Skip to main content
x

गोखले, हेमंत लक्ष्मण

     र्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश  हेमंत लक्ष्मण गोखले यांचा जन्म बडोद्याला झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या बालमोहन विद्यामंदिरात आणि महाविद्यालयीन शिक्षण रामनारायण रुइया कॉलेजमध्ये झाले. रुइया कॉलेजमधून बी.ए.ची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी शासकीय विधी महाविद्यालयामधून एलएल.बी. आणि त्यानंतर मुंबई  विद्यापीठातून एम.ए. आणि एलएल.एम. अशा पदव्या मिळविल्या. जानेवारी १९७३मध्ये महाराष्ट्र बार कौन्सिलकडून वकिलीची सनद मिळाल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिलीस सुरुवात केली. घटनात्मक, दिवाणी, कामगार कायदाविषयक, सरकारी कर्मचार्‍यांसंबंधी, असे सर्व प्रकारचे खटले त्यांनी यशस्वीरीत्या लढविले. १९७७पासून १९८४पर्यंत ते मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयामध्ये अर्धवेळ प्राध्यापक होते. १९८४ ते १९८९ या काळात ते उच्च न्यायालयात सहायक सरकारी वकील होते. या काळात ते राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयाच्या मूळ शाखा आणि अपील शाखा या दोन्ही विभागांत काम पाहत असत.

    २०जानेवारी१९९४ रोजी  गोखले यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली, पण लगेच ४फेब्रुवारी१९९४ रोजी त्यांची गुजरात उच्च न्यायालयात बदली करण्यात आली.

     २३जानेवारी१९९५ रोजी त्यांची नियुक्ती गुजरात उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश म्हणून करण्यात आली. २५जानेवारी१९९९ रोजी त्यांची पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात बदली करण्यात आली. ७जानेवारी२००७ रोजी त्यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक सरन्यायाधीश म्हणून झाली. ७मार्च२००७ रोजी त्यांची नियुक्ती अलाहाबाद उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपदी झाली. ९मार्च२००९ रोजी तेथून मद्रास उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून त्यांची बदली झाली. ३०एप्रिल२०१० रोजी न्या.गोखले यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून झाली.  ९मार्च२०१४ रोजी ते निवृत्त  झाले .

- शरच्चंद्र पानसे

गोखले, हेमंत लक्ष्मण