गानू, प्रभाकर लक्ष्मण
प्रभाकर लक्ष्मण गानू यांचा जन्म हैद्राबाद येथे झाला. त्यांच्या वडिलांचा हैदराबाद मुक्तिसंग्रामातही सहभाग होता. व्यवसायाने वकील असलेल्या लक्ष्मणराव गानू यांचा हैदराबाद येथील ‘विवेकवर्धिनी’ या संस्थेच्या स्थापनेत मोठा वाटा होता. प्रभाकर यांचे प्राथमिक, माध्यमिक सर्व शिक्षण विवेकवर्धिनीतच झाले. १९५४मध्ये त्यांनी स्थापत्यशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी मिळविली. १९५५मध्ये त्यांचा विवाह बार्शीच्या सुधा सहस्त्रबुद्धे यांच्यासमवेत झाला. १९५४मध्ये त्यांची नियुक्ती कर्नाटकातील रायचूर येथील तुंगभद्रा प्रकल्पावर झाली. भाषावार प्रांतरचनेनंतर १९५७ मध्ये ते मराठवाड्यातील येलदरी प्रकल्पावर रुजू झाले. शासकीय सेवेतील ओव्हरसियर ते मुख्य अभियंता अशा पदांवर त्यांनी काम केले.
येलदरी प्रकल्पात त्यांना आरेखन विभागापासून वीजघराच्या कामापर्यंत अनुभव घेता आला. १९६६मध्ये ते पदोन्नतीवर जायकवाडी प्रकल्पाच्या दगडी धरणाचे कार्यकारी अभियंता झाले. सुरुवातीला धरणाचे अंदाजपत्रक, संकल्पचित्रे, निविदाविषयक प्राथमिक कामे पूर्ण केल्यावर १९६९मध्ये प्रत्यक्ष धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. या कामाचे बांधकाम ज्या कंत्राटदाराला देण्यात आले होते, त्याच्याकडून बर्याच चुका होऊन काम ठप्प झाले. त्यामुळे तत्कालीन पाटबंधारे खात्याचे मंत्री शंकरराव चव्हाणांच्या पुढाकाराने हे बांधकाम कंत्राटदाराऐवजी पाटबंधारे खात्यामार्फत करण्याचा निर्णय घेतला गेला. हा असा पहिलाच प्रयोग होता. कार्यकारी अभियंता म्हणून प्रभाकर गानूंनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली.
या कामाचा पूर्वानुभव कोणासही नव्हता. परंतु व्यवस्थित केलेल्या नियोजनामुळे प्रभाकर गानू यांनी सहकार्यांसमवेत दोन ते तीन पाळ्यांत काम करून, तसेच कामाची गती व गुणवत्ता राखून वेगाने, अवघ्या तीस महिन्यांत व कमी खर्चात धरणाचे काम पूर्ण केले. या प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्यात पैठणच्या खुल्या कारागृहातील कैद्यांचाही विशेष सहभाग होता. १९७२मध्ये पूर्ण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्याच्या या कामात योगदान दिलेल्या कार्यकारी अभियंता ते शिपाई स्तरापर्यंतच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना शासनाकडून सानुग्रह अनुदान देण्यात आले.
जायकवाडी दगडी धरणाच्या दुसर्या टप्प्याच्या कामात प्रस्तंभ, द्वारे व ब्रिजचा अंतर्भाव होता. याच अभियंता चमूने पहिल्या टप्प्याच्याच जिद्दीने हे काम अवघ्या साडेतीन वर्षांत पूर्ण केले. हे करताना द्वार उभारणीचे काम दोन द्वार उभारणी उपविभागांच्या साहाय्याने एकाच वेळी धरणाच्या दोन्ही तीरांकडून सुरू करून शेवटी मधली द्वारे उभारण्याचा अभिनव प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला. २४फेब्रुवारी१९७६ रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हा प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला. त्यासाठी त्यांनी कोयना व जायकवाडी प्रकल्पातील काही अभियंत्यांना भातसा प्रकल्पात सामावून घेतले.
भातसाच्या परिसरात पावसाचे प्रमाण अधिक होते. या कालावधीत कामाचे दिवस वाया न घालविता गानू यांनी या पावसाचा पुरेपूर उपयोग करून घेतला. खात्यामार्फत काम सुरू होण्यापूर्वी कंत्राटदाराने नऊ वर्षांत साडेचार लक्ष घनमीटर बांधकाम केले होते, तर गानू यांच्यासमोर साडेचार वर्षांत नऊ लक्ष घनमीटर काम करण्याचे आव्हान होते. या कामासाठी मदत म्हणून एक वेगळा यांत्रिकी विभाग सुरू करण्यात आला. त्यामध्ये त्यांना कृ.अ.ग्रामपुरोहित, नं.द.वडनेरे व एम.बी.देशपांडे या कार्यकारी अभियंत्यांची विशेष मदत झाली. सर्वांच्या सहकार्याने प्रभाकर गानू यांच्या नियोजनाखाली जून१९८०मध्ये ठरल्याप्रमाणे प्रकल्पातील पहिला टप्पा पूर्ण होऊन मुंबईला शंभर दशलक्ष घनमीटर पाणी पुरविण्याचे उद्दिष्ट साध्य झाले.
यानंतर प्रभाकर गानू यांची नियुक्ती गुणनियंत्रण मंडळ, पुणे, अहमदनगर पाटबंधारे मंडळ, अहमदनगर व ऊर्ध्वपेनगंगा प्रकल्प मंडळ, नांदेड येथे झाली. त्यानंतर त्यांची माजलगाव प्रकल्प मंडळावर व पुन्हा एकदा निम्न तेरणा प्रकल्पावर नियुक्ती झाली. बुडित क्षेत्रातील व परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रखर विरोधामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण होते. या ठिकाणी शासनाने राज्य राखीव पोलीस दलाची एक सशस्त्र तुकडी तैनात केली होती. अशा वेळी पाटबंधारे विभागाचे तत्कालीन मंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून प्रभाकर गानू यांनी हा प्रश्न कौशल्याने हाताळला. लोकांचा प्रकल्पाला असलेला विरोध कमी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच १डिसेंबर१९८३ रोजी सुरू झालेला हा प्रकल्प अवघ्या सहा वर्षांत द्वार उभारणी व प्रिकास्ट ब्रिजसह १९८९मध्ये पूर्ण झाला. त्यानंतर प्रभाकर गानू यांची नियुक्ती औरंगाबाद येथे मुख्य अभियंता पदावर झाली. या कालावधीत त्यांनी कालव्याच्या कामासाठी, विविध भूस्तरांसाठी वितरकांचे काटछेद (प्रमाणीकरण) करण्याचा प्रयत्न केला. यामुळे कालवे कामांची संकल्पना व अंमलबजावणीत सुलभता आली.
३१जानेवारी१९८९ रोजी ते मुख्य अभियंता पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर प्रभाकर गानूंच्या पुढाकाराने त्यांच्या काही नातेवाइकांसह त्यांनी गानू ट्रस्टची स्थापना केली. त्याद्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. अनाथाश्रमांना देणग्या दिल्या. त्यांच्या आईवडिलांच्या नावाने औरंगाबाद येथील सरस्वती भुवन या संस्थेत त्यांनी ‘लक्ष्मण जानकी स्मृती सभागृह’ बांधून दिले. त्यांची कर्मभूमी मराठवाड्यातील ते कार्यरत असलेल्या प्रकल्प परिसरातील महाविद्यालयीन गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दरवर्षी एक लाख रुपये विभागून देण्याची संकल्पना कार्यान्वित होत आहे.