Skip to main content
x

धनगर, बाळाप्पा मायाप्पा

बाळूमामा धनगर

     कोल्हापूर-बेळगाव परिसरात ‘शेषाचे अवतार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या संत बाळूमामा धनगर यांचा जन्म मेंढ्यापालन करणार्‍या कष्टकरी कुटुंबात झाला. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील ‘अक्कोळ’ या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव ‘बाळाप्पा’ होते. त्यांच्या आईचे नाव ‘सत्यव्वा’ व वडिलांचे नाव ‘मायाप्पा’ होते. बाळाप्पाच्या आई-वडिलांना लग्नानंतर अनेक वर्षे मूल-बाळ नव्हते म्हणून ते चिंतेत होेते. आई हलसिद्धनाथाची उपासक होती, तर वडील पंढरीचे वारकरी, एकादशीचे व्रत करणारे भाविक होते. त्यामुळे आपल्या उपासनेचे, भक्तीचे पुत्रप्राप्ती हेच फळ आहे अशी दोघांची श्रद्धा होती.

बाळाप्पा लहानपणापासूनच एकांतप्रिय होते. लहान मुलांसारखे खेळणे, बागडणे, हुंदडणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. मेंढपाळ मुलांसमवेत ते राना-वनात मेंढ्या चरावयास घेऊन जात; पण ते इतर मुलांमध्ये फारसे न मिसळता एकटेच एकटक नजर लावून एखाद्या जागी बसून राहत. या त्यांच्या वर्तनातून ते वेगळेच आहेत हे सर्वांच्याच लक्षात आले होेते. बरोबर नेलेली भाकरी-चटणी ते स्वत: न खाता रानातील पशु-पक्ष्यांना खाऊ घालत व स्वत:चे पोट भरल्याचा त्यांना आनंद वाटत असे. त्यांच्या या वागण्याची आई-वडिलांना मात्र चिंता वाटत होती. त्यांना मेंढ्या राखण्याच्या कामात गोडी दिसत नाही असे वाटून वडिलांनी बाळाप्पांना एका श्रीमंत सावकाराकडे नोकरी लावून दिली. काही वर्षे बाळाप्पांनी नोकरी व्यवस्थित केली; पण एके दिवशी सावकाराच्या अमानवी वागण्यामुळे उद्विग्न होऊन ते नोकरी सोडून घरी आले. आई-वडिलांची चिंता कमी करावी या इच्छेने बाळाप्पांना त्यांची विवाहित बहीण आपल्या गावी घेऊन गेली व त्यांना शेतीच्या कामात गुंतवले. बहिणीची मुले बाळाप्पांना ‘बाळूमामा’ म्हणू लागली व त्याच नावाने ते पुढे सर्वत्र ओळखले गेले.

बाळूमामाच्या कष्टाने बहिणीची शेती व धंदे चांगलेच चालू लागले. हा भाऊ आपले घर सोडून जाऊ नये या हेतूने बहिणीने त्याचे लग्न आपल्याच मुलीशी लावून दिले. बाळूमामांचे मन परमार्थाच्या, पंढरीनाथाच्या भक्तीने रंगलेले होते. त्यांना संसार करण्याची इच्छा नव्हती; पण ते नाईलाजाने बोहल्यावर चढले. लग्न होताच बाळूमामाच्या सासऱ्याचे (बहिणीचा नवरा) निधन झाले व बहिणीच्या सर्व परिवाराची जबाबदारी बाळूमामांवर पडली. घरजावई म्हणून ते साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडू लागले. ‘हीच ईश्वर इच्छा दिसते’ असे म्हणत वर्तमानाला सामोरे गेले.

कोल्हापूर परिसरातील गारगोटी येथील मुळे महाराज यांचा बाळूमामांना अनुग्रह लाभला व गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांची पारमार्थिक प्रगती वेगाने होऊ लागली. खरे तर, ते पूर्वपुण्याईने  साधनेचे बळ घेऊनच जन्माला आलेले होते. गुरुकृपेने त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या. स्वप्नदृष्टान्तात बाळूमामांना एक देवदूत भेटला व बाळूमामांना वाचासिद्धी प्राप्त झाली.

अल्पकाळातच त्यांच्या आध्यात्मिक अधिकाराचा सुगंध सर्वत्र दरवळला व अनेक लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. ते त्यांना आपापल्या प्रापंचिक अडचणी सांगत. बाळूमामा त्या सोडविण्यासाठी त्यांना उचित मार्गदर्शन करीत. बाळूमामा हे पंढरीचे निष्ठावान वारकरी होते. त्यांची ७-८ जणांची वारकरी दिंडीच होती. बाळूमामा एकदा पंढरीस वारीला गेले असता तेथील उत्पातच ‘श्रीकृष्ण’ म्हणून त्यांच्या पाया पडले. असे अनेकांनी त्यांना कृष्णरूपात पाहिले. बाळूमामा मात्र ‘भाव तोचि देव’ म्हणत लोकांकडे दुर्लक्ष करीत. पंढरीच्या विठ्ठलाप्रमाणेच बाळूमामांची पट्टणकुडीचा विठ्ठलबिरदेव, ज्योतिबा, हलसिद्धनाथ, कोल्हापूरची अंबाबाई ही श्रद्धास्थाने होती. या सर्व ठिकाणी ते वर्षातून एकदा, दोनदा न चुकता जात. इतरांना बरोबर नेत.

बाळूमामा सश्रद्ध होते; पण अंधश्रद्धा त्यांना मान्य नव्हती. क्षेत्र अप्पाची वाडी येथे देवापुढे बकऱ्यांचा बळी देऊन भक्त नवस फेडत असत. ही पद्धत बाळूमामांनी बंद केली. आज तेथे पुरणाचा नैवेद्य दाखविला जातो. बाळूमामांच्या हातून अनेक अशक्य, अतर्क्य अशा  घटना, ज्याला चमत्कार म्हणता येतील अशा, घडल्या आहेत; पण ते कधीही आपल्या सिद्धीचे प्रदर्शन करीत नव्हते. ती त्यांची सहज-स्थिती होती. अशा संत बाळूमामांनी वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी इहलोकीची यात्रा संपविली. आदमापूर (जि. कोल्हापूर) येथे त्यांची समाधी आहे. तेथे बाळूमामा देवस्थान ट्रस्ट स्थापन झालेला आहे. दर महिन्याच्या अमावास्येला आदमापूर येथे यात्रा भरते. फाल्गुन वद्य एकादशीला महाराष्ट्र, कर्नाटकातील समस्त धनगर समाज आदमापूर यात्रेनिमित्त एकत्र येतो.

 — विद्याधर ताठे

धनगर, बाळाप्पा मायाप्पा