Skip to main content
x

डहाके, वसंत आबाजी

   १९७०नंतरच्या समकालीन समाजवास्तवावर भाष्य करणारी कविता लिहिणारे प्रभावी कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून वसंत आबाजी डहाके यांनी मराठी साहित्यविश्वावर तेजस्वी मुद्रा उमटवली आहे. पूर्वसुरींंचा व्यासंग आणि आधुनिक मराठी वाङ्मयाचे प्रगल्भ आकलन आणि पृथगात्म चिंतनशील भाष्य हे त्यांच्या समीक्षात्मक लेखनाचे गुणवैशिष्ट्य आहे.

वसंत आबाजी डहाके यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील बेलोर्‍यास झाला. त्यांचे वडील त्या गावचे पाटील होते. बेलोर्‍यास त्यांचे घर आणि शेती होती. डहाके दहा वर्षांचे होईपर्यंत बेलोर्‍यास राहिले. त्यांचे प्राथमिक शिक्षण बेलोर्‍यास झाले. माध्यमिक शिक्षणासाठी ते चंद्रपूरला गेले. पाचवीपासून बी. ए.होईपर्यंत ते चंद्रपूरला राहिले. बी. ए.च्या पहिल्या वर्षाला असताना त्यांची ‘एक आगळा पक्षी’ ही कविता ‘सत्यकथा’ मासिकात प्रसिद्ध झाली. १९६५ पासून त्यांनी मराठीच्या अध्यापनास प्रारंभ केला. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे त्यांनी अध्यापन केले. १९६७मध्ये वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे त्यांनी मराठीचा व्याख्याता म्हणून काम पाहिले. त्यांनी १९७०मध्ये चंद्रपूर येथे मराठीचे अध्यापन केले. १९७१मध्ये अमरावतीच्या शासकीय महाविद्यालयात ते मराठीचे व्याख्याते होते. याच काळात त्यांनी ‘त्रिशंकू’ या लघु नियतकालिकाचे सहसंपादन केले. १९८२पासून मुंबईच्या एल्फिन्स्टन या नामांकित महाविद्यालयामध्ये त्यांनी मराठीचे अध्यापन केले. १९९४मध्ये ‘राज्य मराठी विकास संस्थे’त त्यांनी उपसंचालक म्हणून धुरा सांभाळली.

कवितेच्या क्षेत्रात नव्या पाऊलखुणा उमटविण्यात डहाके यांच्या कवितेने महत्त्वपूर्ण वाटा उचललेला आहे. त्यांच्या जाणिवेचा अवकाश अत्यंत व्यापक आहे. जागतिक महत्त्वाच्या घटनांचा, समकालीन विचारप्रवाहाचा आणि वाङ्मय प्रकारात घडलेल्या नव्या परिवर्तनांचा संस्कार त्यांनी मनात मुरवून घेतलेला आहे. सार्‍या मंथनप्रक्रियेतून डहाके यांची कविता नवी प्रतिमासृष्टी घेऊन जन्मास येत होती. समकालीन कवींच्या समानधर्मीपणाशी ती संवाद साधत होती. आयुष्यामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी झालेली स्थलांतरे त्यांच्या अनुभवविश्वात नवी भर टाकत होती. त्यांच्या चित्तातील अस्वस्थता भावात्मक आणि सर्जनात्मक अनुभूतींना नवी प्रेरणा देत होती.

‘सत्यकथा’ मासिकाच्या मे १९६६च्या अंकात त्यांची ‘योगभ्रष्ट’ ही प्रदीर्घ कविता प्रसिद्ध झाली. ‘योगभ्रष्ट’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९७२ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यातील सर्व कविता १९६६ ते १९७१ या काळातील आहेत. त्यांच्या कवितांतून आणि रेखाटलेल्या चित्रांतून त्यांच्या अंतर्मनातील तीव्र तडफड, अस्वस्थता आणि उद्रेक हे सारे अत्यंत पारदर्शी शब्दांत प्रकट झाले आहे. मनातील भावकोमल मृदू स्वर या कवितेत समांतरपणे मुखर झाले आहेत. प्रेमविषयक अनुभूती त्यांनी उत्कटतेने व्यक्त केली आहे. समकालीन समाज-वास्तवाचा सारा दाह आणि व्यक्तिमनातील प्रक्षोभ, उद्वेग त्यांच्या ‘योगभ्रष्ट’ या संग्रहातील कवितेतून व्यक्त होतो.

१९८७ मध्ये त्यांचा ‘शुभवर्तमान’ हा दुसरा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. १९७५ च्या आणीबाणीनंतर देशातील स्थितीत आमूलाग्र बदल जाणवायला लागला. बौद्धिक क्षेत्रात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. विचारांचे, भावभावनांचे आणि संवेदनांचे बराकीकरण करण्याची प्रक्रिया राज्यकर्त्यांकडून घडली. या सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात निर्माण झालेला थरकाप, किंकर्तव्यमूढता आणि अस्तित्वशून्यता यांचे विदारक चित्रण ‘शुभवर्तमान’ मधील ‘नखे’, ‘नटासाठी पार्श्वसूचना’ , ‘मोर्चा’, ‘क्रान्ती’, ‘मीठ महाग झालं की उंदीर मारण्याचं औषध’, ‘विचार झालाच पाहिजे’, ‘अमानुष सत्तेचे दिवस’, ‘वृत्तपत्र’ व ‘वाचकांचा पत्रव्यवहार’ या कवितांमधून डहाके यांनी केलेले आहे. सामाजिक संवेदनशीलतेचे उत्कट आणि प्रगल्भ रूप ‘शुभवर्तमान’मधील कवितांतून आढळून येते. ‘शुनःशेप’मध्ये या जीवन चिंतनाला वेगळी मिती प्राप्त झालेली आहे. देशातील राजकीय परिस्थितीवरील आणि प्रवृत्तीवरील भाष्य करणार्‍या कवितांचा समावेश या संग्रहात झालेला आहे. ‘अधोलोक’ ही त्यांची पहिली कादंबरी १९७५ मध्ये प्रसिद्ध झाली. ती एक गंभीर शोकात्मिका आहे. भीती, अपराध, लाचारी, क्षुधा, व्यक्तित्वहीनता आणि असंबद्धता, आणि या सगळ्यांवर आपले वर्चस्व गाजविणारी विराट सत्ता आणि तिच्या टाचेखाली चिरडून पराभूत झालेल्या एका माणसाची कथा या कादंबरीत गुंफली आहे. ‘प्रतिबद्ध’ आणि ‘मर्त्य’ या डहाके यांच्या लघु-कादंबर्‍या आहेत. या दोन्ही कादंबर्‍यांत प्रयोगशीलता आहे. लघु-कवितेसारखी मिताक्षरी रचना आहे. जीवनातील गतिमान प्रवाहाला कवेत घेण्याचे सामर्थ्य डहाके यांच्या भाषाशैलीत आहे. मुखपृष्ठावर, मलपृष्ठावर आणि अंतर्भागात काढलेली मोजकीच रेखाचित्रे आशयसूत्रांना पुष्टी देतात.

ते अव्वल दर्जाचे समीक्षक आहेत. काव्यधर्माला जवळचे म्हणून त्यांनी काव्यसमीक्षा आधिक्याने लिहिली. ‘कवितेविषयी’ या डहाके यांच्या समीक्षाग्रंथामुळे मराठी काव्यविश्वाशी गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षे निगडित असलेल्या एका महत्त्वाच्या सर्जनशील कवीच्या चिंतनाद्वारे कवितेची समज वाढायला मौलिक साहाय्य झाले.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी त्यांनी ‘कविता म्हणजे काय?’ (१९९१), ‘समकालीन साहित्य’ (१९९२), ‘नवसाहित्य आणि नवसाहित्योत्तर साहित्य’ (२००१) हे समीक्षाग्रंथ प्रसिद्ध केले आहेत. शिवाय ‘निवडक कविता’ (१९९१) हे पुस्तक संपादित केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या दूर शिक्षण संस्था अभ्यासक्रमास अनुसरून त्यांनी ‘उपयोजित समीक्षा’ (१९९२) हा ग्रंथ लिहिला आहे. साहित्य अकादमीने त्यांचे ‘निवडक सदानंद रेगे’ हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे.

त्यांनी सहकार्याने संपादित केलेल्या महत्त्वपूर्ण ग्रंथांत ‘शालेय मराठी शब्दकोश’ (१९९७), ‘संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश’, भाग १ (१९९८), ‘कविता विसाव्या शतकाची’ (२०००), ‘वाङ्मयीन संज्ञा-संकल्पनाकोश’ (२००१), ‘संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश’ भाग २ (२००४), यांचा समावेश आहे. ‘संक्षिप्त मराठी वाङ्मयकोशा’ला आणि ‘वाङ्मयीन संज्ञा-संकल्पना’ कोशाला त्यांनी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण आणि प्रदीर्घ स्वरूपाच्या विवेचक प्रस्तावना उल्लेखनीय आहेत. त्यांची मांडणी वाङ्मयाचा वृत्तिगांभीर्याने अभ्यास करणार्‍या आणि संस्कृतिशोध घेणार्‍या प्रज्ञावंताची आहे. इतिहासाचाही त्यांनी मर्मस्पर्शी वेध घेतलेला आहे. याच संकल्पनांचा विस्तार करून त्यांनी ‘मराठी साहित्य: इतिहास आणि संस्कृती’ हा बृहद्ग्रंथ लिहिला आहे. मराठी साहित्यसृष्टी प्रारंभकालापासून आत्तापर्यंतच्या प्रवाहांचे आणि अंतःप्रवाहांचे, वृत्ति-प्रवृत्तींचे विहंगमावलोकन या ग्रंथात आहे. निखळ वाङ्मयीन दृष्टीने आणि साक्षेपी वृत्तीने लिहिलेला हा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. डहाके हे समकालीन मराठी साहित्य विश्वाविषयीच्या गंभीर लेखनात, चिंतनात सतत मग्न असतात. ज्ञानकोशकार्यात त्यांनी मोलाची निर्मिती केलेली आहे. प्रज्ञा, प्रतिभा आणि परिश्रम या त्रयीचे सुमधुर नवनीत म्हणजे प्रस्तुत ग्रंथ होय. मराठी माणसाची जीवनशैली आणि त्याने केलेली साहित्य-निर्मिती यांमधील अनुबंध त्यांनी दाखवून दिलेला आहे. त्यांतून त्यांची संशोधक वृत्ती आणि मर्मदृष्टी प्रत्ययास येते.

डहाके यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व संपन्न आहे. ते उत्कृष्ट चित्रकार आहेत. निसर्गाविषयी त्यांना ओढ वाटते. आदिम संस्कृतीविषयी त्यांना अत्यंत ममत्व वाटते. ‘अधिवासशास्त्रीय साहित्य समीक्षा आणि मराठी कविता’ यांमधील अनुबंध तपासण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. नव्या-नव्या विचारप्रवाहांविषयी त्यांना नित्य कुतूहल वाटते. ‘यात्रा:अंतर्यात्रा’ ह्या डहाके यांच्या पुस्तकात आत्मपर आणि चिंतनपर लेख समाविष्ट केलेले आहेत. लौकिक जीवन प्रवासाचा आणि त्यांच्या कवित्वशक्तीच्या आतून विकास होण्याच्या प्रक्रियेचा त्यांनी मनोवेधक आलेख रेखाटला आहे. त्यांच्या समग्र व्यक्तिमत्त्वाची वीण कशी जुळत गेली, याचे हृदयंगम दर्शन या पुस्तकात घडते.

डहाके यांना आजवर अनेक वाङ्मयीन पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या ‘शुभवर्तमान’ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा केशवसुत पुरस्कार प्राप्त झाला (१९८७). त्यांच्या ‘शुनःशेप’ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या ‘योगभ्रष्ट’ या पहिल्या कवितासंग्रहाचा ‘The Terrorist of the Spirit’या नावाने अनुवाद प्रसिद्ध झाला. ‘आविष्कार’ या संस्थेने ‘स्वागत कोसळत्या शतकाचे’ या त्यांच्या कवितांचे नाट्यात्म दर्शन घडविले. अमोल पालेकरांनी दिग्दर्शित केलेल्या जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘कैरी’ या दीर्घकथेवर आधारलेल्या चित्रपटात डहाके यांनी अभिनय केला आहे.

२००९ साली डहाके यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला तसेच शांता शेळके पुरस्कार, पुणे मराठी  ग्रंथालयाचा पुरस्कार असे विविध सन्मान प्राप्त झाले आहेत. 

- डॉ. सोमनाथ कोमरपंत/ आर्या जोशी 

डहाके, वसंत आबाजी