Skip to main content
x

गणोरकर, प्रभा रामचंद्र

     प्रभा गणोरकर यांचा जन्म शिरजगाव बंड (जि.अमरावती) येथे झाला. बालपण तिथेच गेले. महाविद्यालयीन शिक्षण विदर्भ महाविद्यालय, अमरावती येथे झाले. एम.ए.नंतर त्यांनी ‘चि.त्र्यं. खानोलकर यांच्या वाङ्मयातील शोकात्म भाव’ या विषयावर  प्रबंध सादर करून पीएच.डी. पदवी मिळवली. प्रथम विदर्भ महाविद्यालयात आणि पुढे मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात अध्यापन केले. त्यांनी १९६६नंतर महत्त्वाच्या वाङ्मयीन नियतकालिकांमधून कविता लेखन तसेच समीक्षात्मक लेखन केले. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘व्यतीत’ १९७४ मध्ये प्रसिद्ध झाला, आणि दुसरा कवितासंग्रह ‘विवर्त’ १९८४ मध्ये काव्यरसिकांसमोर आला. साहित्य अकादमीच्या ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ या मालिके अंतर्गत ‘कविवर्य बा.भ.बोरकर’ या पुस्तकातून बोरकरांच्या काव्याचा आलेख त्यांनी मांडला (१९८७). त्याशिवाय ‘बोरकरांची निवडक कविता’ (१९९०), ‘गंगाधर गाडगीळ : व्यक्ती आणि सृष्टी’ (१९९७), ‘किनारे मनाचे’ (१९९८), ‘शांता शेळके यांची निवडक कविता’, ‘संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश’ (१९९८, सहकार्याने संपादन), ‘एकेकाची कथा’ (२०००, गाडगीळांची स्त्रीविषयक कथा) ही पुस्तके त्यांनी संपादित केली आहेत. ‘कादंबरी : एक साहित्य प्रकार’ व ‘निबंध: एक साहित्यप्रकार’ ही पुस्तके त्यांनी विद्यापीठीय अभ्यासक्रमासाठी लिहिली आहेत.

     गणोरकरांच्या ‘व्यतीत’ या पहिल्या काव्यसंग्रहातून स्त्रीच्या अंतर्मनाचे मनोज्ञ दर्शन तर ‘विवर्त’मधून नेणिवेतील स्त्रीमन व्यक्त होते. महानगरीय संवेदनांचा खोल ठसा त्यांच्या कवितेवर असून त्यातून गर्दीतील एकटेपणा, मानवी समूहाची हिंस्रता, अनोळख यांचा प्रत्यय येतो. बोरकरांच्या निवडक कवितेच्या संपादनात बोरकरांची काव्यप्रकृती व नेमकी वैशिष्ट्ये सांगितली आहेत तर शांता शेळके यांच्यावरील ग्रंथात त्यांच्या कवितेचा सहृदय व अभ्यासपूर्ण वेध घेतलेला आहे. गाडगीळांवरील पुस्तकात गाडगीळ एक व्यक्ती, अर्थतज्ज्ञ, विचारवंत व सर्जनशील लेखक म्हणून त्यांचे वेगळेपण अधोरेखित करणार्‍या लेखांचे संपादन केले आहे. ‘गंगाधर गाडगीळ : व्यक्ती आणि सृष्टी’ या ग्रंथाच्या संपादनाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला. स्त्रियांच्या कवितेतील आशयाचे क्षेत्र व्यापक करणारे कविता लेखन आणि अभ्यासपूर्ण संपादने, ही गणोरकरांची वैशिष्ट्ये होत.

     नामवंत कवी वसंत आबाजी डहाके, हे त्यांचे पती आहेत.

     शांता शेळके पुरस्कार, भा. रा. तांबे पुरस्कार, कृष्ण मुकुंद पुरस्कार असे सन्मान  गणोरकर यांना लाभले आहेत. धामणगाव इथे २००० साली झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

- अशोक बेंडखळे

गणोरकर, प्रभा रामचंद्र