Skip to main content
x

दिवाकर, मुकुंद पुरुषोत्तम

     मुकुंद पुरुषोत्तम दिवाकर यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर या गावी झाला. कोरडवाहू शेती चांगली करता यावी; या उद्देशानेच त्यांनी शेती शिक्षण घेण्याचे ठरवले. त्यांनी परभणी येथील पदवीपूर्व व पदव्युत्तर शिक्षण कृषी महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने पूर्ण केले. सुरुवातीपासूनच त्यांना वनस्पति-रोगशास्त्राविषयी आवड होती. या शास्त्राविषयी अधिक ज्ञान प्राप्त करण्याच्या उद्देशाने बंगलोर कृषी विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली. वैजापूर येथील दुष्काळी परिस्थितीमुळे व अपुऱ्या शेती उत्पादनामुळे त्यांच्यासमोर नोकरीशिवाय पर्याय न राहिल्यामुळे त्यांनी सुरुवातीला खासगी कीटकनाशक कंपनीत तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी पत्करून विक्री विभागात अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर बा.सा.को.कृ.वि.त निरनिराळ्या पदांवर वनस्पति-रोगशास्त्र विभागात काम केले. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन विद्यापीठाच्या संचालकांच्या मार्गदर्शनाखाली भाजीपाल्यावरील विविध रोगांच्या नियंत्रणाविषयी संशोधनाचे कार्य हाती घेतले. कलिंगडावरील करपा रोग नियंत्रण, केळीवरील पर्णगुच्छ रोग नियंत्रण यासाठी एकात्मिक उपाययोजनांची शिफारस केली गेली. याच प्रकारे भेंडी, हळद, कोकण वाल या पिकांवरील रोगांचे नियंत्रण करण्याच्या पद्धती विकसित केल्या.

     दिवाकर यांची १९८७मध्ये बा.सा.को.कृ.वि.मार्फत वनपिकांवरील रोगासंबंधीचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील मिशीगन विद्यापीठात प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली. एक वर्ष या विषयाचे अध्ययन करून व प्रशिक्षण घेऊन १९८६मध्ये स्थापन झालेल्या वन महाविद्यालयात त्यांची साहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. एकूण १३ वर्षांच्या अध्यापनाच्या काळात वनपिकांवरील रोगासाठी पायाभूत संशोधनाचे कार्य हाती घेतले आणि त्याचबरोबर प्रथमच वनपिकांवरील रोग आणि त्यांचे नियंत्रण या विषयाचा अभ्यासक्रम निश्‍चित करून त्याचा पदवीपूर्व अभ्यासक्रमात नव्याने समावेश करण्यात आला. त्यांनी पीएच.डी. पदवीसाठी ३ विद्यार्थ्यांना व एम.एस्सी.साठी २७ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रभावी अध्यापनाचे तंत्र हा परदेशी अभ्यासक्रम बँकॉक-थायलंड येथे ३ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केला. आतापर्यंत वनस्पति-रोगशास्त्रासंबंधीचे एकूण ४७ संशोधनपर लेख भारतीय आणि परदेशी नियतकालिके व मासिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी एकूण ४ वर्षे अळंबी संवर्धन व रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथे वीजनिर्मिती प्रकल्पाचा आंबा व काजू पिकांवर होणारा परिणाम या दोन योजनांसाठी सहअन्वेषक म्हणून काम केले असून त्यासंबंधीचे अहवाल विद्यापीठात सादर केले. तसेच अळंबी संवर्धन योजनेंतर्गत धिंगरी अळंबी बियाण्यांचे उत्पादन करून शेतकऱ्यांना माफक दरात पुरवठा करण्यात आला. तसेच विविध मराठी पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिकांतून एकूण ७ कृषीविषयक लेख प्रकाशित करण्यात आले. त्यांनी आकाशवाणीवर विविध १५ रोगांसंबंधी भाषणे केली आहेत. तसेच केळी व कलिंगडावरील रोग आणि रोग नियंत्रणासंबंधीचे कार्यक्रम दूरचित्रवाणीवर दाखवण्यात आले. प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणाच्या कार्यक्रमांत विद्यापीठ व महाविद्यालय पातळीवर सहभाग घेऊन, तसेच रोगशास्त्र विभागात अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन, त्याचा विकास घडवण्यासाठी मदत केली. तसेच पादसंघरोधकाचे काम कोकण विभागासाठी करून त्यांनी परदेशातून येणारे बी, फुलाची कंदे यांच्या तपासण्या केल्या व त्यासाठी अद्ययावत पादसंघरोधक प्रयोगशाळा उभारणीसाठी मदत केली. त्यांची भाजीपाल्यावरील विषाणुजन्य रोगासंबंधी १ इंग्रजी पुस्तिकासुद्धा प्रकाशित झालेली आहे. त्यांनी १९८३ ते २०११ या काळात या विभागात पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी केलेले संशोधनसुद्धा संक्षिप्तपणे पुस्तिकेच्या रूपात प्रकाशित झाले आहे.    

- संपादित

दिवाकर, मुकुंद पुरुषोत्तम