दोड, विजय नीलकंठ
विजय नीलकंठ दोड यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील सोनेगाव येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. १९७८मध्ये दोड यांनी बी.एस्सी. (कृषी), १९८०मध्ये एम.एस्सी. (उद्यानविद्या), १९९१मध्ये पीएच.डी. पदवी डॉ.पं.कृ.वि.तून(अकोला) मिळवली. नोकरीत ते कनिष्ठ संशोधन साहाय्यकानंतर (१९८२ ते १९९२) १९९३मध्ये संशोधन साहाय्यक झाले. १९९८ मध्ये त्यांची साहाय्यक प्राध्यापक पदावर निवड झाली. ते २००१ मध्ये सहयोगी प्राध्यापक झाले व पुढे २००८ मध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची निवड झाली. लगेच काही काळानंतर त्यांची विभागप्रमुख म्हणून निवड झाली. अत्यंत हुशार व कष्टाळू प्रवृत्तीमुळे त्यांनी अल्पकाळात स्वतःची प्रगती केलीच; शिवाय विद्यापीठातील उद्यानविद्या विभागाचीही नेत्रदीपक प्रगती केली. डॉ.दोड यांनी भाजीपाल्यावर संशोधन केले असून, त्याशिवाय करटोली या फारशा माहीत नसलेल्या वेलभाजीवर संशोधन प्रकल्प राबवून शिफारसी केल्या. त्यांना गौरव सोसायटी, हिस्सारमार्फत भाजीपाला संशोधनाबाबत १९९७मध्ये आणि भाजीपाला पैदास (ब्रीडिंग) कार्याबद्दल २००४ मध्ये पुरस्कार मिळाला. नॅशनल एन्व्हायर्नमेंटल सायन्स अॅकॅडमी, नवी दिल्लीतर्फे त्यांना २००४ चा उत्कृष्ट संशोधक हा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी २० ते २४ डिसेंबर २००९ या काळात चीन देशात चांगसा विद्यापीठात चौथ्या आंतरराष्ट्रीय काकडीवर्गीय परिसंवादात भाग घेऊन उत्तम पोस्टर प्रेझेंटेशन पुरस्कार प्राप्त केला. त्यांनी ९ एम.एस्सी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी ७८ संशोधन निबंध, २०५ (मराठी) लेख १२ पुस्तके प्रकाशित केली. तसेच दूरदर्शन व आकाशवाणी यावर ३५ कार्यक्रम केले आहेत. त्यांनी उद्यानविद्या विभागाचा चेहरा बदलून टाकला. आंंबा व चिकूची मृदुकाष्ट कलम पद्धत विकसित करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.