गडेकर, चंद्रकांत गुंडप्पा
चंद्रकांत गुंडप्पा गडेकर यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील मार्डी येथे भटके विमुक्तातील ओतारी समाजामध्ये झाला. महाराष्ट्रामध्ये अतिशय विरळ असणारा हा ओतारी समाज. मार्डीमध्ये ओतारी समाजाची ५ ते ६ घरे आहेत. वडील गुंडप्पा गडेकर हे कपडे शिवत असत. चंद्रकांत गडेकर यांना ४ भाऊ व एक बहीण होती. त्यांचे माध्यमिक शिक्षण मार्डीतच झाले. घरची परिस्थिती हलाखीची होती, तरीही वडिलांनी मोठ्या जिद्दीने मुलांना शिक्षण दिले. पुढे बी. ए., बी. एड. होऊन मार्डीमध्येच महात्मा फुले माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले. आज त्याच माध्यमिक विद्यालयामध्ये मुख्याध्यापक म्हणून गडेकर काम पाहत आहेत.
लहानपणी त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. मॅट्रिकला असताना मार्डीहून सोलापूरला १५ कि.मी. पायी प्रवास करून शिक्षण घेतले. सोलापूरचे बापुराव सारोळकर यांनी त्यांना संघ कार्यालयात राहून शिक्षण घेण्यास सुचविले. मग ते संघ कार्यालयात राहून शिक्षण घेऊ लागले. पदवीनंतर त्यांनी मराठवाड्यात धाराशिव, लातूर परिसरात काही काळ प्रचारक म्हणून काम केले. सामाजिक समरसता मंच या संस्थेच्याही जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांचे खरे कार्य सुरू झाले ते भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या स्थापनेनंतर भटके-विमुक्त तसेच समाजातील उपेक्षित, वंचित, दुबळ्या घटकांच्या शैक्षणिक व सर्व प्रकारच्या उन्नतीसाठी भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठानाची स्थापना झाली. सोलापूर, धाराशिव व लातूर परिसरात भटक्यांची दयनीय स्थिती होती.
सोलापूरला १९९२ मध्ये पारधी समाजाचा पहिला मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला. पारधी समाजाच्या भयाण व विषण्ण स्थितीचे दर्शन मेळाव्याच्या निमित्ताने झाले. घरदार नाही, समाजमान्यता नाही, शिक्षणाचा तर पत्ताच नाही. शिकार करणे, शेतीची राखण करणे, पोटासाठी छोट्यामोठ्या चोऱ्या करणे हाच धंदा. पोलिसांच्या ससेमिऱ्याला तोंड देत जीवन जगणारा हा समाज. एकेकाळी इंग्रज राजवटीशी लढा देणारा हा समाज. स्वातंत्र्यानंतर चोर, दरोडेखोर म्हणून अतिशय वाईट जीवन नशिबी आलेल्या समाजाकरिता काहीतरी करावे असे कार्यकर्त्यांनी ठरविले. भटके- विमुक्त व पारधी समाजाच्या उन्नतीकरीता, शिक्षणाकरिता रामचंद्र चाटुफळे यांनी दिलेल्या १८ एकर जमिनीवरती यमगरवाडी येथे १९९३ मध्ये वसतिगृह सुरू झाले. पारधी समाजाची २४ मुले वसतिगृहात राहू लागली. शाळा माहिती नसणारी मुलं शाळेत जाऊ लागली. मुलांवर चांगले संस्कार होऊ लागले. आज या वसतिगृहात १३० मुली व २४५ मुले असे ३७५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १० वी, १२ वी उत्तीर्ण होऊन अनेक मुले बाहेर पडली आहेत.
चंद्रकांत गडेकर हे वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळ, मुंबई या संस्थेचे संचालक होते. त्यांनी सामाजिक व सांस्कृतिक आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन प्रसंगी तुरूंगवाससुद्धा भोगला आहे. तसेच त्यांनी पारधी, मसणजोगी, नाथजोगी, मेंढगी जोशी, नंदीवाले, टकारी, लमाण, ओतारी, शिकलकरी, गोपाळ, मरीआईवाले, कटाबु, हेळवे, गोंधळी, वासुदेव, बहुरूपी, कोल्हाटी, वडार, कैकाडी, पाथरवट, पांगुळ आदी विविध भटक्या-विमुक्त जातींमध्ये संघटनात्मक व आंदोलनात्मक स्वरूपाचे कार्य केले. मगरसांगवी, संयद वरवड, पारधी प्रथमवसन, मरीआईवाले, गोपाळ, मेंढगी जोशी, अजनूज (वाल्मिकी वसतिगृह), कोल्हाटी समाज (भारतमाता वसतिगृह), नाथजोगी, हिंगोली, शिकलकरी, वडवनी या प्रकल्पांमध्ये त्यांनी सक्रिय भाग घेऊन त्या प्रकल्पांस मार्गदर्शनही केले. सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहाचे ते ट्रस्टीही होते. गडेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘भट्टी ओतार्याची’ हे आत्मकथनही त्यांनी लिहिले आहे.