ढाले, राजाराम पिराजी
राजाराम ढाले यांचे प्राथमिक शिक्षण वरळीच्या (मुंबई) शाळेत, बी.ए.पदवीपर्यंतचे शिक्षण सिद्धार्थ महाविद्यालयात (१९६८) व एम.ए.या स्नातकोत्तर पदवीचे शिक्षण मुंबई विद्यापीठात झाले (१९७२). विद्यार्थिदशेतच ढाले यांचा संबंध महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषदेशी आला. ‘साधना’ साप्ताहिकातील त्यांच्या लेखाने दलित समाजातील दुःख आणि दैन्य यांना वाट करून दिली. १९७३ साली ते दलित पँथरचे अध्यक्ष झाले. १९७७ साली त्यांनी ‘मास मूव्हमेंट’ या संघटनेची स्थापना केली. २००४ सालची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली होती. महाविद्यालयीन शिक्षणापूर्वीपासूनच ते लघुनियतकालिक चळवळीशी संबद्ध असून आता ‘येरू’, ‘तापसी’ ही लघुनियतकालिके व ‘चक्रवर्ती’ (दैनिक) चालू करणार्यांपैकी ते एक होते. १९७१ सालच्या जानेवारीत प्रकाशित झालेल्या ‘विद्रोह’ या अनियतकालिकात त्यांनी लेखन केले होते. प्रस्थापित साहित्य व साहित्य व्यवहार ह्यांना त्यांनी कसून विरोध केला. चाकोरीबाहेरची वाटचाल करण्याची वाङ्मयीन जाण हा ढाले यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष होय. मोजके, नेटके परंतु धारदार शैलीचे त्यांचे लेखन अनियतकालिकांना वेगळी दिशा दाखवणारे दिशादर्शक ठरले. नंतर दलित पँथर चळवळीत ओढले गेल्याने त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य चमकले. ‘अस्तित्वाच्या रेषा’ हा त्यांचा स्फुट लेखांचा संग्रह (१९९०) प्रकाशित झाला. ‘स्थितीच्या कविता’ हा त्यांचा लहानसा संग्रह आहे.
ढाले यांनी १९७६ साली प्रसिद्ध झालेल्या ‘नाकेबंदी’ या ज.वि.पवारांच्या पहिल्याच काव्यसंग्रहाला ‘लाल कंदील’ शीर्षकाखाली लिहिलेली प्रस्तावना अत्यंत सडेतोड, दलित साहित्याच्या उगमाचा व वाटचालीचा साक्षेपी मागोवा घेणारी, भविष्याचे संकेत देणारी असून मननीय आहे यात शंका नाही. ‘दलित साहित्य’ऐवजी ‘बौद्ध साहित्य’ असे नाव सुचवून त्यांनी असे प्रतिपादन केले की, बौद्ध हा नवा संस्कार आहे, नवा जीवनमार्ग आहे, ते नवे जीवनमूल्य आहे. दलितांना शोषित, पीडित न म्हणता ‘बौद्ध’ म्हणून स्वीकारावे. त्यातच आंबेडकरी विचारांचा वारसा आहे. हा वारसा जोपासला तरच खरे दलित साहित्य निर्माण होईल, असा ढाले यांचा विश्वास आहे. ते दलित साहित्याकडे सामाजिक व सांस्कृतिक दृष्टीकोनातून पाहतात. आधी लेखन आणि मग सिद्धान्त येतो. वस्तुस्थितीवरून तिचा सिद्धान्त बांधला जातो, सिद्धान्तावरून वस्तुस्थिती नव्हे असे मत प्रदर्शित करून ढाले म्हणतात, “दलित शब्दाची व्याख्या केवळ बौद्ध अथवा मागासवर्गीय नव्हे तर जे-जे पिळले गेलेले असे श्रमजीवी आहेत, ते सर्व दलित या व्याख्येत समाविष्ट होतात.” दलित साहित्य हा प्रश्न ऐरणीवर असणार्या त्या संवेदनशील काळात ढाले सर्वांना समजावून सांगतात, “आपल्याला सांस्कृतिक बदल घडविण्यासाठी आपल्या मनावर नवे संस्कार घडवावे लागतील. त्यासाठी साहित्य हे एकच जिवंत माध्यम आपणाजवळ आहे. सांस्कृतिक बदलापेक्षा संस्कारातला बदल अधिक मूलगामी असतो. नवा जीवनमार्ग स्वीकारणे हेच कार्य आपल्या लढ्याचे आणि पर्यायाने आपल्या साहित्याचेही आहे....नव्या संस्कृतीत स्वत:ला आणि समाजाला झोकून देण्यासाठी आपले साहित्य सतत प्रवाहित राहिले पाहिजे.” ‘नाकेबंदी’विषयी ढाले यांचा अभिप्राय बोलका आहे, “कित्येकांना नेमके काय नाकारायचे हेच कळलेले नाही, ते नेमके या कवीला (ज.वि.पवार) कळले आहे. किंबहुना तीच या कवितेची बलस्थाने आहेत.”
महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषदेने आपल्या मुंबई येथे भरलेल्या १४ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ढाले यांना दिले होते. अध्यक्षीय भाषणात दलित साहित्याचा प्रवाह बौद्ध साहित्याकडेच राहिला पाहिजे, हे त्यांनी स्पष्ट केले. ‘आमचा लढा समतेसाठी आहे. समता जिथे-जिथे असेल, तिथे-तिथे आम्ही असू. आम्हांला बौद्ध म्हणवून घ्यायची हाव नाही. समता मिळवण्याची आणि ती टिकवण्याची हाव आहे... समता मिळवणे म्हणजेच बौद्ध होणे. समतेशिवाय बौद्धधर्म आणखी काय वेगळा आहे?... आमच्या चळवळीचे मूळ समतेत आहे. अस्पृश्यतेत नाही, आणि म्हणूनच समतात्मक समाजरचना निर्माण करण्याचे काम आमचे आहे. तसेच आमच्या साहित्याचे आहे. म्हणूनच ते काम अंगीकारणारे आमचे साहित्य महान, अक्षय आणि उदात्त आहे...बौद्ध साहित्याचे अविकसित रूप दलित साहित्य आहे.”
- संपादक मंडळ