Skip to main content
x

दंडवते, विजय गजानन

      विजय गजानन दंडवते यांचा जन्म अकोला (विदर्भ) येथे  झाला. त्यांचे बी.एस्सी. (कृषी) पदवीचे शिक्षण अकोल्यातच झाले. त्यांनी एम. एस्सी. (कृषी) ही पदवी म.फु.कृ.वि., राहुरी येथून बी.एस्सी.नंतर २० वर्षांनी शासनामार्फत प्रतिनियुक्तीवर असताना प्राप्त केली. ते १९६४मध्ये कृषी पदवीधर झाल्याबरोबर कृषी खात्यात पर्यवेक्षक (मृदा संधारण) या पदावर राज्यशासनाच्या सेवेत रुजू झाले. ते १९६८मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

      दंडवते यांची १९६९मध्ये उपविभागीय मृदा संधारण अधिकारी या पदावर वर्ग-२ श्रेणीत नियुक्ती झाली. विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र या विविध विभागांत त्यांनी एकंदर ३५ वर्षे सेवा बजावली. त्यांनी १९९८मध्ये वयाच्या ५५व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

      राज्यशासनाच्या सेवेत असताना त्यांना जपानला १९७२मध्ये ६ महिन्यांकरता ‘अप लँण्ड इरिगेशन’ या विषयासाठी प्रतिनियुक्त केले. त्याचप्रमाणे १९८०मध्ये ‘सेंट्रल सॉइल अ‍ॅण्ड वॉटर शेड मॅनेजमेंट ट्रेनिंग’ या विषयाकरता ६ महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी त्यांना पाठवण्यात आले. दंडवते यांनी १९९८मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर पुण्यातील हिंद स्वराज्य ट्रस्टद्वारा संचालित राष्ट्रीय पाणलोट क्षेत्र विकास प्रशिक्षण संस्था-राळेगण सिद्धी येथे प्राचार्य म्हणून २ वर्षे काम केले. या काळात त्यांनी २९ सेवाभावी संस्थांच्या तंत्रज्ञ, कर्मचारी, कार्यकर्ते, पदाधिकारी, सरपंच आदींना पाणलोट क्षेत्र-विकासाचे प्रशिक्षण दिले, तसेच याच कार्यक्रमावर आधारित राज्य शासनाची ‘आदर्श गाव’ योजना राबवणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या कर्मचाऱ्यांनाही मोठ्या संख्येने प्रशिक्षित केले. अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीला लोकसहभागातून केलेल्या पाणलोट विकास कार्यक्रमात दिलेल्या पंचसूत्रीचा (कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, नसबंदी, नशाबंदी आणि  श्रमदान), तसेच पाणलोट क्षेत्र विकासाचा प्रचार व प्रसार दंडवते यांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून केला. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील जम्मू-काश्मीर ते तमिळनाडू या विविध प्रांतांतील प्रशिक्षणार्थी आले होते.

      ‘माथा ते पायथा’ मृदा व जल संधारणाचे उपचार करणे हे पाणलोट विकासाचे तंत्र तसेच ‘धावत्या पाण्याला चालायला शिकवा, चालत्या पाण्याला थांबायला शिकवा व थांबलेल्या पाण्याचा योग्य उपयोग करा’, हा अण्णा हजारे यांचा पाणलोट विकासाच्या तांत्रिक उपचाराचा मंत्र राज्यात प्रशिक्षणाद्वारे दंडवते यांनी प्रसारित केला. ‘कपार्ट’ने हिंदस्वराज्य ट्रस्टला सपोर्टिव्ह व्हॅलेंटरी ऑर्गनायझेशन म्हणून मान्यता दिल्यावर दंडवते यांनी पाणलोट क्षेत्र-विकास प्रकल्प कसे करावेत, याचे सेवाभावी संस्थांना मार्गदर्शन केले व त्यांनी केलेले प्रकल्प अहवाल तपासून त्यांची क्षेत्रीय पडताळणीही केली. त्यामुळे संस्थांना कपार्टचे अनुदान प्राप्त होऊन त्यांनी पाणलोट विकासाची कामे केली.

      दंडवते यांना ‘कपार्ट’ने २००१ ते २००४ या काळात ‘मॉनिटर’ म्हणून ‘एमपॅनल’ केले. त्या वेळी त्यांनी महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील पाणलोट क्षेत्र-विकास कार्यक्रमांचे मूल्यमापन केले व संस्थांच्या कामाबद्दल कपार्टला अहवाल सादर करून योग्य त्या सुधारणा सूचवल्या. त्यांनी अण्णा हजारे यांच्याबरोबर बिहार राज्यातही पाणलोट क्षेत्र-विकास प्रकल्पाचे अनुदानपूर्व मूल्यमापन केले.

      दंडवते यांनी राज्य शासनाच्या जल संधारण विभागाने पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अधिनस्त सेवाभावी संस्थांनी अवर्षणप्रवण क्षेत्रात केलेल्या पाणलोट क्षेत्र-विकासाच्या कामांचे मूल्यमापन करून शासनास त्याबद्दल दुरुस्त्याच्या सूचनांसह अहवाल सादर केला. तसेच, महाराष्ट्र अ‍ॅग्रिकल्चर फायनान्स कॉर्पोरेशन (मुंबई) यांच्यावतीने महाराष्ट्र व गुजरातमध्ये अनुक्रमे नदी खोरे प्रकल्प व अवर्षणप्रवण क्षेत्रातील पाणलोट विकासाच्या कामाचे मूल्यमापनही केले व योग्य त्या सूचना अहवालात सादर केल्या.

      बँक ऑफ महाराष्ट्राच्या ‘मार्डेफ’ या ट्रस्टमार्फत ग्रामीण विकास केंद्र भिगवणअंतर्गत चोपण किंवा क्षार, जमीन सुधारणा करण्यासाठी निचरा पद्धतीची १० प्रात्यक्षिके ‘कपार्ट’च्या अनुदानातून १० एकरांवर आयोजित करण्याचे काम दंडवते यांनी केले. त्यामध्ये उसाचे एकरी ५४ टनांपर्यंत घटलेले उत्पादन ८० टनांपर्यंत वाढवण्याचे तंत्र शेतकर्‍यांनी  प्रात्यक्षिकाद्वारे पाहिले व त्याचा अवलंब स्वखर्चाने केला. शासनाच्या सेवेत कृषी आयुक्तालयात प्रमुख कृषी अधिकारी (सिंचन) या पदावर काम करताना राज्यातील सहा मोठ्या प्रकल्पांचे अधिनस्थ जागतिक बँकेचा प्रकल्प राबवताना त्यांनी नवीन पीक पद्धतीचा प्रसार केला. उदा. पैठणमध्ये दोन वर्षांत सहा पिकांचे नियोजनही नव्याने स्थापित झाले.

- डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी

दंडवते, विजय गजानन