Skip to main content
x

गाडे, हरी अंबादास

       प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुपच्या संस्थापकांपैकी एक, तसेच एक्स्प्रेशनिस्ट आणि अमूर्त शैलीत चित्रे काढणारे प्रयोगशील चित्रकार हरी अंबादास गाडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव जानकी होते. त्यांचे घराणे जमीनदाराचे असून गाडे यांना चित्रकलेची उपजतच आवड होती. गाडे परिवार १९३४ मध्ये नागपूर येथे राहावयास आल्यामुळे गाडे यांचे सर्व शिक्षण नागपूरलाच झाले. ते प्रथम श्रेणीत मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर १९३८ मध्ये ते बी.एस्सी. झाले व १९४२ मध्ये त्यांनी जबलपूर प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये बी.एड.च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.

       त्यांचा १९४३ मध्ये लीला अवधनकर यांच्याशी विवाह झाला. अभ्यासाबरोबर गाडे यांचा चित्रकलेचा सराव व अभ्यास सुरू होता. ‘हाऊ टू पेंट वॉटर कलर’, ‘रिअ‍ॅलिस्टिक लॅण्डस्केप’, ‘डिझाइन अ‍ॅण्ड व्हिजन’ ही त्या काळात त्यांनी अभ्यासलेली काही पुस्तके. गाडे हे प्रखर बुद्धिवादी होते.

       हरी गाडे जबलपूरच्या महाविद्यालयात असताना रवींद्रनाथ टागोरांचा मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली म्हणून गाडे यांनी त्यांचे ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट पोट्रेट केले. ते बरेच गाजले. एम.एड.साठी त्यांनी ‘इमोशनल रिअ‍ॅक्शन टू कलर्स बाय चिल्ड्रन’ हा विषय प्रकल्पासाठी निवडला. लहान मुलांचे रंगकाम हे त्यांच्या भावविश्‍वाशी निगडित असते असे गाडे यांचे मत होतेे.

       ते १९४७ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून जी.डी आर्ट प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ते १९५० मध्ये ए.एम (आर्ट मास्टर) पदवी परीक्षेत सर्वप्रथम आले.

       हरी गाडे यांची चित्रे बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनामध्ये प्रदर्शित झाली. त्यामुळे त्यांचे नाव उदयोन्मुख चित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांचे बालपण आणि शिक्षणाचा कालखंड सामाजिकदृष्ट्या चैतन्यमय होता. गांधीवादाचा उदय आणि स्वातंत्र्याची चळवळ ऐन भरात होती. त्याच काळात दुसऱ्या महायुद्धाची भीषणता जाणवत होती. यंत्रयुगाचा रेटाही चालू होता.

       या सर्व सामाजिक परिस्थितीचा चित्रकला जगतावर झालेला एक परिणाम म्हणजे १९४८ मध्ये झालेली ‘प्रोग्रेसिव्ह आर्ट ग्रुप’ची स्थापना; त्यामुळे कलाजगतात एकच खळबळ उडाली. या ग्रुपमध्ये फ्रान्सिस न्यूटन सूझा, के.एच. आरा, एच.ए. रझा, एम.एफ. हुसेन, एच.ए. गाडे, सदानंद बाकरे (शिल्पकार) ही मंडळी होती. या ग्रुपने रचनात्मक व कलात्मक स्वतंत्रता साध्य करण्यासाठी राष्ट्रीय आदर्शवाद आणि सामाजिक रूढीकडे एका वेगळ्या पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन मांडला. या ग्रुपच्या बैठका म्युझीयमजवळच्या आर्मी रेस्टॉरन्ट आणि मॅजेस्टिक रेस्टॉरन्टमध्ये होत. या ग्रुपचा जाहीरनामा सूझा यांनी लिहिला होता. या ग्रुपचे हितचिंतक म्हणजे श्‍लेशिंजर, लायडन व प्रो.वॉल्टर लॅन्गहॅमर हे त्या काळात कलाजगतावर प्रभाव असणारे त्रिकूट होते.

       प्रोग्रेसिव्ह आर्टच्या कलाकारांच्या चित्रांचे प्रदर्शन १९४९ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीच्या आर्टिस्ट सेंटर येथे झाले. यामध्ये गाडे यांचे ‘टी स्ट्रीट’ हे लँडस्केप होते. हे चित्र चांगलेच गाजले. या चित्रावर उत्तर दृक्- प्रत्ययवादी (पोस्ट इम्पे्रशनिस्ट) चित्रकारांचा पगडा होता. गाडे यांची बडोदा आणि सुरत येथेही प्रदर्शने झाली. या प्रदर्शनातील प्रदर्शित कलाकृतींचे रसिकांनी खूप कौतुक केले. याच दरम्यान सूझा, रझा व बाकरे हे तिघे जण परदेशी गेल्याने प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप  विस्कळीत झाला आणि मोहन सामंत, शंकर पळशीकर, वासुदेव गायतोंडे आणि डी.जी. कुलकर्णी या ताज्या दमाच्या चित्रकारांसमवेत आरा व गाडे यांनी ‘बॉम्बे  ग्रुप’ची स्थापना केली.

       गाडे यांच्या चित्रशैलीला स्वतःची अशी एक खास बैठक आहे. गाडे यांच्या चित्रांत रंगांचे वेगळे परिमाण आहे. १९५० च्या दरम्यानच्या आधीच्या चित्रांत जलरंगांचा जास्त वापर आढळतो. त्यानंतर मात्र तैलरंगाचा जास्त वापर आढळतो. त्यांच्या चित्रांत पेन्टिंग नाइफ व ब्रशचा एकत्रितपणे मुक्त वापर आढळतो. त्यांच्या चित्रामध्ये कलाकारांची मुक्त आणि सौंदर्यासक्त नजर जाणवते. त्यामुळे त्यांच्या चित्रांचा विषय मुंबईतील झोपडपट्टी असला तरी त्यातून फक्त सौंदर्याचाच साक्षात्कार होतो. त्याच कालखंडात त्यांच्या ‘काश्मीर’ या चित्राला बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले होते. त्यानंतर साधारणपणे १९७८ नंतरच्या चित्रात गाडे अ‍ॅक्रिलिक कलरचा वापर करतात. त्यांची काही चित्रे : ‘रथसप्तमी’, ‘आनंदप्रभात’, ‘मॅन अ‍ॅण्ड लॅम’, ‘डॉल हाउस’, ‘ग्रीन कार्पेट’, ‘ब्लू हट अ‍ॅण्ड ब्लू’ ही आहेत.

       गाडे यांचे वैशिष्ट्य असे, की आधुनिकतेच्या तत्त्वांशी ते प्रामाणिक राहिले. प्रोग्रेसिव्ह ग्रुपच्या काळात गाडे माणसे नसलेल्या नुसत्याच घरांची निसर्गचित्रे, शहरांमध्ये उभारल्या जाणार्‍या इमारती रंगवीत असत. त्यातूनच पुढे त्यांची अमूर्त चित्रशैली विकसित झाली. स्वतः बायोकेमिस्ट असल्यामुळे ते रंगांचा वापर वैज्ञानिक दृष्टिकोनातून करीत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विरोधी रंगांचा वापर त्यांच्या भावनात्मक गुणांसह करणे ही त्यांची प्राथमिक ओढ होती आणि ते सारा चित्रात्मक अनुभव रंगांच्या तांत्रिक बाजू सांभाळून अवकाशाच्या वैशिष्ट्यांसह साकारीत.

       गाडे यांची अमूर्त चित्रे रचनात्मक समतोल साधणारी आहेत. कधीकधी आकारांच्या रचनेपेक्षा गाडे यांचा सारा भर रंग आणि आकार यांच्यातल्या चैतन्यपूर्ण लयबद्धतेवर असतो. गाडे यांची चित्रे एक्स्प्रेशनिस्ट शैलीतली मानली जातात, वास्तव चित्रणाऐवजी गाडे आपल्या चित्रांत रंगांच्या माध्यमातून भावनांचा जो कल्लोळ व्यक्त करतात आणि त्या आंतरिक वास्तवामुळे रंग आणि आकारांचे जे विरूपीकरण होते, त्या अर्थाने. गाडे यांच्या चित्रनिर्मितीत आणि शैलीत एक प्रकारचे सातत्य आणि ताजेपण राहिला.

       १९५८ ते १९७७ या कालखंडात गाडे दिल्ली विद्यापीठाशी संलग्न सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, या विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. दिल्ली, नागपूर, हैदराबाद, बुडापेस्ट, हंगेरी, पॅरिस आदी ठिकाणची त्यांची वैयक्तिक चित्रकलेची प्रदर्शने खूप गाजली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फण्डामेंटल रिसर्च, मुंबई अ‍ॅटॉमिक एनर्जी रिसर्च सेंटर, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, नवी दिल्ली, सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई, इंटरनॅशनल गॅलरी, बँकॉक आदी कला क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण ठिकाणी त्यांची चित्रे संग्रहित केली आहेत.

        गाडे यांना १९९० च्या सुमारास पक्षाघाताचा झटका आला; पण तरीही त्यांची कलासाधना सुरूच होती. महाराष्ट्र राज्य व कला संचालनालयातर्फे ‘कलातपस्वी’ या पुरस्काराने सन १९९२ मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर २००० मध्ये नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबई शाखेच्या उद्घाटन प्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांचा सन्मान करण्यात आला.

- प्रकाश भिसे

गाडे, हरी अंबादास