द्रविड, राजेश्वरशास्त्री लक्ष्मणशास्त्री
राजेश्वरशास्त्री द्रविड भारतवर्षीय कीर्तीचे सुप्रसिद्ध काशीवासीय पंडित होते. आपले वडील लक्ष्मणशास्त्री द्रविड यांचे कार्य त्यांनी पुढे चालवले. न्याय-वेदान्तादी शास्त्रांचे अध्ययन करून त्यांनी काशीतील विख्यात पंडित अशी कीर्ती मिळवली. तेथील साङ्गवेद विद्यालयाचे ते प्रमुख होते. वाद-विवादांत ते अत्यंत निष्णात होते. सनातनी विचारसरणी कशी खंबीर व तर्कशुद्ध पायावर उभारली आहे, हे प्रतिपादण्यात यांचा हातखंडा होता. हिंदुस्थानच्या सर्व प्रांतांमध्ये भरलेल्या विद्धत्परिषदांत त्यांना सखोल ज्ञानाने, तर्कशुद्ध प्रतिपादनाने आणि शुद्ध आचरणाने अग्रमान मिळाला होेता. सध्याच्या लोकशाहीच्या व समतेच्या काळात सनातनी विचारसरणी टिकत नाही असे वाटत असले, तरी ती भरभक्कम पायावर उभारलेली आहे याबद्दल त्यांच्यासारख्यांच्या प्रतिपादनाने खात्री पटल्याशिवाय राहत नाही. कारण कोणतीही समाजरचना किंवा धर्मशास्त्र विचाराच्या भरभक्कमपणापेक्षा राजसत्तेच्या पाठिंब्यावर अवलंबून असते. त्यांनी त्या दृष्टीने ग्रंथलेखनही केले आहे.
वाराणसीच्या संस्कृत विद्यालयात राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रावर आधारित “वैदिक सिद्धांतरक्षिणी” हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ महत्वाचा मानला जातो. “शांति का अग्रदूत” आणि “वेदोंका अपौरुषेयत्व” ही त्यांनी लिहिलेली पुस्तके आहेत.
— संपादित / आर्या जोशी