Skip to main content
x

देवधर, ज्योत्स्ना केशव

         ज्योत्स्ना केशव देवधर पूर्वाश्रमीच्या कुसुम थत्ते यांचा जन्म राजस्थानातील जोधपूर येथे झाला.  त्यांनी एम. ए. (हिंदी) पुणे विद्यापीठातून केले. विवाहपूर्व वास्तव्य महाराष्ट्राबाहेर झाल्याने प्रारंभी हिंदी भाषेतून कथा-लेखन केले. १९६० ते १९७० या दशकाच्या उत्तरार्धात मराठीत ज्या स्त्री लेखिका पुढे आल्या त्यांमध्ये ज्योत्स्ना देवधर हे नाव महत्त्वाचे आहे. ‘तरुण भारत’ (पुणे) ह्या दिवाळी अंकात ज्योत्स्नाबाईंची ‘घर गंगेच्या काठी’ ही पहिली मराठी कादंबरी आली. पुढे लगेचच (१९६७) ती पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आणि कादंबरीकार म्हणून त्यांची स्वतंत्र नाममुद्रा उमटली. पुढच्याच वर्षी १९६८मध्ये त्यांची ‘कल्याणी’ ही कादंबरी प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यांच्या अन्य लेखनाप्रमाणेच या दोन्ही कादंबर्‍यांचे विषय कौटुंबिक विशेषतः एकत्र कुटुंब पद्धती आणि तिच्यामधील स्त्री हेच होते. या कुटुंब पद्धतीचे गुण-दोष आणि मर्यादाही त्यांच्या लेखनातून स्पष्ट होतात. आपल्या कादंबर्‍या व कथा लेखनाच्या विषयांसंदर्भात लिहिताना त्या स्वतः म्हणतात, “कोवळ्या, अजाण, अपरिपक्व अशा वयात कौटुंबिक कारणांनी मी करपून गेले. काळजी, जागरण, आजारपण, कष्ट यांत आयुष्याची सोनेरी वर्षे खर्ची पडली. मला वाटते, माझ्या लेखणीला करुणेचा घास मिळाला व त्याची रुजवात या कठीण परीक्षेच्या, मनस्तापाच्या, दुःख-यातनांच्या, कष्टाच्या काळात झाली असावी. एकत्र कुटुंबातील ऊन-पाऊस अंगावर घेत असल्यामुळे माझ्या लेखनाला कौटुंबिक चौकट आपोआप मिळाली.”

‘कल्याणी’ ही एक दुःखी, दुर्दैवी विधवा. तिच्या जीवनाची झालेली फरफट याच शीर्षकाच्या कादंबरीतून ज्योत्स्नाबाईंनी रेखाटली आहे. ही कादंबरी जास्त गाजली. तिचे चित्रपट-नाटकात जसे रूपांतर झाले, तशी मालिकेच्या रूपानेही ती घराघरात पोचली. जुन्या काळातली उद्ध्वस्त होत चाललेली कुटुंब-व्यवस्था जोत्स्नाबाईंच्या मनाला टोचते, पण त्याचबरोबर कालानुरूप बदलायलाही हवे, असे वाटणे अशा कालद्वंद्वात त्यांची कादंबरी वा कथा घुसमटल्यासारखी वाटते.

चित्रमय शैली-

ज्योत्स्नाबाईंची भाषा साधी, सोपी, घराघरात वापरली जाणारी आहे. त्यामुळे शब्दांच्या जंजाळात फारशी अडकत नाही. डॉ. विनया डोंगरे त्यांचा गौरव ‘चित्रमय शैलीच्या कादंबरीकार’ असा करतात तर डॉ. कल्याणी हर्डीकर, त्यांच्या एकूणच लेखनाचा आढावा घेताना त्यांना ‘स्वयंप्रज्ञ लेखिका’ म्हणतात. त्यांची वर्णने साधी पण ती वाचकांच्या नजरेसमोर उभी राहणारी असतात. व्यक्तिचित्रणात्मक कादंबर्‍यांतही ज्योत्स्नाबाई वेगळेपण राखून आहेत. दोन भिन्न व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावरच्या दोन कादंबर्‍या त्या तितक्याच ताकदीने सादर करतात. महायोगी अरविंद आणि पंडिता रमाबाई काहीशी समकालीन व्यक्तिमत्त्वे. भाषा-प्रांत-पार्श्वभूमी वेगळी पण या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचा भावपूर्ण आणि तरीही साक्षेपी वेध त्यांनी अनुक्रमे ‘उत्तरयोगी’ (१९७३) आणि ‘रमाबाई’ (१९८९) या कादंबर्‍यांमधून घेतला आहे. त्यांच्या अनेक कादंबर्‍यांबरोबर वीस कथासंग्रह प्रसिद्ध झाले असून त्यात ‘गार्‍या-गार्‍या भिंगोर्‍या’ (१९६९) ते ‘याचि जन्मी’ (१९९९) या प्रदीर्घ काळखंडातील त्यांचा कथाविषयक लेखनप्रवास समोर येतो. त्यांच्या पुस्तकांचे अन्य भाषांत अनुवाद झाले असून त्यांनी स्वतः हिंदीतून विपुल लेखन केले आहे. अनेक पुरस्कार विजेत्या ठरलेल्या ज्योत्स्ना बाईंना केंद्र सरकारचा ‘अहिंदी भाषा-भाषी लेखक’ पुरस्कारही मिळाला आहे.

‘एरियल’ या अन्वर्थक नावाचे त्यांचे आत्मकथनात्मक पुस्तक आहे. ‘आकाशवाणी’मधील दोन तपांच्या वाटचालीचा तो प्रवास व्यक्तिगत त्यांच्याबरोबर मराठी समाजजीवन आणि साहित्य जीवनाचाही प्रवास आहे.

- मधू नेने

देवधर, ज्योत्स्ना केशव