त्व केवळ भाषेच्याच दृष्टीने नसून, १३व्या शतकाच्या पूर्वार्धातील चालीरिती, संस्कार इत्यादींची माहिती या ग्रंथातून होते. तत्कालीन हस्तलिखित पोथीवरून हे चरित्र लिहिले आहे. वर्‍हाडची प्राचीन राजधानी एलिचपूर या शहराचा इतिहास कथारूपाने देण्याचा प्रयत्न ‘एलिचपूर- वर्‍हाडची जुनी राजधानी’ (१९३४) या पुस्तकात केला आहे.

- प्रा. मंगला गोखले

देशपांडे, यशवंत खुशाल