Skip to main content
x

दिवेकर, हरी रामचंद्र

     री रामचंद्र दिवेकर उर्फ डॉ. दादासाहेब दिवेकर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संस्थापक सदस्य होते. १९१५-१६ सालच्या आनंदाश्रमात संस्था स्थापनेसंबंधी ज्या बैठका झाल्या, त्यात त्यांचा प्रामुख्याने भाग होता. त्यांच्या विद्वत्तेचा, चाहत्या शिष्यांचा पसारा ग्वाल्हेरमध्ये जरी होता, तरी त्यांचे कार्य-कर्तृत्व पुण्यात अधिक उजळले गेले. १८ मार्च १९७६ रोजी दादांची पहिली पुण्यतिथी. त्या दिवशी पुण्यात मित्रमंडळ कार्यालयात डॉ. दांडेकर-आचार्य लिमये संपादित ‘डॉ. ह.रा. दिवेकर: चरित्र आणि लेखन’ ग्रंथाचे प्रकाशन वयोवृद्ध संशोधक डॉ. प.ल. वैद्य यांच्या हस्ते झाले.

     दिवेकर घराणे मूळचे कोकणातले. हरी रामचंद्र दिवेकर यांचे आजोबा पांडुरंग रावजी दिवेकर कोल्हापुरात एक मराठी शाळा चालवत होते. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे त्यांचे आवडते विद्यार्थी. १८५४मध्ये ते ग्वाल्हेरच्या युवराजांना शिकविण्यासाठी मध्य प्रदेशात गेले. पांडुरंग यांना दोन पुत्र. मोठा काशिनाथ व धाकटा रामचंद्र. रामचंद्र यांना व्यायामाचा आणि शिक्षकी पेशाचा खूप नाद. लहानपणापासून हरी यांना विहिरीत पोहण्याची आणि दंड-बैठका मारण्याची सक्ती होती. त्यांच्या एकसष्टीच्या वेळी त्यांनी मल्लखांबांची प्रात्यक्षिके करून त्यांची पैलवानी वृत्ती दाखविली.

     रामरावजी हरी यांना पहाटे उठवून आकाशातले तारे, पूर्वेवरचा सूर्य, धो-धो पडणारा पाऊस असे पाहायला पाठवीत. कडाक्याची थंडी, डोळ्यांवरची झोप सर्व विसरून धाकाने हरी यांना ते ऐकावे लागे. त्यांची आई राधाबाई बडोदे संस्थानातील केशवराव कोल्हटकरांची कन्या. केशवराव सयाजीरावांच्या खासगी सेवेत होते. लग्नानंतर त्या ग्वाल्हेरला आल्या. पतीच्या गैरहजेरीत शेजारणींना जमवून राधाबाई पोथीवाचन करीत. पत्नीचे व्रत पाहून रामरावांना समाधान वाटले. हरी यांच्यावर आईचे प्राचीन संस्कार झाले. त्यांचा माध्यमिक पर्यंतचा अभ्यास घरीच झाला. त्यांची पाठांतर शक्ती चांगली होती. संस्कृतची गोडी बालपणापासूनच, त्यामुळे गुरुजींकडून शिकल्यावर उपनयनानंतर (९व्या वर्षी) देवपूजा, रुद्रपाठ, पुरुषसूक्त  ते स्पष्टपणे म्हणत. पुण्यात आल्यावर ते गीताईची शिबिरे घेऊ लागले. अनेक स्त्री-पुरुषांना त्याचा लाभ झाला.

     हरी यांचे आई-वडिलांवर खूप प्रेम होते. पुढे आई खूप आजारी झाल्या. मृत्युशय्येवरच्या मातेच्या इच्छेनुसार सोळाव्या वर्षी इ.स. १९००मध्ये त्यांनी लग्न केले. ग्वाल्हेरचे आगाशे यांची कन्या ‘कुशी’ हरिभाऊंची ‘लक्ष्मी’ झाली. हरी यांना दोन बहिणी आणि एक लहान भाऊ होता. घरकाम हरी यांंनाच करावे लागे. या काळात दारिद्य्राच्या झळा खूप सहन कराव्या लागल्या. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणात इंटरला अनुत्तीर्ण व्हावे लागले.

    १९०५ साली बनारसला भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला ते हजर राहिले. नामदार गोखले, लोकमान्य टिळक, पं. मालवीय यांचे दर्शन आणि विचार त्यांच्या मनावर देशभक्तीचा संस्कार करून गेले. एकीकडे बी.ए. करीत असताना ते संस्कृत पंडिताकडे वेदाध्ययन करत. बी.ए.नंतर ते व्ही.सी. हायस्कूल ग्वाल्हेरमध्ये रु. ५० पगारावर शिक्षक झाले. नंतर मातेच्या मागोमाग सहा वर्षांनी वडील गेले. दादा पोरके झाले.

    वडिलांचे ऋण त्यांनी स्वत:च्या कमाईतून फेडले. ग्वाल्हेरला का.वा. लेले यांचे प्रवचन ऐकून त्यांना वैदिक व्हावे वाटले, तर चौडेबुवांचे भजन ऐकून भजन शिकावेसे वाटले. ‘काळ’ आणि ‘केसरी’ वाचून त्यांच्यामध्ये क्रांतिकारक विचार जागे झाले. ‘अभिनव भारत’सारखी संस्था स्थापन करावी असे वाटले. तरुण जमवून त्यांनी बाँब तयार करण्याचे शिक्षण घेतले. त्यातच त्यांना अटक होऊन दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाली. या शिक्षेमध्ये दररोज १५ शेर गहू जात्यावर दळावे लागत. कारावासातही मित्रांची सेवा, त्यांच्या कामात मदत चालूच होती. त्यांच्या वागण्याने तुरुंगाधिकार्यांनी त्यांना कापड विणणे, रंगवणे अशी कामे दिली. त्याच्या जोडीला ते संतांचे अभंग गात. दोन वर्षांनी १९११मध्ये ‘लोकशिक्षक दादा’ तुरुंगाबाहेर आले. या अनुभवावरून मध्य प्रदेशातील दरोडेखोरांचे मतपरिवर्तन करण्यासाठी त्यांनी पुन्हा स्वेच्छेने तुरुंगवास पत्करला.

    ते नैनितालला राहून बनारसला परतले. १९७४ साली ते कुरुक्षेत्राच्या प्राच्यविद्या अधिवेशनाला हजर राहिले. काशी नगरी प्रचारिणी सभेच्या नियतकालिकांत ते लेखन करू लागले. शिक्षण घेत असताना डॉ. वेनिस यांचा त्यांच्यावर लोभ जडला. त्यामुळे १९१४ ते १९१६ या काळात ते गंगानाथ झा यांच्या हाताखाली साहाय्यक म्हणून काम करीत होते. कर्वे अनाथाश्रमाच्या पार्वतीबाई आठवले यांचा परिचय झाल्यावर त्यांनी पुण्याला येण्याचे ठरवले. आपल्या बहिणीला - कृष्णाबाई (विधवा) यांना आश्रमात दाखल केले. आता त्यांना पुण्यात येऊन महर्षी कर्वे यांच्याबरोबर काम करावेसे वाटले.

     १९१६ साली हिंगण्यास येऊन कर्वे यांना ‘महिला विद्यापीठ’ स्थापन करण्यास हरी यांनी मदत केली. स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी पत्नीला व मुलाला पुण्यात वास्तव्यासाठी आणले. गोदुताई केतकर आणि त्यांच्या पाच भगिनी त्यांच्या कन्या झाल्या. त्यात डॉ. चंपावती वासुदेव केतकर यांनी १९७६ साली दादांच्या स्मृतिग्रंथात त्यांचे समग्र जीवनदर्शन घडवले. अण्णासाहेब कर्वे यांंना हरी यांंचा सल्ला खूप मोलाचा वाटू लागला. १९१६ साली आनंदाश्रमात भांडारकर संस्था स्थापन करण्याचा ठराव झाला. त्यात ह.रा. दिवेकरांचा मोठा वाटा होता. भांडारकरांनी तर त्यांना घरी येऊन पुस्तके वापरण्याची परवानगी दिली होती. यातूनच त्यांचे संस्कृत काव्य-नाटकावर प्रेम वाढले. संशोधनात्मक लेखन सुरू झाले. फ्रान्सचे पंडित डॉ. सिल्वँ लेवीनी त्यांना फ्रान्सला बोलावले. संस्कृत अलंकारशास्त्रावर अभ्यास करण्यासाठी ते पॅरिसला गेले. तत्पूर्वी फ्रेंच भाषा शिकले. १९२७ साली कर्वे संस्थेत मतभेद सुरू झाले. हरी दिवेकर यांना ही दुही असह्य झाली. त्यामुळे हिंगण्याची सेवा सोडून ते पॅरिसला कर्ज काढून गेले. ते हिंगणे संस्थेत १९१६-१९३१ अशी १५ वर्षे होते. डी.लिट्. साहित्याचार्य हरी यांना ग्वाल्हेर संस्थानचे तत्कालीन शिक्षणमंत्री रावसाहेब मुळे यांना ग्वाल्हेरला बोलावून घेतले. त्यांनी स्त्रियांसाठी स्वतंत्र शाळा स्थापन केली.

     वयाच्या साठाव्या वर्षी ते निवृत्त झाले. समाजकार्य म्हणून १९३१मध्ये त्यांनी शरद व्याख्यानमाला सुरू केली. अच्युतानंद व्यायाम शाळेला ऊर्जितावस्था आणली. वाईकर मठात वाद माजले होते. ते मिटवून त्यांनी ती संस्था पुढे आणली. मध्यमवर्गीय लहान मुलांसाठी लोकमान्य बालशाळा सुरू केली. आज ती गाजते आहे. १९४५ ते ६६ या काळात त्यांनी पंधरा विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले.

     हरी यांना आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत रस वाटला. त्यांनी चंबळ खोऱ्यातील दस्यू बांधवांचा अभ्यास केला. विनोबांच्या सांगण्यावरून त्यांच्या सुधारणेसाठी ते कारागृहात वास्तव्याला गेले.

    ‘आमचा महाभारतपूर्व इतिहास’, ‘हिंदी वाङ्मयाचा इतिहास’, ‘ऋग्वेद सूक्त विकास’, ‘केशवपन पद्धतीवरील भाष्य’, ‘कौशिक सूत्र’ (दारीळा भाष्य) अशी एकूण वीस पुस्तके त्यांनी लिहिली. एकूण तेवीस संशोधनात्मक इंग्लिश लेख, तर ११५ संस्कृत-मराठी लेख त्यांनी वयाच्या उतरत्या काळात लिहिले. १९७५मध्ये ते बडोद्याला गेले. उतारवयात पुत्रशोकाचा धक्का त्यांना सहन करावा लागला. अखेर वयाच्या ९१व्या वर्षी पुण्यात १८ मार्च १९७५ रोजी हा ज्ञानदीप मालवला.

वा.. मंजूळ

दिवेकर, हरी रामचंद्र