Skip to main content
x

गडाख-पाटील, यशवंत कंकरराव

     यशवंत कंकरराव गडाख-पाटील यांचा जन्म सोनई या खेडेगावात झाला. त्यांचे वडील पोलिस खात्यात नोकरीस होते, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी मुदतपूर्व निवृत्ती घेतली व 1948 मध्ये सोनई येथील वाड्यात राहण्यास सुरुवात केली. जीवन शिक्षण मंदिर, सोनई या शाळेत जून 1949 मध्ये यशवंतराव यांचे इयत्ता पहिलीपासूनचे शिक्षण सुरू झाले. वडिलांचे सख्खे चार भाऊ आणि चार चुलतभाऊ आणि त्यांच्या सर्वांची मुले-मुली असा चाळीस व्यक्तींचा कुटुंबकबिला असलेल्या वाड्यात यशवंतराव राहत. यशवंतराव शेती शाळेत शिकले. तिथे मुलांना शेतीची कामे शिकविली जात. तिथे वांगी, टोमॅटो अशा वेगवेगळ्या भाज्यांची लागवड केली जात असे. यातूनच त्यांच्यात शेतीची आवड निर्माण झाली. पुढे जमिनीची विभागणी झाल्याने त्यांनी शेतातील वस्तीवर राहण्यास सुरुवात केली. एकूणच शेती शाळा आणि घरची शेती याची जबाबदारी वाढत्या वयाप्रमाणे वाढत गेल्यामुळे त्यांच्या कृषी ज्ञानात भरच पडली. त्यांचे इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण सोनई येथील प्राथमिक शाळेतील गुरुजींच्या करड्या देखरेखीखाली झाले. सातवीनंतर सोनई गावात शिक्षणाची सोय नव्हती; परंतु योगायोगाने 1956 मध्ये अहमदनगर शिक्षण संस्थेचे श्री शनैश्वर विद्यामंदिर सोनई येथे सुरू झाले. या शाळेत त्यांचे इयत्ता 11 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले.

     गडाख यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. शेतीसाठी आणि घरची व्यवस्था पाहण्यासाठी घरचा हक्काचा माणूस हवा म्हणून त्यांचे शिक्षण थांबले.  यथावकाश ते शारदाबाईंशी विवाहबद्ध झाले. परंतु त्यांची शिक्षणाची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी अहमदनगर येथे महाविद्यालयात प्रवेश घेऊन बी.ए.पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. तेव्हा त्यांनी महाविद्यालयाच्या मुख्य सचिव पदाची निवडणूक एका वर्षी जिंकली आणि उदयोन्मुख राजकीय नेतृत्वाचा जन्म झाला. त्यांनी बी.ए. पदवी नंतर बी.एड्. ची पदवीही घेतली. त्यानंतर त्यांनी घोडेगाव येथे मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री घोडेश्वरी माध्यमिक विद्यालयात शिक्षकाची नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यांचा पहिला पगार गडाख यांना जीवनात एक वेगळे समाधान देऊन गेला. त्यांनी  1967 मध्ये नेवासा तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीत सोनई ग्रामस्थांच्या आग्रहाखातर उमेदवारी अर्ज भरला. निवडणुकीत विजय मिळालाच पण पंचायत समितीचा सभापती हा मानाचा शिरपेच त्यांच्यासाठी राजकीय जीवनाची मुहूर्तमेढ ठरला. त्यांचा सभापती पदाचा कार्यकाल 1967 ते 1971 हा होता. त्यांनी भारतात पंचायत राज व्यवस्थेचा  नवीनच प्रयोग सुरू केला. यामुळे रस्ते, इमारती, शाळा, तलाव अशा विविध विकासकामांमधून राजकीय शिक्षण देखील सुरू झाले. त्यांनी 1972 ते 1978 या कालावधीत अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद मोठ्या जबाबदारीने सांभाळले. यापूर्वी त्यांना जिल्हा परिषदेत शिक्षण समिती, सार्वजनिक बांधकाम समिती इत्यादी समितीचे अध्यक्षपद सांभाळण्याचा अनुभव मिळाला होता. ते पुढे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले व 1979 ते 1984 या वर्षात एका जिल्ह्याला आकार देण्याचे काम त्यांनी केले. तेव्हा त्यांना राजकारण, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, कृषी, सहकार, शेतीपूरक उद्योग व्यवसाय अशा अनेक क्षेत्रांकडे लक्ष देण्याची संधी मिळाली. ते 1969 ते 1977 या कालावधीत अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस समितीचे अध्यक्ष होते. त्या काळात त्यांनी महाराष्ट्रात प्रथम जिल्हा परिषदेमार्फत गायींसाठी कृत्रिम रेतन प्रकल्प राबविला; त्यामुळे जिल्ह्यात उल्लेखनीय दूध उत्पादनात वाढ झाली. अहमदनगर जिल्ह्यात ‘आमचे गाव आमची शाळा’ ही योजना सुरू करण्यात त्यांनी प्रथम पुढाकार घेतला. तीच योजना पुढे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली. त्यांनी जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील 106 नामवंत कलाकार, लेखक, कवी यांचा सन्मान करण्याचा वेगळा उपक्रम घडवून आणला.

     शेती शाळेत शिकणे, शेतीवर प्रत्यक्ष काम करणे, बाजारपेठेत स्वत: शेतमालाची विक्री करणे यामध्ये शेतीचे प्रश्न आणि त्याचे व्यावहारिक गणित गडाख यांच्यातील द्रष्ट्या नेतृत्वाला समजले. या कृषी अध्यापनाच्या ध्येयातून त्यांनी 1970 च्या दरम्यान मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निर्मितीचे स्वप्न पाहिले आणि ते 1979 मध्ये पहिला चाचणी ऊस गळीत हंगाम सुरू करून पूर्ण केले. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही आशिया खंडातील पहिली बँक होय. तिचे ते 1991 पासून संचालक होते तर 1993 ते 1995 आणि 1999 ते 2004 या कालावधीत त्यांनी दोनदा अध्यक्षपद भूषविले होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबईचे ते 1998 ते 2011 पर्यंत संचालक होते. ते नेवासा तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक आहेत. अहमदनगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघातून 1984 ते 1993 या कालावधीत सलग तीन वेळा ते लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले. ते 1997 ते 2009 या कालावधीत अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषद सदस्य म्हणून निवडले गेले. त्यांनी खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा बँक अध्यक्ष अशी राजकीय क्षेत्रातील उच्च पदे सांभाळली.

     गडाख यांनी मुळा शिक्षण संस्था, सोनई या शैक्षणिक संस्थेची 1978 मध्ये स्थापना केली. 1989 मध्ये यशवंतराव चव्हाण मेमोरियल मेडिकल अ‍ॅण्ड रुरल डेव्हलपमेंट फाउण्डेशन, अहमदनगर व 2003 मध्ये ताईसाहेब कदम सेवाभावी फाउण्डेशन व संशोधन केंद्र, सोनई यांसारख्या संस्थांची स्थापना करून समाजशिक्षणाच्या गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या माध्यमातून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, पदवी-पदव्युत्तर महाविद्यालये सुरू केली. एम.बी.ए. डेंटल, फार्मसी, अ‍ॅग्री, अध्यापक, चित्रकला अशी व्यावसायिक महाविद्यालये याप्रमाणे एकूण 43 युनिट्स उभी करून त्यांनी शैक्षणिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. विशेषत: ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणातून महिला सशक्तीकरण, सबलीकरण यातून मानव संशोधन विकास या राष्ट्र गरजेची पूर्तता करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

     नेवासा ही संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी होय. नेवासा येथे ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती झाली; म्हणून 1990 मध्ये तेथे श्री ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी महोत्सवाचे आयोजन करून गडाख यांनी महाराष्ट्रातील थोर साधू-संताचा सन्मान तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते घडवून आणला. त्यांनी 1996 मध्ये श्री ज्ञानेश्वर सांस्कृतिक प्रतिष्ठानची उभारणी नेवासे येथे केली.

     अहमदनगर येथे 1997 मध्ये 70 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणून केलेले भाषण अनेक साहित्यिक, विचारवंताच्या भुवया उंचावणारे ठरले. नेवासा येथे 1982 मध्ये चौथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करून त्याचे स्वागताध्यक्षपद भूषविले. अहमदनगर येथे 2004 मध्ये नवोदित राष्ट्रीय मराठी-कोकणी साहित्य संमेलनाचे उद्घाटक, शोध मराठी मनाचा या जागतिक मराठी अकादमीचे आयोजन करून त्याचे स्वागताध्यक्ष, सहकार-बँकिंग या क्षेत्रासंबंधी वेळोवेळी विविध वर्तमानपत्रांतून अभ्यासपूर्ण लिखाण; या आणि अशा अनेक कार्यामधून सांस्कृतिक आणि वाङ्मयीन क्षेत्रात एक मापदंड निर्माण केला. आपल्या वाढदिवसानिमित्त हार-तुरे, शाल स्वीकारून सत्कार देण्याघेण्याऐवजी शिक्षणासाठी मुली दत्तक योजना त्यांनी राबविली. मरणोत्तर नेत्रदानाचा कार्यकर्त्यासमवेत संकल्प करून अशा समाजहिताच्या गोष्टींना त्यांनी प्राधान्य दिले.

     गडाख यांनी 2003 मध्ये ‘अर्धविराम’ या आत्मचरित्राचे लेखन केले. त्याचे प्रकाशन शरद पवार व त्यावेळचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत पुणे येथे झाले. हे आत्मचरित्र पुणे विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बी.ए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले गेले. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते अर्धविरामच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन 2007 मध्ये नवी दिल्ली येथे झाले. त्यांचे 2009 मध्ये ‘सहवास’ हे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले. त्यांच्या या साहित्यकृतींना 2003 मध्ये कविवर्य रा.ना. पवार स्मृती पुरस्कार दै. केसरी मराठा संस्था पुणेचा वाङ्मय निर्मितीबद्दल साहित्यसम्राट न.चिं. केळकर पुरस्कार, सदाशिव नारायण कदम गुरुजी वाङ्मय पुरस्कार देशभक्त बळवंतराव मगर साहित्य निर्मितीबद्दलचा राज्यस्तरीय पुरस्कार, आरोग्य मित्र संघटना अहमदनगरचा पुरस्कार, नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठान पुणेचा समाजवैभव पुरस्कार, नरुभाई लिमये स्मृती-आर्यभूषण पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले.

     गडाख यांनी जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, जपान, कोरीया, हॉलंड, हवाई, थायलंड, इटली, स्वीत्झलँड, रशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादी देशांत अनेक वेळा अभ्यासदौरे, करून समाजपरिवर्तनाच्या दिशा कशा असाव्यात याचा सूक्ष्म अभ्यास केला.

     - गोरक्षनाथ बबन कलापुरे

 

गाडगीळ, धनंजय रामचंद्र

प्रणेते

10 एप्रिल 1901 - 3 मे 1971

धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण नागपूर येथील पटवर्धन विद्यालयात झाले. उच्च शिक्षणासाठी ते विलायतेस गेले. तेथे ते इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठाच्या क्वीन्स महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनी बी. ए. (1921) एम.ए. आणि डी.लिट. या पदव्या संपादन केल्या. ते 1924 मध्ये ब्रिटिश सरकारच्या मुंबई इलाख्यातील अर्थविषयक खात्यात सहसचिव या पदावर रुजू झाले आणि एम.टी.बी. महाविद्यालयात प्राचार्य झाले. त्यांनी 1930 सालापर्यंत हे प्राचार्यपद सांभाळले.

भारतातील अर्थशास्त्रविषयक प्रश्नांवर संशोधन करण्यासाठी 1930 मध्ये पुण्यामध्ये एक संस्था स्थापन करण्यात आली. नामदार गोपाळ कृष्ण गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या नावाने ती ओळखली जाते. अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांतील संशोधन करणे, विविध प्रकारच्या आर्थिक व्यवहारांची शास्त्रीय पद्धतीने तपशिलात जाऊन माहिती गोळा करणे आणि या कामांसाठी कार्यकर्ते घडविणे हे या संस्थेचे उद्देश आहेत. रावबहाद्दूर रावजी रामचंद्र काळे यांनी भारत सेवक समाज या संस्थेला एक लाख वीस हजार रुपयांची देणगी दिली होती आणि या रकमेतून ही संस्था स्थापन झाली. रावबहाद्दूर काळे यांचे जामात धनंजय रामचंद्र गाडगीळ हे या संस्थेचे पहिले संचालक झाले. त्यासाठी ते सुरतेहून पुण्याला आले होते. पुढील छत्तीस वर्षे म्हणजे 1966 सालापर्यंत धनंजय रामचंद्र गाडगीळ या संस्थेचे संचालक होते. त्यांनी या संस्थेसाठी अतिशय निष्ठापूर्वक काम केले. परिणामी ही संस्था सर्व भारतात अर्थशास्त्रीय संशोधन संस्था म्हणून प्रसिद्ध झालीच, शिवाय भारताबाहेरही संस्थेची कीर्ती पसरली.

धनंजय गाडगीळ हे भारतातील सहकारी चळवळीचे आद्य प्रणेते मानले जातात. त्यांच्या प्रयत्नांतूनच महाराष्ट्रातील सहकारी चळवळ सुरू झाली व तिची चांगली वाढ होत गेली. यामुळे महाराष्ट्रात सहकारी बँका व सहकारी साखर कारखाने पुढे आले. अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर रोड (श्रीरामपूर) या गावी 1945 साली द डेक्कन कॅनॉल्स बागायतदार परिषद भरली. गाडगीळ हे या परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेत सर्व शेतकर्‍यांनी एकत्र येऊन सहकारी साखर कारखाना स्थापण्याविषयीचा ठराव विठ्ठलराव एकनाथराव विखे-पाटील यांनी मांडला होता. तेव्हा गाडगीळ व तेथे उपस्थित असलेले शेतकरी यांनी अशा कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणून विखे-पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविली. विखे-पाटील यांनी पाच वर्षे जीवापाड मेहनत घेतली आणि 31 डिसेंबर 1950 रोजी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचा पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहिला व स्थानिक प्रवरा नदीवरून त्याला प्रवरा सहकारी साखर कारखाना हे नाव दिले गेले. हा आशिया खंडातील आघाडीवरील साखर कारखाना बनला. गाडगीळ यांनी केलेल्या साहाय्यामुळे विखे-पाटील यांच्या आग्रहाखातर 1950-60 दरम्यान गाडगीळ या कारखान्याचे अध्यक्ष तर विखे-पाटील उपाध्यक्ष होते. नंतर 1960 साली विखे-पाटील अध्यक्ष झाले आणि हा कारखाना विखे-पाटील प्रवरा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जाऊ लागला. गाडगीळ यांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या सहकार चळवळीतूनच नंतर सहकारी सूतगिरण्याही पुढे आल्या.

गाडगीळ 1966 मध्ये गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या संचालक पदावरून निवृत्त झाले. त्याच वर्षी त्यांची पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली. या पदावर एक वर्षभर कार्य केल्यावर 1967 मध्ये भारत सरकारने केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक केली. ते 1971 सालापर्यंत म्हणजे चार वर्षे आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. भारताचे पंतप्रधान हे या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. या आयोगाच्या कारभाराची प्रत्यक्ष देखभाल उपाध्यक्षाला करावी लागते. हा आयोग स्वायत्त संस्था असून त्याने तयार केलेल्या व सुचविलेल्या योजना संसदेत मान्य होतात आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळे करतात. नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदच्या जबाबदारीतून ते मोकळे झाले. त्यानंतर ते पुण्याला परत यायला निघाले होते. परत येत असताना आगगाडीच्या प्रवासात असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

गाडगीळ यांनी विपुल व सकस लेखन केले आहे. या लेखनात त्यांनी भारतातील अर्थकारणाविषयीचे मूलभूत विचार मांडले आहेत. त्यांनी प्रथम मुख्यत: भारतातील शेती व्यवसायाशी निगडित असलेल्या गुंतागुंतीच्या समस्यांचा सखोल अभ्यास केला. गाडगीळ यांनी पंचविसाहून अधिक ग्रंथ लिहिले असून ते अर्थशास्त्रीय क्षेत्रात प्रसिद्ध ग्रंथ म्हणून ओळखले जातात. यांपैकी ‘द इंडस्ट्रियल इव्होल्यूशन इन इंडिया’ (1928), ‘द फेडरल प्रॉब्लेम्स इन इंडिया’ (1944), ‘रेग्युलेशन ऑफ वेजीस’ (1954), ‘प्लॅनिंग इन इंडिया अँड इकॉनॉमिक पॉलिसी’ (1961) वगैरे त्यांचे सर्वाधिक महत्त्वाचे ग्रंथ होत. त्यांनी मराठीतूनही अर्थशास्त्रविषयक लेखन केले आहे. त्यांच्या मराठी सर्व लेखांचे संकलन गोखले अर्थशास्त्र संस्थेने केले असून ते लेख याच संस्थेने ‘धनंजय रामचंद्र गाडगीळ लेखसंग्रह’ या शीर्षकाने प्रसिद्ध केले आहेत. या लेखांचे दोन संग्रह गाडगीळ यांच्या निधनानंतर म्हणजे 1973-74 साली प्रकाशित झाले.

पुणे व मुंबई विद्यापीठांचे सभासद (फेलो) म्हणून गाडगीळ यांची निवड झाली होती. त्यांचा अनेक  आर्थिक व शैक्षणिक संस्थांशी निकटचा संबंध आला होता आणि त्यांनी अनेक शासकीय समित्यांवरही काम केले होते. उदाहरणार्थ, पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते अनेक वर्षे खजिनदार होते. याशिवाय महाराष्ट्र प्रादेशिक ग्रंथालयाचे अध्यक्ष, रिझर्व्ह बँकेचे सल्लागार, केसरी-मराठा संस्थेचे विश्वस्त यांसारख्या जबाबदार्‍याही त्यांनी समर्थपणे व निष्ठेने पार पाडल्या. तसेच गाडगीळ काही वर्षे राज्यसभेचे सदस्यही होते.

- अशोक ठाकूर

गडाख-पाटील, यशवंत कंकरराव