Skip to main content
x

धायगुडे, रामचंद्र गोविंद

      डॉ. रामचंद्र गोविंद धायगुडे यांचा जन्म शिरवळजवळच्या ‘मोर्वे’ गावी, जिल्हा सातारा येथे झाला. प्राथमिक शालेय शिक्षण पुणे येथे झाल्यावर फर्गसन महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण घेतले व १९२१ साली मुंबईच्या ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एम.बी.बी.एस.साठी प्रवेश घेतला. एम.बी.बी.एस. झाल्यावर त्यांनी मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात ‘आर.एम.ओ.’ म्हणून काम केले.

     १९२७ साली ते के.ई.एम. रुग्णालयामधून एम.डी. विकृतीशास्र (पॅथॉलॉजी) च्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यासाठी त्यांना ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ सुवर्णपदक आणि ‘हंसराज प्रागजी ठाकरसी’ शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रसिद्ध विकृतिशास्त्रतज्ञ डॉ.व्ही.आर. खानोलकर यांचे ते पहिले पट्टशिष्य होत.

     त्यानंतर जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयामध्येच विकृतिशास्त्र आणि जंतुशास्त्र विषयाच्या सहाय्यक प्राध्यापक या पदावर त्यांची नेमणूक झाली. जंतुशास्त्र व परजिवीशास्त्र या विषयांत त्यांनी विशेष संशोधन केले. आपल्या ज्ञानाने व शिकवण्याच्या शैलीने त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले.

     त्या काळी ठरावीक वेळेत त्यांना खाजगी प्रॅक्टिस करण्याची मुभा असे; पण त्यांनी आपल्या कामात कधीच कुचराई केली नाही. १९४२ साली डॉ.खानोलकर निवृत्त झाल्यावर ते जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयात विकृतिशास्त्राचे प्राध्यापक झाले. उत्तम प्राध्यापक म्हणून ते विद्यार्थ्यांत अतिशय लोकप्रिय होते. मुंबईत ऑपेरा हाऊस येथे खाजगी प्रॅक्टिस करणारे एक प्रख्यात व नामवंत विकृतिशास्त्र (पॅथॉलॉजिस्ट) म्हणून त्यांची ख्याती होती.

     त्यांनी अनेक मान्यवरांच्या वैद्यकीय चाचण्या केल्या होत्या. मुंबई/पुणे येथे असताना राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वैद्यकीय चाचण्या ते करीत असत. १९४५ साली अधिष्ठाता म्हणून के.ई.एम. रुग्णालयात त्यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी खाजगी प्रॅक्टिस सोडली व जी.एस. वैद्यकीय महाविद्यालय व के.ई.एम. रुग्णालयाच्या कार्यास अक्षरश: वाहून घेतले. अधिष्ठाता म्हणून सर्व विद्यार्थ्यांत त्यांच्याबद्दल आदर असे, तर उत्तम प्रशासक म्हणून त्यांचा दरारापण होता. नेमून दिलेले काम सर्वांनी काटेकोरपणे करावे याकडे त्यांचा कटाक्ष होता व त्यात त्यांना कोणीच रोखले नाही. प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ.ए.व्ही. बालिगा व डॉ.आर.एन. कूपर यांनासुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळच्यावेळी घेण्याबद्दल समज देण्यास मागेपुढे पाहिले नाही. महापालिकेतील नगरसेवक जर नीट वागले नाहीत, तर त्यांना आपल्या कार्यालयामध्ये ते येऊ देत नसत.

     सामाजिक बांधीलकीच्या नात्याने देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे ते आधारस्तंभ होते. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यात ते नेहमीच आघाडीवर असत. १९४९ साली अमेरिकेस भेट देऊन तेथील रुग्णालयाप्रमाणे आपले के.ई.एम. रुग्णालय कसे सुधारेल याकडे त्यांचे रात्रंदिवस लक्ष असे व त्या दृष्टीने त्यांनी अक्षरश: झपाटल्याप्रमाणे काम केले. डॉ.धायगुडे यांच्याच काळात के.ई.एम.मध्ये ‘मज्जाशास्त्र’ (न्यूरोलॉजी), ‘भौतिकोपचार’ (फिजिओथेरपी), अद्ययावत नवीन रक्तपेढी, ‘मज्जाशल्यकर्म’ (न्यूरोसर्जरी) व ‘व्यवसायोपचार’ (ऑक्युपेशन थेरपी) हे नवीन विभाग चालू झाले व उत्तम तऱ्हेने कार्यरत झाले.

     याच काळात डॉ.धायगुडे यांनी बरेच संशोधन प्रकल्पपण चालू केले व हत्तीरोग (फिलारिअ‍ॅसिस) या विषयावर प्रबंध लिहिला. १९५१ साली डॉ.धायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली के.ई.एम. रुग्णालयाची रजत जयंती झाली. त्यानिमित्ताने लहानमोठ्या देणग्यांतून दहा लाख रुपये जमा झाले. त्यांतल्या चार लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून त्यांनी गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या जाहीर केल्या, तर उरलेल्या सहा लाखांच्या गुंतवणुकीतून पदव्युत्तर संशोधन व शिष्यवृत्त्या यांसाठी योगदान दिले.

     जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयाचे एक ‘विविध विभागीय नियतकालिक’ (मल्टिडिसिप्लिनरी जर्नल) असावे, अशी त्यांची फार इच्छा होती. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. ते नियतकालिक त्यांच्या पश्चात, म्हणजे १९५५ सालापासून चालू झाले व डॉ.एन.एम. पुरंदरे, डॉ.यू.के. शेठ, डॉ.सातोस्कर इत्यादी दिग्गजांनी ते पुढे चालू ठेवले.

     जी.एस. वैद्यकीय महाविद्यालय व के.ई.एम. रुग्णालय त्यांच्या वेळेपासूनच एक अग्रगण्य संस्था म्हणून नामवंत झाली. डॉ.धायगुडे, हे त्यांचे लोभस व्यक्तिमत्त्व, अविचल ध्येयनिष्ठा, सक्षम नेतृत्व, अविश्रांत प्रयासपूर्ण सेवाकार्य व अतिशय कडक शिस्त यांमुळे इतरांच्याहून अगदी वेगळेच दिसायचे.

     अधिष्ठाता म्हणून कार्यरत असतानाच मुंबईतच हृदयविकाराने त्यांचा अकाली मृत्यू झाला.

- डॉ. हेरंब चिंतामण धायगुडे

धायगुडे, रामचंद्र गोविंद